वाचन एक छंद
वाचन एक छंद
मला चांगलंच आठवतं की माझ्या लहानपणी गावात काही घरामध्येच लाईट आलेली होती. अनेक घरात दिवा, कंदील यांच्या प्रकाशातच वाचन, लेखन करावं लागायचं. आमच्याच घरी नव्हे, तर आमच्या गल्लीतही लाईट नव्हती. मी अभ्यासासाठी समोरच्या यशवंत बाबू पाटील (वकील) यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी दिवा घेऊन वाचन करत असलेला मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. वाचताना खाली वाकल्यानंतर माझ्या डोक्यावरील केसांना धग लागून चर चर आवाज झाल्याचे अजूनही आठवते.
मी माझ्या मित्राबरोबर शाळेला प्रथमतः गेलो तो दिवस मला आठवतो. गावात बालपणी श्रावण महिन्यात पोथी-पुराणांचे वाचन व्हायचं. त्यावेळी आम्ही ते ऐकायला जात होतो. प्रसाद खायला मिळतो या आशेने अधिक जात होतो. त्यावेळी पांडवप्रताप, श्री विजय, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचले जात होते. ग्रंथाचा अर्थ सांगितला जात होता. त्यावेळी मला फारसे कळत नव्हते. पण मला वाचनाची गोडी लागण्यासाठी ते फार महत्त्वाचे ठरले असे वाटते. लहानपणी वाचन म्हणजे अभ्यासाची पुस्तके होती. आम्हाला शिकवायला काकासाहेब जाधव नावाचे जोतिबा डोंगरावरचे शिक्षक होते. ते आम्हांला अनेक गोष्टी सांगत होते. अगदी पोती भरून त्यांच्याकडे गोष्टी होत्या.
आम्ही १९७८-७९ साली चौथ्या इयत्तेत होतो. मला स्कॉलरशिप परीक्षेला काकासाहेब जाधव गुरूजींनी बसवले होते. त्यांनी खूप अभ्यास करून घेतला होता. त्याकाळी आमच्या वर्गातील आम्ही चौघे विद्यार्थी स्काॅलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलो होतो. यामध्ये मी, संजय कांबळे, शिवाजी जाधव आणि मिलिंद कांबळे. माझी हुशारी पाहून मला काकासाहेब जाधव यांनी त्यावेळी राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर या शाळेच्या प्रवेश परीक्षेत बसवले होते. त्या शाळेमध्ये माझी निवड झाली. त्यावेळी माझा सत्कार काका जाधव गुरुजींनी केला होता. त्यावेळी १५ पैसे चहा आणि ३५ पैसे भजी किंवा वडा होता. मला पाचशे रुपये बक्षीस मिळाले होते. त्यातून एक पत्र्याची पेटी, कपडे, अंथरून पांघरूण घेतले होते.
राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेतला आणि माझ्या वाचनाला खरी सुरुवात झाली. त्या शाळेमध्ये चांदोबा, चंपक अशी मासिके येत होती. ती शाळा जिल्हा परिषदेची असल्यामुळे त्या शाळेमध्ये समृद्ध असे ग्रंथालय होते. शिक्षकही खूप मेहनत करून घेत होते. त्या शाळेत अनेक उपक्रम राबवले जात होते. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जात होती. मला वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विद्यानिकेतनचे प्राचार्य जो.म.साळुंखेसर यांचे योगदान मोठे आहे. तर लेखनासाठी मला जी. टी. महाजनसर यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी भित्तिपत्रकासाठी स्वलिखित लेखन करण्यास सांगितले होते. लेखनाची आवड निर्माण झाली ती इयत्ता सातवीला असताना. त्यावेळी मी 'दोन केळे' ही कथा
लिहिली होती. तर इ. ९ वीला असताना 'विशाल भारत' नावाची एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण केली होती. त्यावेळी श्री. पेडणेकरसरांनी मला ५१ रुपयाचे बक्षीस दिले होते.
१९७९ ते १९८५ या सहा वर्षांमध्ये कथा, कविता यांचे वाचन केले. त्यावेळी दिवाळी अंक प्रकाशित होत होते. त्यातील विविध विषयावरील कवितांचा संग्रह करण्याचा उपक्रमही सांगितला जात होता.
शाळेतून बाहेर पडल्यानंतर कॉलेज जीवनात सायन्सला असल्यामुळे थोडीशी वाचनात मरगळ आली होती. मात्र पुढारी, समाज यासारख्या वर्तमानपत्रांचे वाचन सुरू होते. परंतु घरच्या परिस्थितीमुळे आणि सायन्सची आवड नसल्यामुळे मी बारावी सायन्स नापास झालो. त्यानंतर बारावी आर्टसला प्रवेश घेऊन वाचनाची गोडी वाढवली. परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाले बारावीनंतर संयुक्त बी.ए.बी.एड. महावीर कॉलेजला प्रवेश घेतला. बी. ए. बी. एड. करत असताना वाचन म्हणावे तितके होऊ शकले नाही. जून १९९२ साली बी.एड. पूर्ण झाले. नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते येथे शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. खऱ्या अर्थाने वाचनाला तिथूनच सुरुवात झाली. शाळेच्या ग्रंथालयात असणारी अनेक पुस्तके वाचून काढली. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडेसर यांनी वाचनाबरोबरच लेखनाला प्रोत्साहन दिले. शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' कादंबरी वाचली. 'माती, पंख आणि आकाश' हे ज्ञानेश्वर मुळे यांचे आत्मचरित्र, लक्ष्मण माने 'उपरा', लक्ष्मण गायकवाड 'उचल्या', दया पवार 'बलुतं', नामदेव व्हटकर 'माझ्या जन्माची कथा' डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे 'खाली जमीन वर आकाश' चंद्रकुमार नलगे 'रातवा' अशी आत्मचरित्रे वाचली.
चंद्रकांत निकाडेसर यांचे 'कुडतं' ग्रामीण कथासंग्रह, 'बोन्साय', 'विटाळ' असे एकांकिका संग्रह वाचलेले आहेत. राजाराम तावडे यांचे 'साखरू' आईचे चरित्र व 'मन वढाळ वढाळ' कादंबरी. डॉ. श्रीकांत पाटील यांची 'गोट्या', 'गाव शिवारातील फिनिक्स', व 'लाॅकडाऊन' ही कोरोना महामारीवरील वैश्विक कादंबरी वाचलेली आहे. याबरोबरच श्याम कुरळे, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, मनोहर मोहिते, संभाजी चौगले अशा लेखकांच्या पुस्तकांचाही आस्वाद घेतला आहे.
'वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे वाचन कला छंद म्हणून जोपासली आहे. विंदा करंदीकरांनी म्हटले आहे, 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे' यात थोडासा बदल करून मला असे म्हणावे वाटते, 'लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणार्याने वाचत जावे, वाचता वाचता एक दिवस लिहीत जावे.' याप्रमाणे मी वाचत गेलो. वाचता वाचता लिहीत गेलो. यातूनच 'कर्तव्य' एकांकिका संग्रह आणि 'यशस्वी नाट्यछटा' हा नाट्यछटा संग्रह ही पुस्तके प्रकाशित झाली. विविध वर्तमान पत्रे, दिवाळी अंकांतून कथा प्रकाशित झाल्या.
वाचनाने आणि लेखनाने मला समृद्ध केले. पुस्तक हे मस्तक घडवत असते याचा अनुभव मला घेता आला हे माझं परम भाग्य समजतो. मोबाईलच्या काळातही वाचन संस्कृती जतन करून ठेवली पाहिजे. भरपूर वाचन करावे असे मी वाचक रसिकांना विनंती करतो.
विश्वास सुतारसाहेब यांनी मला या लेखाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. लेखन प्रपंच थांबवतो.
Comments
Post a Comment