चंद्रमुखी

                          *चंद्रमुखी*
           फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अगदी प्राचीन काळातील म्हटली तरी चालेल. ही गोष्ट आहे कांचननगरामध्ये घडलेली. कांचननगरामध्ये छत्रपाल नावाचा एक राजा राज्य करीत होता. रूपमती ही त्याची राणी होती. नावाप्रमाणेच ती खूप रूपवान होती. जणू सौंदर्याची सिंधू होती. राजाचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण राणी खूप नाराज होत. कारण तिला मूलबाळ झालेलं नव्हतं. लग्नाला-बारा वर्षे उलटून गेली होती; तरीही तिची कूस उजवली नव्हती. 
         कांचननगराच्या उत्तरेला घनदाट जंगल होते. जंगलाच्या पलीकडे पद्मपूर नावाचे गाव होते. त्या गावात एक साधू राहत होता. त्याच्या करामतीच्या अनेक वार्ता दूरवर पसरलेल्या होत्या. त्याची कीर्ती राजाच्या कानावर आली होती. राजा राणीसह साधूच्या भेटीला गेला.साधूने राजाचे स्वागत केले. साधूने राणीला एक फळ मंत्रून दिले. पण एक अट घातली.  पुत्र जन्मला; तर त्या पुत्राचे लग्न अगदी लहान वयात करायचे. तेही पाच वर्षापूर्वी. राजाने ती अट मान्य केली. 
          योगायोगाने म्हणा अगर साधूच्या चमत्काराने म्हणा राणीला दिवस गेले. तिने एका गोंडस सुकुमार राजपुत्राला जन्म दिला. कांचननगरात आनंदी आनंद झाला. राजाने संपूर्ण राज्यात हत्तीवरून साखर वाटली. 
      राजपुत्राचे नाव 'रूपवान' असे ठेवण्यात आले. राजपुत्र रूपवान शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. बघता-बघता राजपुत्र चार वर्षाचा केव्हा झाला हे केलेली नाही. राजा व राणीला साधूने घातलेली अट आठवू लागली. साधूचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. 'राजपुत्राचे लग्न लहान वयातच झाले पाहिजे.' राजाने आपल्या दूतांना दशदिशांना पाठवून दिले. वधूचा शोध सुरू झाला. 
         ..... अलकावती नगरात विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची राणी दमयंती तिने एका छानशा मुलीला जन्म दिला होता. ती चंद्राच्या मुखाप्रमाणे आकर्षक दिसत होती. म्हणून तिचे नाव 'चंद्रमुखी' असे ठेवण्यात आले होते. ही वार्ता राजा छत्रपाल यांच्या कानावर गेली. तो अलकावती नगरात गेला. त्याने विक्रमादित्य राजाची भेट घेतली. त्याने चंद्रमुखीचा हात आपल्या  रुपवानासाठी मागितला. विक्रमादित्य राजाला आश्चर्य वाटले. छत्रपालाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. विक्रमादित्य राजाने परवानगी दिली. शुभ मुहूर्त पाहून रूपवान आणि चंद्रमुखी यांचा विवाह लावून देण्यात आला. पण विक्रमादित्य राजाने मुलीचे वय पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कांचननगरात पाठवणार नाही असे सांगितले होते. तोपर्यंत राजपुत्र रूपवान यांना अलकावती नगरात पाठवूनही द्यावयाचे नाही असा अलिखित करार दोन्ही राजांमध्ये झालेला होता. 
             दिवसामागून दिवस न् महिन्यामागून महिने निघून गेले. कांचननगरात रूपवान आणि अलकावती नगरात चंद्रमुखी मोठी होऊ लागले होते. 
           .......राजपुत्र रूपवान अनेक कलांमध्ये निपुण झाला होता. पराक्रमामध्ये आपल्या बापापेक्षाही सरस झाला होता. मात्र रूपवान एका विचाराने झुरत होता. आपल्याबरोबरच्या सरदार मुलांची लग्नं झाली होती. पण माझं लग्न होत नाही, याबाबत आपल्या माता-पित्यांना विचारायचे धाडस त्याला झाले नाही. 
            राजपुत्राची ही घालमेल राजाच्या लक्षात येत होती; पण हा विषय आपण कसा काढायचा हे राजाला कळेना. राजपुत्राला कसं सांगावं, की तुझं लग्न झालं आहे. त्यावर त्याचा विश्वास बसेल का? आपलं लग्न झालंय यावर तो विश्वास ठेवलं का? अशा अनेक शंका-कुशंकांनी राजाच्या मनात काहूर माजलं होतं. 
           एकेदिवशी राजपुत्र समोर आलेला पाहून राजा म्हणाला, "राजपुत्र रूपवान, बरेच दिवस झाले आपणाला एक गोष्ट बोलावी असे म्हणत होतो. पण बोलावं कसं? याच
 विचारात होतो. 
           "महाराज, अशी कोणती गोष्ट आहे की ती गोष्ट मला सांगण्यास आपण एवढा विचार करत आहात?" राजपुत्राने विचारले.
           राजाने सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, "राजपुत्र, आपणांस वाटत असेल, की आपल्याबरोबरच्या  सवंगड्यांची लग्नं झाली आहेत. आपलं लग्न कसं झालं नाही अजून? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार."
           "होय महाराज, हा प्रश्न माझ्या मनात खूप वेळा आला होता. पण आपणास विचारण्याचे माझं धाडस झालं नाही."
           "मीही सांगेन सांगेन  असंं करत दिवस निघून गेले.                  "अहो महाराज, काय सांगायचं आहे ते सांगा ना! त्यामुळे तुमचं मन हलकं होईल."
            "मग ऐका राजपुत्र." असे म्हणून राजाने त्याला सांगण्यास सुरुवात केली. -----
         "राजपुत्र, तुम्ही लहान असताना म्हणजे अवघ्या पाचव्या वर्षी आपलं लग्न झालं आहे. अगदी तुम्ही पाळण्यात असताना तुमचं लग्न झालं आहे. आणि हे सत्य आहे. आमचा नाईलाज होता. आपल्या मातोश्रींना खूप वर्षे मूल होत नव्हतं; तेव्हा एका साधू महाराजांच्या आशीर्वादानं आपला जन्म झाला. त्या महाराजांनी एक वचन घेतलं होतं, की आपलं लग्न लहान वयातच म्हणजे पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी केलं पाहिजे. म्हणून आम्ही आपलं लग्न अलकावतीचे महाराज विक्रमादित्य यांच्या राजकन्येशी केलं होतं. राजकन्येचा नुकताच जन्म झाला होता. आपला विवाह त्यांच्याशी पाळण्यात लावून देण्यात आला होता."
          "मग आम्हांला याबाबत आतापर्यंत काहीच कसे काय सांगितलं नाहीत आपण."
           "कसे सांगणार? त्या राजांनी हा आम्हांला एक अट घातली होती."
          "ती कोणती?"
         " राजकन्या पंचवीस वर्षाची झाल्या शिवाय आपणांस याबाबत बोलायचं नाही.''
         "ती आता कुठे आहे?"राजपुत्राने विचारले. 
         "बालपणासून ती माहेरी राहत आहे. पण तिची आता पूर्ण माहिती मिळू शकली नाही. दरबाराच्या कामामुळे चौकशी करू शकलो नाही."
        "आपण एवढी माहिती दिली याबद्दल मी आभारी आहे. काही झालं तरी मी तिला घेऊन येईनच."
        "असं तुम्ही करू नका राजपुत्र. दुसरी एखादी राजकन्या पाहून तुमचं तिच्याशी धुमधडाक्यात लग्न करूया."
        "नाही महाराज, असं मला करता येणार नाही. कारण लग्न ही विधिलिखित घटना आहे. एकदा लग्न झालेलं असेल तर दुसरे लग्न कसं करता येईल? माझा विश्वास आहे की ती माझी वाट पाहत बसलेली असेल." 
        "अहो राजपुत्र, आपला विश्वासघात होईल. तिचा नाद सोडून द्या. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही गेलाच तर आपल्या राज्याला मुकशिला."
         "महाराज, तुम्ही असं कसं म्हणता? आधी खात्री करून घेतली पाहिजे. न पाहताच कोणत्याही गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा?"
          "आम्ही उद्याच प्रवासाला निघतो." असे म्हणून राजपुत्र दरबाराच्या बाहेर पडला. 
          ....... पंचवीस वर्षे पूर्ण होताच अलकावती नगरात राजकन्या चंद्रमुखीला महाराज विक्रमादित्य यांनी सांगितले, "बाळा चंद्रमुखी, तुमचं लग्न कांचननगरच्या राजपुत्र रूपवान यांच्याशी अगदी लहान वयात म्हणजे पाळण्यात झालेलं आहे. तोच तुमचा वर आहे."
           असे तिला समजताच तिच्या मनात राजपुत्र रुपवानाविषयी उत्कट प्रेम व भक्ती उत्पन्न झाली. तिने राजपुत्रास पाहिले नव्हते, तरीही तिला त्याविषयी भास होत होते. बागेत गेली की एखाद्या फुलाकडे एकटक पहात राहायची. आपल्यासोबत दासी आहेत, हेही विसरुन जात होती. त्या फुलात राजपुत्राचे रूप पाहात उभी राहत होती. 
          पहाटे लवकर उठून स्नान करून ती तुळशीला पाणी घालीत होती. देवपूजा करीत होती. नंतर राजवाड्यातील झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. प्रत्येक झोक्याबरोबर निरनिराळ्या कल्पना तिच्या मनात येत होत्या. त्याच विचारात ती झोपी जात होती. 
          राजपुत्र रुपवानाने निश्चय करून अलकावती नगराकडे कूच केली. मजल दर मजल करत तो चालला होता. प्रवासात कित्येक दिवस गेले होते. त्याचे कपडे कर्दमलेले होते. दाढी वाढलेली होती. अशा अवस्थेत तो अलकावती नगरात पोहोचला. त्याच्याकडे पाहून तो राजपुत्र आहे यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. याच संधीचा फायदा करून घ्यायचा असे त्याने ठरवले होते. 
           तो राजवाड्यात गेला. शिपायांनी त्याला अडवले. त्यांनी त्याला प्रधानमंत्री यांच्याकडे नेले. प्रधानाने विचारले, "तू कोण? का आला आहेस?"
         "मी एक गरीब शेतकरी आहे. सावकारानं कर्जासाठी माझं घर, शेत जप्त केलं आहे. मी बेकार झालो आहे. बरबाद झालो आहे. माझी लहान लहान मुलं आहेत. मला इथं काही काम मिळेल या आशेनं आलो आहे. मला काम द्या. माझ्यावर दया करा. पडंल ते काम करीन मी." तो म्हणाला. 
         "महाराजांना मी विचारून सांगतो." असे म्हणून प्रधान निघून गेले. 
              राजपुत्राला बागेत काम करायची संधी मिळाली. त्याने प्रथमच हातात कुदळ घेतली होती. दोन्ही हातांना फोड आले होते. कोणतीही तक्रार न करता निमुटपणे आपले काम करीत होता. राजकन्या चंद्रमुखी विहारासाठी बागेत यायची. त्यामुळे तो अगदी मन भरून तिला पाहत होता. 'तिच्याशी बोलावे, काय हवे, काय नको ते पाहावे, आपणच तुझा पती आहे असे सांगावे. पण ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का?' असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते. 
        ....... अलकावती नगराच्या शेजारी एक गाव होते. त्या गावात धनशेठ नावाचा मोठा व्यापारी राहत होता. तो हिरे, माणिक, मोती यांचा व्यापार करीत होता. एके दिवशी हा धनशेठ व्यापारी व्यापार करण्यासाठी बैलगाड्यांतून हिरे, माणिक, मोती घेऊन चालला होता. व्यापाराचा मार्ग अलकावतीतील राजकन्या चंद्रमुखीच्या बागेजवळून जात होता. सूर्य मावळतीला झुकला होता. त्यामुळे धनशेठ बागेजवळ थांबला होता. आजची रात्र इथेच काढून उद्या सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात करावी असा बेत त्याने ठरवला होता. 
            त्याच वेळी बागेत विहारासाठी राजकन्या आपल्या दासीसह आलेली होती. सायंकाळच्या प्रकाशात तिची आकृती पहाण्यात धनशेठ मग्न होऊन गेला होता. त्याने एका दासीला हाक मारली. तिला वाटले की त्याला पाणी हवे असेल. राणीची परवानगी घेऊन ती आली. व्यापार्‍याच्या मनात पाप जागे झाले होते. तो दासीला म्हणाला, "एक रात्र राजकन्या आपल्याला मिळाली; तर राजवाड्यात मी माझ्या हिरे, माणिक यांनी भरलेल्या दहा गाड्या रिकाम्या करून जाईन." हे शब्द ऐकताच दासीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. पण तिने रागाला आवर घातला. निळसर साडी चमचम चमकत होती. झपाझप पावले टाकत ती पुढे चालली होती. परत जाणाऱ्या तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात व्यापारी बसला होता. दासीच्या मनात विचार आला की आपण याची खोड मोडली पाहिजे. याची फजिती केली पाहिजे. या विचारातच ती दासी राजकन्येकडे आली. तिचा हात हातात घेऊन एक वचन घेतले. हा प्रसंग राजपुत्र आडोशाला उभा राहून पाहत होता. त्याला खात्री पटली की आपल्या वडिलांनी जे सांगितले होते, ते सत्य आहे. त्याला राजकन्येचा खूप राग आला होता. 
             सकाळी लवकरच तो राजवाड्यात आला. तो म्हणाला, "महाराज, माझी आई खूप आजारी आहे. मला गेले पाहिजे. माझ्याशिवाय तिला कोणी नाही. तिच्या औषधासाठी आणि गावाला जाण्यासाठी मला काहीतरी द्या. आईला बरं वाटू लागलं, की मी परत येईन." राजाने त्याला खूप मोहरा दिल्या. त्याला आईची काळजी घ्यायला सांगितली. 
              राजपुत्राने त्या मोहरा विकून पैसे मिळवले. मिळालेल्या पैशातून नवीन कपडे, तलवार, घोडा विकत घेतला. कांचननगरचा राजपुत्र बनून परत राजवाड्यात आला. त्याने आपल्या बालपणात झालेल्या विवाहाची माहिती सांगितली. आपल्या वडिलांनी चंद्रमुखीला घेऊन येण्यास सांगितले आहे अशी माहिती दिली. हे ऐकून अलकावतीचा राजा आनंदित झाला. त्याने जावयाचे मनापासून स्वागत केले. चंद्रमुखी खूप खुश झाली. आपण ज्याची मनोभावे सेवा करीत होतो. पती परमेश्वर म्हणून ज्याची पूजा करीत होतो; तो साक्षात समोर आलेला पाहून तिला आनंदाचे उमाळे फुटत होते. ती प्रेमाने वेडी होऊन राजवाडाभर धावत होती. 
          सासरी जाण्याचा दिवस उगवला. तिची मनःपूर्ती झाली. रूपवान आणि चंद्रमुखीने राजाचा निरोप घेतला. त्यांचा अलकावती नगरापासून कांचननगराकडे प्रवास सुरू झाला. वायुवेगाने घोड्याने वेग घेतला. राजपुत्राला कोणीही अडवू शकत नव्हता. बागेत पाहिलेल्या दृश्याने तो बेभान झालेला होता. त्या त्वेषाने तो भरधाव घोडा हाकीत होता. विश्वासघात झाल्याने तो मनातूं जळत होता. 
            खूप अंतर मागे पडले. राजकन्येला खूप तहान लागली होती. 'पाणी, पाणी' असे ओरडत होती. राजपुत्राने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या डोळ्यापुढे बागेतील तो प्रसंग नाचत होता. बदला घेण्याची आग मनातून जात नव्हती. राजकन्या काकुळतीला येऊन विनवणी करीत होती, "मला पाणी द्या, मला पाणी द्या." तो केवळ हूं हूं म्हणून पुढे चाललेला होता. अचानक घोडा थांबला. बाजूला जवळच विहीर होती. राजकन्येने पाण्याची मागणी केली. राजपुत्र म्हणाला, "पाणी हवंय ना! थांब. तुला पाणी देतो." 
         राजकन्या पाण्यासाठी व्याकूळ झाली होती. ती म्हणाली, "खरंच! मला पाणी हवं आहे. देताय ना तुम्ही! फार उपकार होतील तुमचे माझ्यावर."
         "मीही त्याचा विचार करीत आहे. पाणी हवे ना? तुला कायमचंच पाणी देतो आता. मला फसवतेस काय?" असा मनातल्या मनात राजपुत्र विचार करत होता. 
         "राजपुत्र राजकन्येला घेऊन विहिरीजवळ गेला. पाणी खूप खोल होते. पाणी काढण्याची सोय नव्हती. त्याने आपल्या कमरेचा शेला सोडून राजकन्येच्या कमरेला बांधला. घोड्याचा लगाम सोडून तो शेल्याला बांधला. तिला हळूहळू विहिरीत सोडले. त्याने हातातील लगाम सोडून दिला. राजकन्या विहिरीत पडली. ती ओरडू लागली. विहिरीच्या भिंतीला असलेल्या दगडाला धरून ती कशीतरी धरून उभी होती. राजपुत्र वरून म्हणाला, "चंद्रमुखी, थोडा धीर धर. जवळ काहीतरी मिळते का पाहतो? तोपर्यंत तू पाणी पिऊन घे. मी आलोच. तो मोठ्यात मोठा दगड शोधू लागला. मनासारखा दगड मिळताच त्याने ताकतीने उचलून चंद्रमुखीच्या दिशेनं विहिरीत टाकून दिला. तो हसत हसत निघून गेला. जाताना मोठ्याने म्हणाला, "मला फसवतेस काय? म्हणे सती, सावित्री! दिवसभर तुळशीची पूजा, पतीचा जप आणि रात्रभर धनशेठ व्यापाऱ्याकडे. स्त्रीजातीला लागलेला कलंक मी धुऊन टाकला. अशा विचारात तो जंगलात निघून गेला. 
         विहिरीतील पाणी पिऊन चंद्रमुखी विहिरीच्या भिंतीला असलेल्या दगडाला धरून उभी होती. इतक्यात एक मोठा दगड वरून खाली पडला. ती पाणी पिऊन सरळ झाली नसती;  तर त्या दगडाखाली सापडून ती मेली असते. तिचे नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. 
         आपण संकटात सापडलो याची जाणीव राजकन्येला झाली. तिने धैर्याने तोंड द्यायचे ठरवले. ती रात्र तिने तशीच शांत बसून काढली. सकाळ होताच तिने मदतीसाठी धावा सुरू केला. विहिरीजवळून एक शिंपी जात होता. त्याने आवाज ऐकला. विहिरीत डोकावून पाहिले. राजकन्या वर घेण्यासाठी त्याला विनवू लागली. पण त्याने एक अट घातली होती. तो म्हणाला, "तुला मी वर घेतो. मात्र तू माझ्याशी लग्न केले पाहिजेस."  सुंदर आणि संकटात सापडलेली स्त्री पाहून त्याच्या तोंडाला सुटले होते पाणी. राजकन्येला काय करावे कळत नव्हते. परंतु परिस्थिती अशी आली होती, की तिला होकार दिल्याशिवाय पर्याय नव्हता. आपला जीव वाचवण्यासाठी होकार द्यावाच लागणार होता. 
         शिंप्याने तिला विहिरीतून बाहेर काढली. वर येताच ती लोळू लागली. त्याने विचारले, "काय झाले? "
        "नवऱ्याने संशय घेऊन मला विहिरीत ढकलून दिले. पाच सहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. फक्त पाणी पिऊन दिवस काढत होते. तुमच्या रूपाने देवच भेटला. काहीतरी खायला द्या मला. बरे वाटू लागले, की आपण लग्न करू. शिंपी खायला आणायला गावात निघून गेला. ही संधी साधून राजकन्या गाठोड्यातील कपडे अंगावर घालून शिंप्याच्याच घोड्यावर बसून निघून गेली. 
         चंद्रमुखी एका नगराच्या सीमेवर आली. तेथे फलक लिहिलेला होता. त्यावर लिहिले होते -- 'राजवाड्याच्या सभोवती चार ४४ फूट रुंद व दोन २४ फूट खोल खड्डा खणला आहे. तो खड्डा पार करून येणाऱ्या राजपुत्रास आमची राजकन्या पुष्पवती हार घालेल. त्या राजपुत्रास अर्धे राज्य बक्षीस देण्यात येईल. 
         चंद्रमुखीने तो फलक वाचताच तिच्या मनात विचार आला, की येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपण तोंड द्यायचेच. तिच्या अंगावर पुरुषांची कपडे होती. तिने घोड्याला टाच दिली. घोडा एका झटक्यात राजवाड्यात पोहोचला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. नियमानुसार राजाने विवाहाची जय्यत तयारी सुरु केली. पण पुरुषी पोशाख घातलेल्या चंद्रमुखीच्या मनात चलबिचल सुरू झाली. आपले खरे रूप समजले तर आपली नाचक्की होईल. एका स्रीचे दुसऱ्या स्त्रीशी लग्न कसे होईल? 
          आपला लग्न समारंभ लांबणीवर टाकण्यासाठी तिने एक युक्ती केली. राजाला कळविले, "आपण ठेवलेला पण मी जिंकला आहे. तशी माझीही एक अट आहे. ती म्हणजे मला आपल्या राज्यातील सर्व संन्याशांना एक महिनाभर भोजन घालावयाचे आहे. त्यानंतर विवाह करू या.'' राजाने याला कबुली दिली. 
         दिवसामागून दिवस निघून गेले. महिना सरत आला. पण चंद्रमुखी ज्या तीन संन्याशांची वाट पहात होती. त्यांचा मात्र अजून पत्ता नव्हता. ती विचारात मग्न झाली होती. आज शेवटचा दिवस होता. दिवस मावळतीला निघाला होता. आणि काय आश्चर्य! त्या तीन व्यक्ती संन्याशी रूपात आल्या होत्या. त्यांच्या भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर त्यांना दान द्यावयाचे होते. म्हणून त्यांना एका खोलीत नेण्यात आले होते. कारण या तीन व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. हे तिघेजण या राज्यात नवखे होते. याची कल्पना राजपुत्ररुपी चंद्रमुखीला आलेली होती. 
         एकेका संन्याशाला बोलावून त्यांचा समाचार घेण्यात येत होता. पहिल्या संन्याशाला विचारले, "तू संन्याशी का झालास?" तो म्हणाला, "मी एक शिंपी होतो. एके दिवशी मी कपडे विकण्यासाठी बाजारात जात होतो. काही अंतरावर एका विहिरीत एक स्त्री पडली होती. तिला मी वाचविली; पण वाईट वासनेमुळे मी बरबाद झालो. त्या स्त्रीमुळे मी संन्यासी झालो. 
         दुसऱ्या संन्याशालाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यांने सांगितले, "मी एक धनवान व्यापारी होतो. मी दहा बैलगाड्या हिरे, माणिक यांनी भरून शहराकडे चाललो होतो. सूर्यास्त झाल्यामुळे वाटेतच अलकावती नगरीत थांबलो होतो. त्यावेळी राजकन्या बागेत विहार करण्यासाठी आली होती. आली होती. तेव्हा माझी तिच्यावर नजर गेली. एका रात्रीसाठी मी तिच्याकडे मागणी केली. पण तिथे वेगळाच प्रसंग घडून आला. राजकन्येची चतुर दासी स्वतः राजकन्येची साडी नेसून आली होती. माझ्या लक्षात सारा प्रकार आला. पण वेळ निघून गेली होती. हिरे, माणिकही गेले आणि राजकन्याही गेली. नशीबात आता संन्याशीपण आले."   
            तिसऱ्या खास संन्याशाला हाच प्रश्न करण्यात आला होता. बराच वेळ ते उत्तर देईना. तेव्हा राजपुत्ररुपी चंद्रमुखीने त्यास खडसावून विचारले, "तरीही तो गप्पच होता. चाबकाचे फटकारे उडविले. हे करताना चंद्रमुखीचे अंत:करण चिरत होते. पण तिचा नाईलाज होता. परंतु तो संन्याशी काही बोलत नव्हता. आपण कोण आहोत, हेही तो सांगत नव्हता. खूप मार खाल्ल्यावर तो बोलू लागला, "मी कांचननगराचा राजपुत्र रूपवान आहे. मला अलकावती नगरीच्या राजकन्येने फसवले; म्हणून मी तिला विहिरीत ढकलून मारली. आणि मी संन्याशी झालो."
             त्याचवेळी राजपुत्ररुपी चंद्रमुखीने आपल्या अंगावर असलेली पुरुषी वस्त्रे खाली उतरवली. आपणच अलकावती नगरीची राजकन्या चंद्रमुखी आहे हे पटवून दिले. सारा दरबार अवाक् झाला. राजकन्येने आपण पवित्र आहोत हे धनवान शेठ आणि शिंपी यांच्या पुराव्यावरून सिद्ध करून दाखवले. राजपुत्रास आपली चूक लक्षात आली. केवळ बागेतील प्रसंगावरून आपण राजकन्येला मारण्याचे पाप केले. याबद्दल त्याला खूप पश्चाताप झाला. 
             राजदरबारातील सर्वांना वाटत होते, की राजपुत्र रूपवान आणि राजकन्या चंद्रमुखी यांचे लग्न होईल. असे झाले तर या राज्याच्या पुष्पावतीचे काय होणार? हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे राजकन्या चंद्रमुखीनेच शोधून काढली. तिनेच राजपुत्र रूपवान आणि या नगराची राजकन्या पुष्पावती यांचे स्वतः लग्न लावून दिले. राजपुत्र रूपवानला गादीवर बसवले.
        ती साऱ्यांचा निरोप घेऊन आपल्या अलकावती नगरीस परत गेली. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील