कुलदीपिका नवीन लेखन
*कुलदीपिका*
कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनीनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती. तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर खोचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का, नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा, देवा. कुठल्या जन्माचं पाप भोगाय लावलंस रं बाबा तू. वळीनं चार पोरी दिल्यास, पर म्या काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदापण पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते म्या. बाजीरावाला सांगत होते की, अरं बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांनं माझं काही ऐकलं नाही. तो म्हणायचा, "अगं आई, तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत." खरं तर पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर हुंडा द्यावा लागतो. ओळीनं पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार असं तिच्या मनात यायचं.
असंच काही महिनं निघून गेले. परमेश्वराच्या दरबारात 'देर है लेकिन अंधेर नहीं है' असं म्हणतात. त्याप्रमाणे बायजाक्काला परमेश्वर पावला. पंचकानंतर म्हणजे पाच मुलींच्या पाठीवर कमळा वहिनीला सहावा मुलगा झाला. घरात आनंदी वातावरण निर्माण झालं. बायजाक्काला तर स्वर्ग दोन बोटं उरला होता. तिला नातू झाला होता. घराला वंशाचा दिवा मिळाला होता. बायजाक्कानं साऱ्या गावात साखर वाटली होती. बारसं तर मोठ्या थाटामाटात घातलं होतं. तिनं नातवाचं नाव दीपक असं ठेवलं होतं. ती दीपकला हातावरच्या फोडाप्रमाणं जपायची. दीपकचं खूप लाड झालं होतं तिनं.
दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे निघून गेली. बायजाक्काच्या केसांनी केव्हाच रुपेरी चांदणं धारण केलं होतं. पण आज ती एका वेगळ्याच काळजीत पडली होती. पंधरा वर्षापूर्वी वंशाचा दिवा नाही म्हणून तळमळत होती. त्याच वंशाच्या दिव्यानं तिच्या घराण्याला काळीमा फासायला सुरुवात केली होती.
दीपक आता मोठा झाला होता. शहरातल्या एका कॉलेजात जात होता. त्याला शहराचं नवं वारं लागलं होतं. आजीच्या लाडात वाढलेला दीपक आता कॉलेजातल्या फिल्मी दुनियेत, मित्रांच्या संगतीत आणि पोरींच्या घोळक्यात जास्त दिसायचा. 'सलमानची बॉडी आणि अमिताभची दाढी' याची त्याला फार हौस होती. अभिनेत्यांचं अनुकरण तो करायचा. त्याला माहीत नव्हतं की वास्तव जीवन आणि फिल्मी जीवन यात फरक असतो. पण त्याचं त्याला काहीच सोयरसुतक नव्हतं. त्यातच आधुनिक युगात मोबाईलच्या शोधामुळे तो अधिकच चैनबाज आणि चालबाज बनला होता. त्याचं मित्रसुद्धा त्याला मोबाईलवर नको नको त्या भानगडी दाखवायचे. तो आजीकडं मोठ्या किमतीचा मोबाईल घेण्यासाठी हट्ट करू लागला. पण बायजाक्का त्याला सारखी सांगायची, "आपल्यासारख्या गरिबाचं हे काम नाही. अरं! पाच बहिणीच्या पाठीवर तुझा जन्म झाला. तुझं खूप लाड केलं मी, पण आता तुझं लाड पुरवायला तू लहान राहिला नाहीस. तू शहाणा हो. शहाण्यासारखा वाग." पण ऐकतो तो दीपक कसला? तो फिल्मी स्टाइलमध्येच बोलायचा,
"दादी माॅं, एक बार अगर तुम किसी को दिल से चाहती हो, तो पुरी कयामत से उसे मिलाने में जूट जाती हो|" असे डायलॉग तो आजीला ऐकवायचा. तेव्हा ती भडकायची आणि म्हणायची, "चुलीत घाल तो तुझा खान की घाण. ढुंगण वाकडं करून सगळं मिळालं असतं तर गावातल्या समद्या बाप्यांनी ढोरं विकून गाड्या फिरवल्या नसत्या का? हे सारं सोडून दे. चांगली शाळा शिक. मोठा हो. आपल्या घराण्याचे नाव मोठं कर." पण आजीचं ऐकंल तो दीपक कसला?
आजीनं नेहमीच्या लगबगीनं सूर्याच्या गोंड्याला आजीनं दिपकला उठवलं. मंगळवारची सकाळ होती. धारा पाणी आटोपून बायजाक्कानं दीपकला कॉलेजला जायला दोन चपात्या, झुणका करून डबा त्याच्या बॅगेत घातला. त्याला घरातून जायला आज जरा उशीर झालेला होता. त्यामुळे दीपकला गावातली मुक्कामाची गाडी चुकली होती. आता काय करावं? त्याला सुचत नव्हतं. कॉलेजला जायची पंचाईत होती. कॉलेजातला तास सुटेल याची त्याला फारशी काळजी वाटत नव्हती; पण त्याला मित्रांबरोबर सिनेमाला जायचं होतं, याची त्याला काळजी वाटत होती. इतक्यात त्याला गावातल्या सर्जेराव पाटलाच्या संगीताची आठवण झाली. ती दोघं एकाच कॉलेजात शिकत होती. दीपक सरकारी गाडीनं म्हणजे एसटीनं जायचा. तर संगीता गाडीवर बसून कॉलेजला यायची. कारण ती बड्या बापाची बडी मुलगी होती. सैराट चित्रपटातल्या आर्चीसारखी संगीता होता. संगीतानं दीपकला विचारलं, "अहो, येता का कॉलेजला?" असं तिनं म्हणताच दीपकच्या डोळ्यातल्या बावल्या हरखून गेल्या. आपण स्वप्नात तर नाही ना असं दीपकला वाटलं. क्षणभर त्यानं आपल्या हाताचा चिमटा काढून पाहिला. गाडीवर बसल्यावर कॉलेजचा रस्ता संपूच नये असं त्याला वाटायला लागलं. जीवन पाटलांनं आपल्या मुलगीला हेलिकॅप्टरच तेवढं घ्यायचं बाकी राहिलं होतं. सगळ्या गाड्या तिच्या पायाशी लोळण घेत होत्या. गरिबी म्हणजे काय असतं हे तिला माहिती नव्हतं.
गल्लीतल्या ताराक्कानं बजाक्काला दीपकच्या बाहेर चाललेल्या सगळ्या कागाळ्या सांगितल्या होत्या. तसं बायजाक्का भीतीनं कापायला लागली. कारण सर्जेराव पाटलाच्या पोरीच्या नादानं माझ्या दीपकच्या जन्मावर नांगर फिरंल असं तिच्या पोटात भ्या होतं. कारण सर्जेराव पाटील हा गावचा पाटील होता. त्याचं हात वरपर्यंत होतं. आपल्या नातवाचं बरं-वाईट करायला मागं-पुढं बघायचा नाही तो. म्हणून बायजाक्कानं दीपकला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं ऐकलंच नाही तिचं.
मित्रांच्या नादानं तो दारुच्या दुकानाच्या पायर्या दररोज झिजवू लागला. रात्री दारू पिऊन यायचा. आपल्या आजीच्या साऱ्या खाणदानाचा उद्धार करायचा. लाडक्या नातवाचा पराक्रम पाहून बायजाक्काला जगावंसं वाटत नव्हतं. तरी ती जगत होती आपल्या एका नातीसाठी. तशी तिला कुठल्याही नातीची काही काळजी करायचं कारण नव्हतं. पहिल्या चार नातींची लग्नं होऊन त्या सासरी सुखात राहत होत्या. आनंदानं नांदत होत्या. तिची पाचवी नात मात्र हिरा होती. तिच्यासाठी ती जगत होती. दीपकच्या जन्मानंतर चार वर्षातच तिची आई या जगाचा निरोप घेऊन गेली. त्यानंतर वर्षभरातच त्याचा बाबाही कर्करोगानं मरण पावला. मागं राहिली होती फक्त बायजाक्का.
या दुनियेची रीतच न्यारी असते. नातवासाठी आतुर असलेली बायजाक्का आत्ता मात्र नातवाच्या त्रासानं वैतागून गेली होती. नात नको म्हणणारी बायजाक्का त्याच नातीसाठी आता जगत होती. तिच्या पाचव्या नातीचं नाव होतं दीपा. सगळी तिला 'नकोशी'च म्हणायचे. कारण नको असताना ती जन्माला आली होती. पण खरोखरच तिनं आपल्या नावाप्रमाणं आपला प्रकाश पडला होता.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं आपल्या भारत देशासाठी पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. ती आपला आदर्श 'कविता राऊत' हिला मानत होती. तिनं मिळविलेल्या सुवर्णपदकासाठी तिचा सत्कार होणार होता. तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. या सत्काराच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी अशी मोठी माणसं येणार होती. असंख्य प्रेक्षकांसमोर हा कार्यक्रम होणार होता.
सत्काराच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आजपर्यंत आपण गावातल्या मुलीबाबत संकुचित दृष्टी ठेवून वागत होतो. त्यांनी 'चूल आणि मूल' एवढंच पहावं असा विचार करत होतो. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या महान कार्यामुळं मुली शिकू लागल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून यश मिळू लागल्या. आजचेच उदाहरण पाहा ना! पोहाळेसारख्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या दीपाने पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. म्हणून आपण तिचा सत्कार करीत आहोत. आपले जुने विचार सोडून दिले पाहिजेत. केशवसुतांंनी म्हटलेले आहे की, 'जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनी टाका.' त्याप्रमाणे आपणही मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता त्यांच्याकडे समानतेने पाहिले पाहिजे. दीपाला तिच्या या पराक्रमासाठी मी मुख्यमंत्री फंडातून एक लाख रुपयाचा धनादेश देत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपाचा सत्कार करण्यात आला. तिच्या गळ्यात हार, हातात सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश पाहून आजीचं काळीज भरून आलं. ती काही काळ भूतकाळात गेली. तिला सारं सारं आठवू लागलं......
दीपाचा सत्कार संपन्न झाला. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. एकच जयघोष सुरू होता ----'दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो. दीपा मानेचा विजय असो.'
या जयघोषात बायजाक्काचं मन चिंब भिजून गेलं होतं. आपल्या जगण्याचं सार्थक झालं असं तिला वाटू लागलं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होतं. भरल्या मनानं ती दीपाकडं पाहत होती.
Comments
Post a Comment