आत्माराम - नाट्यछटा - ११
नाट्यछटा ---
'आमुचा रामराम घ्यावा'
नमस्कार मंडळी. कसे आहात? बरे आहात ना? बरे असायलाच पाहिजे. अहो, इकडे तिकडे काय बघताय? मी तुमचा आत्माराम बोलतोय. होय मी आत्मारामच आहे. अहो, तुमच्यासमोर असलेल्या फोटोतील आत्माराम बोलतोय. अहो राम तर कधीचा गेला. मी फक्त त्याचा आत्मा बोलतोय. काय म्हणताय? तुमचा विश्वास बसत नाही. कसा बसणार? फोटोतील व्यक्ती कधी बोलते का? नाही ना! अहो सही रे सहीवाला भरत जाधव यांच्या 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटामधील फोटोतील माणसं बोलतात ना! हे तुम्ही पाहिलेच आहे ना! काय म्हणताय? हा चित्रपट आहे! चित्रपटात तसं काहीबी चालतंय! अहो, तसाच मीसुद्धा आज तुमच्याशी बोलतोय. हे मात्र चित्रपट किंवा नाटक समजू नका बरं का? खरंच मी या फोटोतील आत्मारामचा आत्मा बोलतोय. अहो मंडळी, आज तुम्ही माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने येथे जमलेला आहात ना! होय रं माझ्या लेकरा. आज बरोबर एक वर्ष झालं मला जाऊन. म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात. माझ्या आठवणी जागृत करण्यासाठी. हां बरोबर आहे. माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने भोजन करण्यासाठीही आलेले आहात ना? बरोबर आहे ना माझं? पण खरं सांगा की यामध्ये किती जणांना माझ्या विषयीचा तळमळा आहे? खरंच माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे किती जण आहात? माझ्या पत्नीला बरं वाटावं म्हणून काहीजण आलेले आहात. माझ्या मुलाला बरं वाटावं म्हणून काहीजण आलेले आहात. बरोबर आहे ना मंडळी! काहीजण जेवायसाठी आलेली आहात. तर काहीजण या निमित्ताने एकमेकांची भेट होतीया म्हणून आलेली आहात. कुणी मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी काही जमतंय का पाहण्यासाठी आलेली आहेत? मात्र खरं सांगायचं म्हणजे माझ्यामुळे झालेल्या दु:खानं कोण आलं आहे हे शोधणे कठीणच आहे!
अहो मंडळी, तुम्ही माझ्या पत्नीच्या डोळ्यात पहा. खरं दुःख म्हणजे काय असतंय हे तिच्या डोळ्यात पाहिल्यावरच तुम्हांला कळेल. कारण तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला सोडून गेलेला आहे. एक वर्षभर ती माझ्या आठवणीशिवाय राहू शकली नाही. दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही. आणि बरं का? हा माझा मुलगा सर्व काही करत आहे. माझ्या स्मृतीच्या निमित्ताने गोड गोड जेवणाचा बेत त्यानं ठेवलेला आहे. पुरी बासुंदीचं झकास जेवण केलेलं आहे. दूर गावावरून माझी मुलगी आलेली आहे. माझ्या कार्याच्या आठवणी आपणांस आता येणार आहेत. आपल्यातील काहीजण दोन शब्द व्यक्त करणार आहात. पण मी तुम्हांला सांगू का? हे सारं जग नश्वर आहे. माणसाच्या आयुष्याबरोबर काय येतं? सांगा ना? तर त्यानं केलेलं कार्य, त्यानं जोडलेल्या माणसांच्या भावना. पण तेही फारसं खरं नाही असं मला वाटतं. मी माझ्या आयुष्यात खूप कार्य केलं. माणसं जोडून गावात, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्यपातळीवर अनेक संघटना उभ्या केल्या. अनेक माणसं जोडली; पण जेव्हा माझा देहान्त झाला. त्यावेळी त्यातील किती माणसं हजर होती? किती माणसांनी माझी आठवण काढली असेल? आणि किती जण माझ्या अंत्यविधीसाठी आले असतील? अहो, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं हजर होती. होय बाळ, तू म्हणतोस ते बरोबर आहे. कोरोनाच्या भीतीनं माणसं आली नसतील. अरे पण रक्षाविसर्जनाला किती माणसं उपस्थित होती? तीही अवघी विसेक माणसंच हजर होती. पण त्यातील किती माणसं भावनाशील होती? माझ्याबाबत आदर होता. जी माणसं आली होती. कुणी आलं होतं ते आपल्या मुलग्याचं किंवा मुलगीचं कुठं लग्न जमतं का? त्याचा धागादोरा मिळेल का? यासाठी कोणी आलं होतं. तर कुणी आलं होतं की, मी नाही गेलो तर दुसरे लोक काय म्हणतील? म्हणून ती माणसं आलेली होती. 'मरावे परी कीर्तीरुपी उरावे' असं संत रामदासांनी म्हटलं आहे. मी माझी कीर्ती मागे ठेवली, पण त्याची किती जणांनी आठवण ठेवली आहे? खरंच आजचं जग इतकं बदललं आहे, की ते भावनाशून्य झालेलं आहे. कोणीतरी सांगितलं आहे की नातेवाईक, मित्रमंडळी ही स्मशानभूमीपर्यंत येतात. तर पत्नी ही दारापर्यंत येते. पण तिलाच खरं दु:ख झालेलं आहे. बरं मला आता गेलं पाहिजे. खूपच वेळ झाला आहे. नमस्कार येतो आता. तुमचं आपलं चालू द्या नेहमीप्रमाणे. मला निरोप द्या आता. 'आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा.
लेखन :- परशराम आंबी
Comments
Post a Comment