इच्छा असेल तर मार्ग दिसेल
एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात वडील, मुलगा व त्याच्या तीन बहिणी असा परिवार राहत होता. लहान मुलाची खूप मोठी स्वप्न होती. पण आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण काही करू शकणार नाही असे त्याला वाटत होते. तो उदास उदास वाटत होता. त्याच्या वडिलांना कळलं की हा उदास आहे. त्याच्या वडिलांनी मनोमन विचार केला 'हे असंच चालू राहिलं तर संपवून टाकेल सगळं. पुढं काहीच नाही घडणार.' त्याच्या या उदासपणातून त्याला बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलं.
एके दिवशी त्याच्या वडिलांनी एक अत्यंत फाटकं व जीर्ण झालेलं कापड घेतलं. त्या कापडाचा एक रुमालाएवढा तुकडा फाडला. ते म्हणाले, "बाळा हा तुकडा कोणी दहा रुपयाला विकत घेतं का बघ? " अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं,
" किती जुनं कापड आहे हे बाबा? कोणी घेईल का? "
" प्रयत्न तरी करून बघ."
तो मुलगा म्हणाला, "ठीक आहे."
ते कापड स्वच्छ धुवून व इस्त्री करायची म्हणून आपल्या अंथरुणाच्या खाली ठेवले. सकाळी उठून ते कापड घेऊन तो बाजारात गेला . तो ओरडू, लागला, " घ्या दहा रुपयाला कापड, घ्या रुपयाला कापड." एक तास झाला . दोन तास झाले, तीन तास झाले . बघता बघता सात तास झाले. शेवटी एक माणूस आला. त्याने विचारलं, "बाळा कितीला आहे हे कापड?"
"दहा रुपये " म्हणून मुलाने सांगितले. त्या माणसाने दहा रुपये दिले. तो माणूस कापड घेऊन निघून गेला. मुलगा आनंदाने दहा रुपये घेऊन उड्या मारत मारत घरी आला. 'बाबा दहा रुपये, बाबा दहा रुपये.' बाबांना खूप आनंद झाला. बाबांनी त्याला कुशीत घेऊन कवटाळले. म्हणाले, " बरं झालं. या दहा रुपयांची मोठी मदत मिळेल आपल्या कुटुंबाला.* तो मुलगा आनंदित होऊन झोपला.
दुसऱ्या दिवशी त्याच कापडाचा दुसरा तुकडा बाबांनी मुलाला दिला. ते म्हणाले, " बाळा याच कापडाचा तुकडा तू काल दहा रुपयाला विकलास , आज याच कापडाचा तुकडा कोणी चाळीस रुपयाला विकत घेते का बघ?"
"बाबा! काल याच कापडाचा तुकडा दहा रुपयांना विकता विकता सात तास गेले. त्याच कापडाचा तुकडा कोण चाळीस रुपयाला विकत घेणार?"
बाबा म्हणाले, "अरे बाळा, प्रयत्न तरी करून बघ. चाळीस रुपये आले तर आपल्या कुटुंबाला खूप मोठा हातभार लागेल. कर ना प्रयत्न." बाबांची ती अर्जव बघून मुलगा म्हणाला, "ठीक आहे. हे कापड चाळीस रुपयाला विकायचा मी प्रयत्न करतो."
मुलाने तो कापडाचा तुकडा रात्री स्वच्छ धूवून इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंथरूणाखाली ठेवला. सकाळी लवकर उठून तो बाजारात गेला. तासभर बघितलंं पण तो फाटक्या कापडाचा तुकडा कोणी चाळीस रुपयाला विकत घेईना. त्याला अचानक एक कल्पना सुचली. तो परत घरी आला. आपल्या शाळेचं रंगरंगोटीचं साहित्य काढलं. त्या कापडाच्या तुकड्यावर डोनाल्ड डकचं चित्र काढलं. ते कापड घेऊन तो शाळेच्या बाहेर उभा राहिला. त्याला माहीत होतंं की लहान मुलांना कार्टून खूप आवडतं. म्हणून तो एका शाळेच्या बाहेर उभा राहून चित्र विकत होता. शाळा सुटल्यानंतर तो म्हणू लागला, डोनाॅल डकचं कापड, डोनाॅल डकचं कापड, पण मुलं बघत बघत जाऊ लागली. एका लहान मुलाने आपल्या आईकडे हट्ट धरला , "मला ते डोनाॅल डकचं कापड पाहिजे." त्या माऊलीला काही बोलता येईना. शेवटी नरमली. तिने ते डोनाॅल डकचं कापड चाळीस रुपयाला विकत घेतलं. पण या बारा तेरा वर्षांच्या मुलाला विचारलं, "बाळ तू का असं शाळेबाहेर उभारून रुमाल का विकतोयस? " त्यावेळी तो मुलगा म्हणाला, "माझी परिस्थिती नाही. म्हणून माझ्या वडिलांनी मला हे कापड चाळीस रुपयाला विकायला सांगितले. म्हणून मी इथे कापड विकायला आलोय." त्या माऊलीला मोठा आनंद झाला. त्या माऊलीने त्याला आणखी शंभर रुपये दिले. तीी म्हणाली, " हे शंभर रुपये माझ्याकडून तुला भेट म्हणून ठेव." तो आनंदाने घरी आला. वडिलांना सर्व हकिकत सांगितली.
बाबा म्हणाले, "शाब्बास !" आपल्याला खूप मोठी मदत होईल या पैशांची. तो मुलगा परत आनंदाने झोपी गेला.
दोन दिवस निघून गेले. परत त्याच कापडाचा तिसरा तुकडा फाडून त्या मुलाला दिला व म्हणाले, "हा तुकडा कोणी दोनशे रुपयाला विकत घेते का बघ?"
" अहो बाबा, दहा-वीस रुपयाला कोणी घेत नव्हतं हे कापड. मग हे कापड दोनशे रुपयाला कसं घेईल? काहीतरी काय सांगताय!"
" हे बघ बाळा, दहा रुपयाचे कापड तुला विकायला सांगितलं, तेव्हा पण तू असाच म्हणाला होतास. पण घेतलं ना कुणीतरी! तेच कापड चाळीस रुपयाला विकायला सांगितलं. त्यावेळी पण तू म्हणालास की कोण घेणार? पण घेतलं ना तेही कापड. मला माहिती आहे की आत्तासुद्धा हे कापड दोनशे रुपयाला कोणीतरी घेईल. तू प्रयत्न तरी कर. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही विकलं गेलं कापड तर आपलं नुकसान तरी नाही होणार? झाला तर फायदाच होईल."
हा मुलगा परत तयारीला लागला. आता दोन वेळचा अनुभव पाठीशी होता. दोनशे रुपयाला कापड विकायचं होतं. रात्री स्वच्छ धुवून इस्त्री करायची म्हणून आपल्या अंथरूणाखाली कापड ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्याला बातमी लागली की, आपल्या शहरात शूटिंगसाठी ऐश्वर्या राॅय येणार आहे. ती कापड घेतलं आणि जिथं शूटिंग चालू आहे तिथं हा मुलगा गेला. उंचीने लहान असल्यामुळे याच्या त्याच्या पायातून तो पुढे गेला. ऐश्वर्या राॅयजवळ पोहोचला. तो म्हणाला, "मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे, मला माझ्या रुमालावरती तुमची सही द्याल का? ऐश्वर्या राॅयला त्या छोट्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं. तिने ते कापड घेतलं आणि त्या कापडावर आपली सही केली. सही केल्याबरोबर ते कापड घेऊन तो मुलगा धावत पळत बाजारात आला. एका कट्ट्यावर उभा राहून ओरडू लागला ,"ऐश्वर्या राॅयनं सही केलेलं कापड फक्त दोनशे रुपयाला, ऐश्वर्या रॉयने सही केलेलं कापड फक्त दोनशे रुपयाला ऐश्वर्या राॅयची सही असल्यामुळे त्याचं ते कापड एका मिनिटात विकलं गेलं. कापड घेण्यासाठी तेथे दोन व्यक्ती आल्या. "कितीला आहे कापड?" असं त्या मुलाला विचारलं.
तो मुलगा म्हणाला, "फक्त दोनशे रुपये." त्यातील एक व्यक्ती म्हणाली, "मी तुला या कापडासाठी तीनशे रुपये देतो पण मला हे कापड दे." इतक्यात दुसरी व्यक्ती म्हणते, "मी तुला चारशे रुपये देतो. मला ते कापड दे." त्या व्यक्तीने चारशे रुपये त्या मुलाला देऊन टाकले. तो माणूस निघून गेला. हा मुलगा चारशे रुपये घेऊन आनंदाने उड्या मारत घरी गेला. "बाबा चारशे रुपये, बाबा चारशे रुपये असे म्हणत घरी पोहोचला. त्याच्या बाबांंनी त्याला कुशीत कवटाळलं. बाबा म्हणाले, "शाब्बास! मला माहिती होतं की तू हे करून दाखवशील. बाळा, तू याच्यातून काय शिकलास?"
तो मुलगा म्हणाला, " करायची इच्छा असेल, तर मग मार्ग सापडतो." त्याचे वडील म्हणाले, "मीपण तुला हेच सांगत होतो. एका फाटक्या तुटक्या कापडाची किंमत चारशे रुपयेपर्यंत जाते, तर एका सरळ मुलाची किंमत एक अब्जापर्यंत का नाही जाऊ शकत? तू काम तर कर सुरू . मग बघ कसे मार्क मिळतात ते!" त्यांचे हे बोलणे ऐकून त्याने शिक्षणाला सुरूवात केली.
दिवसामागून दिवस सरले. एके दिवशी तो मुलगा आपल्या बापाला खाकी वर्दीवरती सॅल्युट मारत म्हणाला, " बाबा, मी आय.पी.एस. अधिकारी झालो आहे."
केदार उत्तम मोरे इ. १० वी
Comments
Post a Comment