देणाऱ्याने देत जावे.......
*देणाऱ्याने देत जावे......*
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावेत||' ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे.
रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निवड करण्यात आलेली होती.
कार्यक्रम सुरू झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने गावातील पहिला इंजिनियर झालेला अजय पवार यांना सूत्रसंचालकांनी मनोगत व्यक्त करायला आमंत्रित केले. पायात बूट घातलेला, इनशर्ट केलेला, गळ्याभोवती टाय बांधलेला अजय बोलायला उभा राहिला. सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या स्वागतानं अजयचा ऊर भरून आला होता. 'अजय...अजय...' असा लोकांनी जयजयकार सुरु केला.
अजयने बोलायला सुरुवात केली. ''आज मला धन्य धन्य वाटत आहे. मी उभा राहिलो आहे ते या राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेमुळेच. मी जे काही मिळवले आहे, ते या संस्थेमुळेच. माझे शिक्षण या संस्थेमुळे पूर्ण झाले आहे. आज इंजिनियर म्हणून मी जे काम करत आहे, तेही या पतसंस्थेमुळेच. कारण योग्य वेळी योग्य मदत मला मिळाली नसती; तर मी अभ्यास करू शकलो नसतो. माझे शिक्षण पूर्ण झाले नसते. पण याच पतसंस्थेमुळे माझे शिक्षण पूर्ण झाले. मला योग्य वेळी योग्य आर्थिक मदत मिळाल्यामुळे इंजिनिअर म्हणून काम करत आहे तेही या पतसंस्थेमुळेच.'' असा विचार मांडत असतानाच त्याचा त्याला सारा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून पुढे सरकू लागला.
पुढे तो सांगू लागला, "पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. त्यावेळी मी इयत्ता सातवीत शिकत होतो. माझे वर्गशिक्षक दादासाहेब गायकवाड होते. सर्वजण त्यांना 'दादा गुरुजी' या नावाने बोलवत होती. त्यांनी माझे ज्ञान पाहून मला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले होते. त्यांनी माझा खूप अभ्यास करून घेतला. प्रत्येक शुक्रवारी ते शाळेमध्ये मुक्कामाला राहत होते. २३ जून १९९० रोजी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत माझा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २१ वा क्रमांक आला होता. स्कॉलरशिप परीक्षेत येणारा गावातील पहिलाच विद्यार्थी मी होतो. त्यामुळे दादा गुरुजींनी माझा सत्कार करायचे ठरवले होते. त्यावेळी मला माझ्या गावातील लोकांनी खूप मदत केली होती. मला एक हजार रुपये बक्षीस मिळाले होते. पण त्यातील निम्मी रक्कम म्हणजे पाचशे रुपये याच राजर्षी शाहू पतसंस्थेने मला बक्षीस म्हणून दिली होती. या संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब यांनी मोलाचा वाटा उचलला होता. याच बक्षीसामधून माझ्या पुढील शिक्षणाचा खर्च भागवणे सोपे झाले होते."
कोल्हापूर संस्थानाच्या राजर्षी शाहू महाराजांनी विविध जाती, धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली होती. विविध जाती, धर्माच्या मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली होती. कोल्हापुरातील एका वस्तीगृहात अण्णासाहेबांनी त्याला प्रवेश मिळवून दिला होता. कारण त्यावेळी त्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. पुढचं शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरातील शाळेला जावं लागत होते. म्हणून अजयने इयत्ता आठवीमध्ये ऐतिहासिक दसरा चौकातील साई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच असलेल्या राजर्षी शाहू मराठा वस्तीगृहात राहत होता. उत्तम गुणांनी दहावी परीक्षा पास झाला. बारावी पास झाला. त्याच्या शिक्षणातील अडचणीला सुरुवात झाली होती ती तो उच्च शिक्षण घेत असताना. उच्च शिक्षणाचा खूप खर्च असल्यामुळे तो भागवणे त्याच्या वडिलांना शक्य नव्हता.
बारावीनंतर त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्याला मेकॅनिकल इंजिनिअरला प्रवेश घ्यायचा होता. पण त्याला बारावी परीक्षेत गुण कमी असल्यामुळे सिव्हील इंजिनियरिंगला प्रवेश घ्यावा लागला. त्याला लॅपटॉप घ्यायचा होता. पण त्याला विकत घेणे शक्य झाले नाही. चार बँकेत जाऊन चौकशी केली. पण तारण देण्यासाठी त्यांच्याकडे शेती नव्हती किंवा गृहकर्ज घेण्यासाठी मोठे घरही नव्हते. राहण्यापुरते दोन आकनी घर होते. त्यावर फी भरण्याइतके कर्ज मिळणे शक्य नव्हते. त्याच्या बाबांनी अनेक लोकांच्या घराचे उंबरे झिजवले. पण कोणीही मदत केली नाही. शेवटी त्याचे बाबा अण्णासाहेबांच्या घरी गेले. ते अण्णासाहेबाकडे गेले आणि म्हणाले, ''अण्णासाहेब, तुमचे आमच्यावर फारच उपकार आहेत. मी सगळ्यांकडे हात पसरला पण कोणीच मला मदत केली नाही, म्हणून मी तुमच्याकडे मदतीचा हात मागायला आलोय. काहीही करा; पण मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा. त्याला लॅपटॉप घ्यायचा आहे. त्यासाठी पैसे हवे आहेत." त्यावर अण्णासाहेब म्हणाले, "शंकर, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. तुला मी वैयक्तिक मदत करू शकत नाही."
"असं का म्हणता अण्णासाहेब?"
"मी तुला पैसे दिले; तर माझ्यात आणि खाजगी सावकारकी करणारा यात काय फरक राहिला? मी खाजगी सावकारकीच्या पूर्णपणे विरोधी आहे. मला खाजगी सावकारकी मान्य नाही."
"मग मी काय करू म्हणता?" शंकरराव.
"शंकर, तू आता घरी जा. संध्याकाळी पतसंस्थेत ये. यावर काहीतरी मार्ग काढू या."
शंकर घरी निघून गेला. तो संध्याकाळी सात वाजता पतसंस्थेत आला. तेव्हा पतसंस्थेत संचालक मिटिंग सुरू होती. शंकरने आणलेला आपला अर्ज शिपायाकडे दिला. शिपायांने तो अर्ज आणून मिटिंगमध्ये दिला. शंकरच्या कर्जावर चर्चा रंगू लागली. "शंकरला कशाच्या आधारावर कर्ज द्यायचे?"
"त्याच्याकडे ना शेती, ना चांगले घर. मग हा कसं काय कर्ज फेडणार तो?"
या लोकांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन अण्णासाहेब म्हणाले, "हे बघा मंडळीनो, माझी ठेव पावती आहे या पतसंस्थेत. त्या पावतीवर लोन करून शंकरला पैसे देऊन टाका."
हे बोलणं ऐकताच सर्व संचालक गप्प झाले. मॅनेंजरला सर्व सूचना देऊन आपल्या ठेव पावतीवर कर्ज काढून अजयच्या बापाला पैसे दिले.
अशाप्रकारे अजयची गरज भागवली गेली. ती अण्णासाहेबांच्या संस्थेतील ठेव पावतीवर. त्याच मिळालेल्या पैशामुळे अजय सिव्हिल इंजिनियर झाला. तो कामं करू लागला. त्याने पतसंस्थेचं कर्ज थोडं थोडं भागवलं. सरकारी कामं करू लागला.
भाषणाचा शेवट करताना तो म्हणाला, "मी या संस्थेचे घेतलेले सर्व कर्ज फेडलेले आहे. पण मी संस्थेच्या आणि अण्णासाहेबांच्या ऋणातून मात्र मुक्त झालेलो नाही. यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन. म्हणून मी ठरवले आहे, की या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने पतसंस्था नवीन इमारत बांधत आहे. या इमारतीचा प्लॅन आणि देखरेख मी स्वतः करून देणार आहे. तोही विनामोबदला. तसेच या बांधकामासाठी माझ्याकडून जी मदत हवी आहे, ती करण्यास मी वचनबद्ध आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ही पतसंस्था मदत करत आहे. अनेकांचे जीवन फुलवत आहे. आणि इथून पुढेही आपले कार्य ही संस्था चालू ठेवणार आहे. माझ्यासारखीच माणसे घडावीत अशी इच्छा व्यक्त करतो. मी माझ्या नावाने या पतसंस्थेत एक लाख रुपये ठेव ठेवतो. त्या रक्कमेच्या व्याजातून गावातील गरीब आणि होतकरू मुलाला बक्षीस म्हणून या पतसंस्थेने मदत करावी."
'विना सहकार नहीं उद्धार' या बोध वाक्याचा खरा अर्थ अजयला कळला होता. तो त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिला होता. म्हणून त्याचे भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. रौप्य महोत्सवी पतसंस्थेचा कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment