शब्दसुगंध दिवाळी अंक

*शब्दसुगंध*                                                                   *दिवाळी अंक २०२१*                                       
           'शब्दसुगंध दिवाळी अंक २०२१' हा दिवाळी अंक माझ्या वाचनात आला. अगदी वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा दिवाळी अंक आहे. या अंकाचे संपादक सकाळचे वार्ताहर  निवास मोटे हे आहेत. त्यांनी हा दिवाळी अंक अतिशय सुंदर असा केलेला आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर 'जीव माझा गुंतला'  या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री 'योगिता चव्हाण' यांचा अतिशय सुंदर व सुरेख असा फोटो आहे. अतिशय स्टॅंडर्ड  कागद या अंकासाठी वापरलेला आहे. सुंदर रंगछटांनी नटलेला हा अंक आहे. 
                    या अंकाची सुरुवातच प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डाॅ. चंद्रकुमार नलगे यांच्या 'नाजूक साजूक' या लेखाने झालेली आहे. या लेखामध्ये त्यांनी परड्याची कथा सांगितलेली आहे. घराशेजारी असणारी परडी कशी बदलत गेली. कमी होत गेली. पर्यायाने माणसा-माणसातील नाती, जिव्हाळा दुरावत गेला.  वास्तववादी चित्रण लेखकांनी केलेले आहे. 
               परडंसुद्धा माणसांची नाती जोडते. माणसांना आधार देते. परड्यात असणारे झाड नाजूक-साजूक फुलांना, फुलझाडांना सावली देते. ते झाड म्हणजे चाफ्याचा वृक्ष. अशी अनेक फुलझाडं, फळझाडं या परड्यामध्ये जगलेली असतात. आणि ही परडी माणसांना जगण्याची उमेद, पेरणा देतात. अशा अनेक परड्यांनी अनेक माणसांचा जीव वाचवलेला आहे. 
                 लेखक एका ठिकाणी म्हणतात, 'मध्यरात्री डोईवर आलेला चांदोमामा खाली वाकून स्मित करत असतो. घर शांत, परडं शांत, सारी सृष्टी शांत शांत. अशा या दुनियेचं प्रातिनिधिक रूप या परड्यात असतं. असे लेखकाने वर्णन केलेले आहे. लेखकांनी लेखाच्या शेवटी आज बदललेल्या परिस्थितीचे वास्तव दाखवलेले आहे. आज सिमेंटच्या इमारतींनी परड्याची जागा व्यापली आहे. आज परड्याची संजीवनी लुप्त झाली आहे. लेखक म्हणतात, "नवं विज्ञान आलं. जगण्याच्या रिती बदलल्या. राहण्याची शैली बदलली. गावाची रूपडी बदलली. गल्ल्या उठल्या. कौलारू घरं हळूहळू नाहीशी होत चालली. दगडी वाडे मोडीत निघाले. आणि सिमेंटची नगरी वसवली जाऊ लागली. त्याचबरोबर त्याला बंदिस्त कंपाउंड आली. बाहेरच्या जगाचा संपर्क तुटला. जिव्हाळा आटला. कालगतीने परडी नाहीशी झाली. आभाळ- माती यांचं नातं तुटलं. आता आतून कंठ फुटतो, 'कुठे गेले ते मायबाप असलेले परडं?" 
              अतिशय संवेदनशील विषय प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगेसर यांनी हाताळला आहे. 
            
                 दुसरा लेख 'माझी आनंदाची बाग' हा अर्थायनकार प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांचा आहे. प्रत्येक माणूस हा आपापल्या आनंदाच्या बागेचा मालक असतो. याची जाणीव अनेकांना असते. "माझी स्वतःची आनंदाची बागच आहे. या बागेत मी बसतो. फेर-फटका मारतो. येथील फुलांशी संवाद साधतो. आणि तृप्त होतो. ताजेतवाने होतो. नव्या जोमाने कामाला लागतो." असे लेखक म्हणतात. माणसाचं जीवन सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्ती यासाठी असते. प्रत्येकाची धडपड चालू असते. सुख, समाधान शोधायचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आनंदाचा मालक असतो. लेखकांना अगदी लहानपणापासून वाचनाची सवय होती. संत तुकारामांनी दिलेला संदेश-- 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण|| मन गुरु आणि शिष्य, करी आपुलीचे दास्य|| प्रसन्न आपआपणास, गती अथवा अधोगती||'  याप्रमाणे माणसाचे जीवन म्हणजे एक संघर्ष आहे. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. 
                लेखक शालेय वयापासूनच वाचनाच्या छंदाने झपाटलेले होते. कॉलेज, विद्यापीठात शिक्षण घेताना त्यांचे वाचन अधिक विस्तृत झाले. ३२ वर्षे न्यू कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा केली. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी मनन, चिंतन, वाचन सुरू ठेवले. आनंदी जीवन जगण्याची संधी शोधली. त्यांनी जी आनंदाची बाग म्हटली ते म्हणजे 'ग्रंथालय.' त्या ग्रंथालयाची साथ त्यांनी अजूनही जपलेली आहे. या त्यांच्या आनंदाच्या बागेतून त्यांना सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळाली. त्यांनी समाजाने आनंदी जीवन जगले पाहिजे तसेच प्रत्येकाने आपल्या जीवनात कोणता ना कोणता छंद जोपासला पाहिजे. आवडेल अशी आनंदाची बाग फुलवली पाहिजे. समाधानी झाले पाहिजे असा संदेश त्यांनी या लेखातून वाचक रसिकांना दिलेला आहे. 

                    '......आणि तिची वाचा गेली.' या लेखात युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 'फेसाटी' कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी 'गंगा' नावाच्या स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. अस्सल बोलीभाषेत असणारी ही कथा गंगेच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारी चित्रकथा आहे.
             गंगीचं लग्न होऊन ती सासरी गेली. गंगी सात-आठ वर्षाची असतानाच तिचा बाबा वारला. दुसऱ्याच्या रानात राबून तिचा भाऊ मोलमजुरी करायचा. दोन्ही बहिणी व भाऊ आनंदात जगत होती.  
             एके दिवशी गंगीचं लग्न झालं. स्त्रीच्या वाट्याला जी दुःखं येतात ती सारी दुःख तिच्या वाट्याला आली होती.  गंगीला तिच्या आईने आपल्याच भावाच्या मुलाला दिलेली होती. तरी तिला तिची सासू खूप त्रास द्यायची. कारण सासूला गंगी नकोशी होती. आपल्या मुलाला आपल्या पसंतीची बायको असावी असं तिला वाटायचं. 
                बाळंतपणासाठी गंगी माहेरी आली होती. तिला खंडू नावाचा मुलगा झाला होता. ती माहेर आहे तोपर्यंत तिच्या सासूने तिच्या नवऱ्याचे दुसरे लग्न केले. याचा पत्ता गंगेच्या माहेरात लागू दिला नाही. पण जेव्हा गंगीचा वसंतदादा गंगीच्या सासरी आला. तेव्हा त्याला सारी परिस्थिती समजली. तो आपल्या गावी गेल्यावर गंगीला सारं सांगितलं. पण गंगीला नीट बोलता येत नव्हतं. पण तिने खाणाखुणा करून भावाला विचारलं. तेव्हा तिला सगळेच कळलं. तिनं सगळेच मुक्यापणानं सहन केले. 

              'खाकी वर्दीतला देवमाणूस....' या लेखात संपादक निवास मोटे यांनी माजी गृहमंत्री कै. आर. आर. आबा यांचे बंधू करवीरचे पोलीस उपअधीक्षक(डी.वाय.एस.पी.) राजाराम पाटील हे सेवानिवृत्त झाले, त्यादिवशी आपल्या आई भागिरथी यांना सॅल्यूट करून कामावर गेले. याची सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर महाराष्ट्रभर चर्चा झाली. लेखकांनी याच राजाराम पाटील यांचे जीवन चरित्र या लेखात वर्णन केले आहे. त्यांचे शिक्षण कार्य, त्यांना २००६ आणि २०१९ साली असे दोनदा त्यांच्या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदके मिळाली आहेत. आर. आर. आबा गृहमंत्री असतानाही आपल्या कामासाठी सत्तेचा उपयोग करून घेतला नाही. अशा नि:स्वार्थी आणि नि:स्पृह राजाराम पाटील यांचे जीवन चरित्र लेखकाने या लेखात वर्णन केले आहे.      

               'मी पेंटर, मी व्हिडिओ जर्नालिस्ट.... ' या आत्मवृत्तपर लेखात प्रसिद्ध छायाचित्रकार बी. डी. चेचर, वडणगे यांनी आपली जडणघडण कशी झाली. आपल्याला कोणी कोणी कशी मदत केली. आपला दोष नसताना गरीब परिस्थितीमुळे एकच गणवेश वर्षभर घालावा लागतो. फाटकी कपडे, इनशर्ट न केल्यामुळे शाळेत मार खावा लागला.   
              मित्रांनी केलेली मदत, मित्रांमुळे 'सकाळ' मध्ये  नोकरी लागणे. जोतिबा देवस्थान परिसर, मायाक्का चिंचणी यात्रा येथील छायाचित्रण करताना आलेले अनुभव कथन केले आहेत. ते आजच्या डिजिटल काळातही आपले कार्य यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. या कामात त्यांना कुटुंबियांची मोलाची साथ मिळत आहे. 

                  जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत निकाडे यांच्या आगामी 'हमला' कादंबरीतील 'हमला' या शीर्षकानं कादंबरी उतारा या दिवाळी अंकांमध्ये घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या जीवनातील प्रसंग वर्णन केलेले आहे.  आबाचा शेती करण्याचा हातखंडा वेगळाच होता. आबा परोपकारी होता. काही वेळासाठी मागून नेलेली बैलं दिवसभर दिली नाही तरी आबा काही म्हणायचा नाही. विज्ञानवादी असणारा आबा हा शकुन-अपशकुनाच्या समजुतीच्या बाहेर गेला होता. आबाचा डॉक्टर झालेला मुलगा अचानक काही कारण घडल्यामुळे  मृतावस्थेत पडलेला होता. तेव्हा बाबाने आपला लहान मुलगा तुकारामला पोलीसपाटीलांना बोलावून आणण्यास सांगितलं होतं. 
              हा कादंबरी उतारा वाचताना संपूर्ण कादंबरी वाचण्यासाठी मोह होतो. एक आतुरता निर्माण होते. उत्सुकता निर्माण होते.         

                  'जगणं झोपडीतलं' हे आत्मकथन 'भंगार'  कादंबरीचे लेखक अशोक जाधव यांचे असून त्यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. भंगार गोळा करणे आणि भीक मागणे या अटीवर त्यांच्या आईने त्यांना शाळेत जाण्याची परवानगी दिली. अठराविश्व दारिद्र्य असूनही भंगार गोळा करून, भीक मागून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. 
               दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी ते खूप आजारी होते. पेपर लिहिण्यापुरती तेवढी सवलत होती. इतर वेळी त्यांना सलाईन लावूनच थांबावे लागत होते. बी.एड. करतानासुद्धा अनेक अडचणी आल्या. पण त्यावर मात करून त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी आपल्या समाजातील अनेक मुला-मुलींना शिक्षण देऊन मोठमोठ्या हुद्यावरती नोकरीला लावले आहे. अशोक जाधव यांचे 'भंगार' नावाचे आत्मचरित्र  २०१७ मध्ये प्रकाशित झाले.  त्याची पाचवी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. शिक्षणाने माणूस कसा बदलतो, समाज कसा बदलतो हे आपणास या आत्मचरित्रातून समजते. 

             'पानमळा ते भंडारी ग्रुप' असा नानांचा थरारक व संघर्षमय प्रवास संपादक निवास मोटे यांनी वर्णन केलेला आहे. कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरीतील रस्त्यावर उन्हात बसून पाने विकणारा, हलाखीत दिवस काढणारा व कालांतराने पानपट्टी चालवणारा आणि या दुकानातूनच भंडारी ग्रुपची निर्मिती करणारा माणूस म्हणजे नामदेव भंडारी होय. नामदेव भंडारी हे 'नाना' या टोपण नावाने परिचित आहेत. त्यांनी काढलेल्या या कष्टमय जीवनातून यशस्वी झालेल्या उद्योजकाचा पट लेखकाने मांडलेला आहे. 

              'रावसाहेब' कथेत परशराम आंबी यांनी अनपेक्षित भेटलेल्या व्यक्तीची ओळख. बालपणीच्या आठवणी, त्यावेळी असणारे संस्कार, शिक्षण याचा परामर्ष घेतला आहे. शेजारच्या मुलीला बहीण मानणे, राखी बांधणे, भाऊबीज साजरी करणे. नाहीतरआता 'सामनेवाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है|' या विचाराला फाटा देण्याचं काम या कथेतून केलेलं आहे. म्हणून या कथेतील नायक इतक्या वर्षांनंतर भेटलेल्या आपल्या मैत्रीणीकडून राखी बांधून तिला साडी चोळी करून पाठवणी करतो. 

                     अभिनयातच 'जीव माझा गुंतला' या मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्री योगिता चव्हाण यांची मुलाखत घेऊन तिने केलेल्या कार्याची माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून रसिक-वाचकांना करून दिली आहे. तिने अभिनयाची कशी सुरुवात केली? 'रासलीला' हे पहिले नाटक. 'गावठी' हा पहिला चित्रपट. 'जाडूबाई जोरात' ही पहिली टेलिव्हिजन मालिका, बाप माणूस, शालू, नवरी मिळे नवऱ्याला अश्या मालिकेतून तिने काम केले. तर 'जीव माझा गुंतला' यामध्ये अंतरा नावाच्या एका रिक्षावाल्या मुलीची भूमिका तिने केली आहे. या मुलाखतीतून अभिनेत्री योगिता चव्हाण यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व वाचकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

              आणि वाढला आंब्याचा गोडवा या लेखात सुधीर होनखांबे यांनी आपल्या शाळेची सुरुवात कशी झाली याचे वर्णन केले आहे. लेखक शाळा चुकवत. तेव्हा कुंडलिक मामाने सायकलला बांधून शाळेत आणला. बाईंच्या ताब्यात दिला. पाच वाजेपर्यंत सोडायचं नाही असा दम दिला. दहा पैसे खायला दिले. सुमनताईंनी पाच पैशाचे आंबा चाॅकलेट दिले. बाई म्हणाल्या, " बाळा, रोज शाळेला यायचं."       
                    " मला रोज खायला देणार का बाई? मग मी रोज शाळेला येईन." 
              "या आंब्याचं झाड लाव. मग रोज आंबे भेटतील."
          लेखकाने प्लास्टिक पानांचे दांडे लावले. त्याचे आंबे काही लागले नाहीत. पण शाळेला जाण्यासाठी गोडी लागली. 
          
             सन २०२१  सालचा 'शब्दसुगंध' दिवाळी अंक वाचण्यासाठी मिळाला. दोन वर्षानंतर दिवाळी अंक वाचण्यातील आनंद वेगळाच आहे. सर्वांग सुंदर दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल संपादक निवास मोटे यांना मनापासून धन्यवाद देतो. 
परशराम आंबी 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील