२. *सत्त्वपरीक्षा*

                            २.   *सत्त्वपरीक्षा*                                      
                 'टाॅऊन हाॅल' कंडक्टरचा आवाज झाला. मी हातात सुटकेस घेऊन एस.टी.तून खाली उतरलो. मनगटाकडे  पाहिले, तर तीन वाजून पंचवीस मिनिटे झाली होती. कशाचाही विचार न करता मी नाकासमोर चालू लागलो. कारण मला सोन्या मारुती ते वरणगे ही साडेतीनची बस पकडायची होती. त्यामुळे मला कशाचंच भान नव्हतं. 'मधू मधू' असा मागून आवाज आला. पण लक्ष न देता मी तसाच चालत राहिलो. रिक्षाचा हॉर्न वाजता वाजता अचानक कचकन ब्रेक लावल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर रिक्षा जवळ उभी होती. रिक्षातून बाजूला केशव उभा होता. 
             "अरं मधू, तुला किती हाका मारायच्या. तू आपल्या स्वतःच्या तंद्रीतच होतास. बरं मला सांग की मी ऐकलं ते खरं आहे का?" त्याचं आपलं बडबडणं सुरू होतं.   
               "अरं बाबा, थोडं थांबतोस का! मला आत नीट बसू तरी देतोस की नाही? की असाच बाहेर उभा करणार आहेस. सगळं सांगतो तुला." असं म्हणून मी रिक्षात बसलो. 
             तोरस्कर चौक ओलांडून ब्रह्मपुरीच्या उतरणीला रिक्षाचा वेग वाढू लागला. तशी माझ्या बोलण्याची गती वाढू लागली.......    
                चौथ्या वर्षापासून मी मामाच्या गावी राहत होतो. सात वर्षाचा झालो आणि मी शाळेची वाट धरली. पण एकट्याने नाही. माझ्याबरोबर अनिताही होती. अनिता म्हणजे माझ्या मामाची मुलगी. दोघांनीही हातात हात घालून शाळेत प्रवेश घेतला. मजल दरमजल करीत आम्ही नववीच्या वर्गात आलो. नववीची वार्षिक परीक्षा झाली. निकाल लागला. आणि माझ्या जीवनाला वेगळी सुरुवात झाली. अनिता तशीच पुढे शिकू लागली. मी मात्र मामाच्या शेतात राबू लागलो. 
            शेतातील सगळा कामधंदा मी एकटाच करत होतो. गुरांना वैरण टाकावी लागायची. शेणघाण काढावं लागायचं. इतकंच नव्हे तर घरातील झाडलोटही मलाच करावी लागायची. अनिता फक्त घरातून येरझाऱ्या घालत फिरायची. कॉलेजवरून आल्यावर ती पुस्तकं भिरकावून देत असायची. पुस्तकं व्यवस्थित ठेवण्याचं काम माझंच. पण त्यातही  एक वेगळा आनंद मिळायचा. किमान अनिताचा  हात माझ्या हातात असायचा. नुसत्या स्पर्शानंही नवचैतन्य येत असे. काम करायला अधिक जोम चढायचा........                                              आणि एक दिवस असा उगवला. "मध्या, तू आता फार शेफारला आहेस. आमच्याच तुकड्यावर लहानाचा मोठा झालास, पण खाल्लेल्या मिठाला जागला नाही. आमचंच खाऊन आमच्यावरच उलटलास. तुला लाज कशी वाटत नाही.  गप्प कसं बसायला येत नाही." असा मामा माझ्यावर संतापला.    
                "काय केलं मी? काय चुकलं माझं? तुम्हीच तर म्हणत होता की......." माझं बोलणं मध्येच तोडत मामा म्हणाला, "हा म्हणत होतो. पण आता म्हणत नाही. आणि पुढेही म्हणणार नाही. हे लक्षात ठेव. कोण तू? लावारिस. तुझ्यापेक्षा कुत्रं बरं. निदान खाल्लेल्या अन्नाला जागतं तरी.  तुझ्यासारख्या बेवारसी कुत्र्याला माझी मुलगी देऊ? त्यापेक्षा मी तिला नदीत ढकलून देईन."                                                      मी म्हणालो, "अनिताचा तरी विचार घ्या. तिला पसंत नसलो तर मी घर सोडून जातो."  
             "अनिता माझी मुलगी आहे. तिला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं. तिच्या भल्यासाठी तर आम्ही झटायला लागलोय. थांब, तिला आताच विचारतो.  अनिता बाहेर ये तू. तुला काय म्हणायचं ते सांगून टाक."
             ती बाहेर येऊन म्हणाली, "पप्पा तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तुमच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच मी वागेन." असं तिनं सांगताच मामा पुढे बोलूू लागले, "इतकं चांगलंं आणि मोठं घर शोधून सापडणार नाही. भरपूर शेती आहे आणि मुलगा नेव्हीत अधिकारी पदावर आहे. शिवाय एकुलता एक आहे. असं घर मिळाले आमचं मोठं भाग्यच म्हणायचं. जास्त पळापळ करावी लागली नाही, नाहीतर वधूच्या बघ बापाला किती अग्निदिव्य करावं लागतं ते त्यांनाच माहिती. या नादात तुला सांगायचं विसरूनच गेलो बघ मधू. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं समजूून सारं विसरून जा तू. लहानाचं मोठं केलं तुला, तशीच पुुुढची सोय करून देतो तुझी. तुला तुझ्या गावी  एक-दोन एकर शेत घेऊन देतो. तुझंं तू कष्ट कर आणि मिळवून खा. आम्हाला काही सुद्धा देऊ नकोस, पण मध्ये मध्ये काही तोंड घालू नकोस. 
"
            हे ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी भडकून उठलो आणि म्हणालो, "आत्तापर्यंत मी गप्प बसलो होतो. कारण मी आपला आदर करतो. परंतु माझी आता सहनशक्ती संपलेली आहे. आई-बापाविना पोरका असलो, म्हणून काय झालं? तुमच्या भिकेवर जगू मी? ते मला जमणार नाही. देवानं मला दोन हात दिलेत ते कशासाठी? कुठेही जाऊन मी माझं पोट भरेल. अनितासाठी  जगत होतो, जगत आहे, जगत राहीन. केव्हाही माझी गरज लागली, तर मला बोलवा. तुमच्या मुलीला घरगडी हवा असला तरीही मला बोलवा. मी आनंदाने येईल, पण कष्टाचं खायला." असं म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. 
             जग ही एक रंगभूमी आहे. प्रत्येक प्राण्याला ठराविक भूमिका नेमून दिलेल्या असतात. त्यात किंचितही फरक पडत नाही. पण त्या भूमिकेसाठी तो योग्य आहे की नाही याची परीक्षा घेतली जाते. तो त्यात बसला नाही तर त्याची जागा दुसरा घेतो. माझंही तसं झालं होतं. माझी उचलबांगडी झाली. महावीर नावाचा नवा नायक झाला. पण नायिका तीच होती अनिता....... 
               मी माझ्या गावी आलो. मिळेल ते काम करीत होतो. दुपारची सुट्टी झाली होती. जेवण केलं आणि बाहेर पडणार तोच एक पत्र माझ्या हाती पडलं. ते पत्र पाहून मी आश्चर्यचकित झालो. कारण ते पत्र अनिताचं होतं. यापूर्वी सहा पत्रं आली होती. पण एकाही पत्राचं मी उत्तर पाठवलं नव्हतं किंवा भेटायलाही गेलो नव्हतो. पण हे सातवं पत्र पाहून मी सर्दच पडलो होतो. कारण त्यात लिहिलं होतं....... 
                "प्राणप्रिय सख्या, 
                   खरंच माझं चुकलं. मला माफ कर. त्यावेळी मी काहीच करू शकले नाही. तुला पप्पांचा स्वभाव माहिती आहेच. ते फार तापट स्वभावाचे आहेत. माझा गळा घोटायला मागंपुढंही पाहिलं नसतं. तेव्हा मला नमतं घेणे फायद्याचं होतं. पण तू विचार न करताच निघून गेलास. 
                  माणूस जन्माला येऊन एकदाच प्रेम करतो. मीही केवळ तुझ्यावरच प्रेम केलं आहे. तुला मनानं वरले असून माझा पती मानते. माझ्या तनामनावर दुसऱ्या कुणाचाच अधिकार नाही तुझ्याशिवाय. माझ्या हृदयात तुझेच प्रतिबिंब दिसेल. माझा कण न् कण तुझाच आहे. तू घरातून गेल्यापासून माझी अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मला अन्न खावेसे वाटत नाही. घास तोंडाजवळ नेला तर तुझीच प्रतिमा दिसते. मला तुझी फार आठवण येते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी मी म्हसोबाच्या देवळात बसलेली असते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक एस.टी.मध्ये डोकावून पाहात असते. कदाचित तुझं दर्शन मिळेल ही आशा वाटते. परंतु प्रत्येक एस.टी. मला वाकुल्या दाखवून निघून जाते. शुक्रवारी तू मसोबाच्या देवळात ये. मला एकदा दर्शन दे. मी धन्य होईल. माझी इच्छा तृप्त होईल. मग मला खरंच दर्शन देशील ना?"
              .........पत्राच्या धुंदीत म्हसोबाच्या देवळाजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली मी केव्हा आणि कसा येऊन पोहोचलो हे मला कळलंसुद्धा नाही. कसलीही हालचाल न करता पुढचा सर्व प्रकार पहात मी होतो. पण पुढे जायचं काही धाडस होत नव्हतं. अनिता देवळाच्या दारात सुन्नपणे बसून होती. तिचे डोळे सुजून लालेलाल झालेलं होते. मनात चलबिचल सुरू झालेली होती. परंतु जागचे पाय काही हलले नाहीत. 
               सूर्य हळूहळू मावळतीला झुकू लागला. तिची हालचाल अधिक तीव्र होऊ लागली. सूर्य क्षितिजापलीकडे बुडाला सर्वत्र संधिप्रकाश पसरला होता. ती उठली. नदीच्या दिशेने जाऊ लागली. तोच माझ्या तोंडून 'अनिता' असे शब्द बाहेर पडले. ती मागं वळली. आणि  'मधू' म्हणून धावतच आली आणि माझ्या बाहूपाशात विसावली. 
                मी तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो, "अगं अनिता, माझी अवस्था तुझ्याहून बिकट झालेली आहे. माझं मन कशातच लागत नाही. मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा कशात तरी मन गुंतवावे, म्हणून मी कामावर जातोय. आपलं प्रेम हे अमर आहे. त्या प्रेमात वासना नाही अगर स्वार्थीपणा नाही. म्हणूनच त्याग करण्याचा मी विचार केला आहे. तुला तो पटायचा नाही. परंतु माझा अंतिम निर्णय झाला आहे. अनिता तू माझ्या त्यागाचा स्वीकार कर. जे प्रेमात यशस्वी होतात, ते जीवनात यशस्वी होतात. परंतु त्यांना जीवनात तडजोड करावी लागते. जे यशाच्या शिखरावर चढतात. ते एक दुजे के लिए खत्म होतात. पण  अनिता, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. तू कुठेही असलीस तरी चालेल. पण आनंदात राहा. मामानं जो निर्णय घेतला आहे तो तुझ्या सुखासाठीच ना! तुझं सुख तेच माझं सुख. असा अविवेक करू नकोस. शांतपणे तू घरी जा आणि मामानं ठरवलेल्या मुलाशी लग्न कर." असं सांगून मी तिचा निरोप घेतला. 
             असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी मामाचं पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं- "येत्या सोमवारी अठरा तारखेला अनिताचं लग्न महावीर याच्याशी करायचं ठरवलेलं आहे. तरी तू रविवारी ये."
            शनिवारी मला पत्र मिळालं होतं. मी रविवारी सकाळी लवकर उठून सारे काम आटोपून मामाचं घर गाठलं. माझ्या अनिताचं लग्न होणार होतं.  जेव्हा मी मामाच्या घरी पोहोचलो, तेव्हा लग्नाची वेळ होऊन गेली होती. घरी येऊन पाहतोय तर लग्नाची काहीच तयारी दिसत नव्हती.  तसं मी मामाला विचारलं. मामाने सांगितलं, "महावीराची सक्त ताकीद आहे की त्यांना लग्न खर्च केलेला आवडत नाही. रजिस्टर पद्धतीने त्यांना लग्न करायचं आहे. ते उद्या सकाळीच रजिस्टर ऑफिस मध्ये येणार आहेत. आपण सर्वजण तेथे सकाळीच जाणार आहोत. अनिताच्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं. ती त्या दिवशी खूप आनंदात दिसत होती. मसोबाच्या देवळात पाहिलेली ती हीच अनिता आहे. यावर माझा माझ्याच डोळ्यावर क्षणभर विश्वास बसत नव्हता. पण मला समाधान वाटत होतं. कारण माझी अनिता आनंदात आहे. तिच्या आनंदा माझा आनंद आहे.
             अनिताची कळी खुललेली पाहून मला शर्मिला टागोरची आठवण झाली. कारण शर्मिला हसताना तिच्या गालावर सुंदर खळी पडायची. तेव्हा ती फारच मोहक दिसायची. मला त्या दिवसाची आठवण झाली. ज्या दिवशी मी अनिताबरोबर प्रयागच्या संगमावर गेलो आहे. तिथे असलेल्या घाटाच्या पायरीवर बसून पंचगंगेच्या पाण्यात पाय सोडून बसलेलो आहे. नदीच्या पाण्यावर पडलेली औदुंबराची सावली. त्याच्या पानांतून पाण्यावर पडलेली सूर्याची किरणे. किती रम्य देखावा दिसत होता तो! त्या वातावरणात दोघांची चाललेली पोपटपंची..... 
                मामाचा आवाज कानावर आला आणि मी भानावर आलो. मी म्हणालो, "सर्व तयारी झालेली आहे. गाडी दारात आली की निघायचं आहे."
               सकाळी दहाची वेळ. तासभर आधीच रजिस्टर ऑफिसमध्ये गेलो होतो. ऑफिसमध्ये समोरच्या खुर्चीत मॅनेजरसाहेब बसले होते. त्यांच्यासमोर टेबलाच्या होते. टेबलाच्या बाजूला चार खुर्च्या मांडलेल्या होत्या. एका खुर्चीत मामा बसलेले होते. दुसऱ्या खुर्चीत मी बसलेलो होतो. तिसर्‍या खुर्चीत अनिता बसलेली होती. आणि चौथी खुर्ची रिकामी होती. ती नवरदेवासाठी म्हणजेच महावीरसाठी होती. चालू घडामोडीबाबत चर्चा सुरू होती. अकरा वाजत आले. तसे मॅनेजरसाहेब म्हणाले, "चला आटपा लवकर. वेळ होत आलेली आहे. तुमचे पाहुणे कुठे आहेत?" त्यावर मामा म्हणाले, "ते नेव्हीत आहेत."
             "काय?" साहेब ताडकन उडालेच. 
             "तसं नव्हे साहेब. ते नोकरीला नेव्हीत आहेत. त्यांनी परस्पर येथे येतो असे सांगितलेलं आहे. ते दुरून येणार आहेत म्हटल्यावर थोडा उशीर होणार. आणखी थोडा वेळ वाट पाहूया आपण." मामाने स्पष्टीकरण केले.
               घड्याळ आपलं काम चोखपणे करत होतं. टिक टिक करत 'आला क्षण गेला क्षण' सांगत होतं. थोडं वैतागूनच मॅनेजरसाहेब म्हणाले, "अहो, बारा वाजले की आता. तुमचे पाहुणे अजून कसे काय आले नाहीत? ते येण्याचं काही दिसत नाही. आता कसं करायचं हो?" 
                  तेव्हा अनिता रडतच म्हणाली, "आता माझेच बारा वाजण्याची वेळ झालीया. पप्पा आता कसे करायचे हो?"
तिला समजावत मामा म्हणाले, "आत्तापर्यंत यायला हवे होते. पण कसे काय आले नाहीत ते? कुणास ठाऊक काय झाले असेल? बहुतेक पाकिस्तानशी युद्ध ठरल्यामुळे अचानक त्यांना युद्धावर जाणे भाग पडले असावे. रजा नामंजूर झाली असावी.  सगळीच काळजीत पडली होती. खूप अस्वस्थ झालेलो होतो. असं व्हायला नको होतं. सारं सुरळीत पार पडत होतं. अगदी अखेरच्या क्षणी असं होऊन मनाला बरं वाटत नव्हतं. मला अनिताची खूप काळजी वाटत होतं. ती दुःखी झालेली मला बघवेना. त्यातूनच धीर देत मी म्हणालो, "थोडं दिवस वाट पाहू या.  त्यांना काही अडचण आलेली असेल, तर लग्न काही दिवस पुढे ढकलू या." 
              अनिता तर केविलवाणी झाली होती. तिच्या चेहऱ्याकडं पाहणंसुद्धा नको वाटत होतं. ती म्हणाली, "कसं करायचं, पप्पा? कसं व्हायचं माझं? तुम्हीच सांगा, काय करू मी?"  तिच्या डोळ्यातून आसवं टिपकत होती. 
                 "हे बघ बाळ, तू काही काळजी करू नकोस. यातून काहीतरी मार्ग निघेल. अशी निराश होऊ नकोस तू. आणि हा मधू इथं असताना तू का भितेस?" 
                मी तर त्यांच्याकडे टक लावून पाहू लागलो. ते असं का म्हणाले असतील याचा मला काही अर्थ कळला नाही. मी त्याला विचारलं, "मी काय करू शकतो?"
          "तूच तर सारं करू शकतोस." ते म्हणाले. 
          "मग सांगा मी काय करावं? आत्तापर्यंत मीच करत आलोय. काय करायचं तेवढे सांगा. "
           "आत्ताच अनिताचं लग्न करायचं."
            "पण ते कसं आणि कोणाशी?"
            "कोणाशी म्हणून काय विचारतोस तू? अरं तुझ्याशी"
            "काय?" माझ्या तोंडात कुणीतरी मारल्यासारखा मी तसाच उभा राहिलो होतो.
             " होय तुझ्याशीच. तूच मधू आणि तूच महावीर. कारण यातला महावीर हा खोटाच होता. तुझी परीक्षा घेण्यासाठी महावीर हे पात्र निर्माण करावं लागलं होतं. खरंच तुझं प्रेम अनितावर आहे की माझ्या पैशावर आहे हे पाहण्यासाठी सारं नाटक करावं लागलं मला. माझी खात्री झाली. तू पास झालास माझ्या परीक्षेत.  हा घे हार आणि घाल अनिताच्या गळ्यात. मॅनेजरसाहेब वधू आणि वर इथंच आहेत. घ्या रजिस्टरवर त्यांच्या सह्या."
              " मामा, तुमच्या या हारातच माझी जीत आहे खरंच मामा तुम्ही ग्रेट आहात." मी म्हणालो. 
            अनिताही मनापासून हसत होती. रेकॉर्ड सुरू झालं होतं. आणि त्यावर मंगलाष्टका वाजू लागली..........
          'गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा.....' 
               

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील