शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
*शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ*
वनात एक सिंह राहत होता. त्याच्या अंगात शक्ती फार होती. त्यामुळे तो गर्वाने फुगून गेला होता. त्याने त्या वनातील, वाटेतील हरणे, ससे वगैरे प्राणी मारून आपली उपजीविका करावी असा त्याचा क्रम चालू होता. हा असाच प्रकार चालू राहिला तर वनात एकही प्राणी जिवंत राहणार नाही असा त्या वनातील सर्व प्राण्यांना मोठा धोका वाटत होता. म्हणून सर्व प्राणी मिळून सिंहाकडे गेले. त्यांनी मोठ्या नम्रतेने सिंहाला विनंती केली, "महाराज, खरे पाहिले तर आपली भूक शमविण्यासाठी रोज एक प्राणी पुरा होतो. असे असताना आपण आम्हा गरीबांचा का बरे प्राण घेता? आजपासून तुम्ही आपले येथे बसूनच रहा. दररोज पाळी लावून आम्ही आमच्यापैकी कोणीतरी एक जण आपल्या भोजनाकरिता पाठवून देत जाऊ." हे त्या पशूंचे शहाणपणाचे बोलणे ऐकून सिंह त्यांना म्हणाला, "तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. बसल्या जागेवरून मला जर एक पशू खावयास मिळाला तर आणखी काय पाहिजे? पण लक्षात ठेवा, की एक दिवस जरी यात चूक झाली, तरी सगळ्यांचाच मी बार उडविन. सर्वांना एकदम मारून टाकीन." पशू आणि त्याचे म्हणणे कबूल केले. त्या दिवसापासून सिंहाकडे रोज एक पशू येण्याचा क्रम सुरू झाला. एके दिवशी एका सशावर सिंहाकडे जाण्याची वेळ आली होती. तो ससा हळूहळू पावले टाकत चालला होता. त्याच्या मनात विचार आला 'रोज आपल्यापैकी एकाला बळी जावे लागते. त्यापेक्षा या सिंहालाच मारण्याचा काही उपाय सापडला तर किती चांगले होईल, नाही का?" असा विचार त्याच्या मनात घोळू लागला. घटकाभर विश्रांती घ्यावी म्हणून तो विहिरीच्या काठावर बसला. त्याचे लक्ष खाली पाण्याकडे गेले. त्याने आत डोकावून पाहिले तर त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याबरोबर त्याच्या मनात विचार आला, "बरोबर सापडली आयडिया. आयडिया करून पाहायला काय हरकत आहे? सिंहाचा नाश करण्यासाठी हा उपाय चांगला आहे." अशा विचारातच तो सिंहाकडे जाऊन पोहोचला. रोजची वेळ टळून गेल्यामुळे व भुकेने आधीच व्याकूळ झालेला होता. सश्याला पाहताच त्याला राग आला. तो म्हणाला," दुष्टा एक तर तू अगदीच क्षूद्र आहेस. उशीर केलास तुला तर आता खातोच; पण उद्या सकाळी वनातील सर्व प्राण्यांना खाऊन संपवितो. ससा थरथर कापत म्हणाला,"महाराज उशीर झाला यात माझा काय दोष? अहो मी तर अगदी वेळेवरच तुमच्याकडे येण्यासाठी निघालो होतो. अहो पण दुसर्या एका सिंहाने माझी वाट अडवली. तो मला म्हणाला, "तू कुठे चालला आहेस?" मी त्यास उत्तर दिले, "आमचे धनी सिंह महाराज येथे जवळच राहतात. आमचे महाराज महापराक्रमी आहेत. त्यांच्या आहाराकरिता मी जात आहे. त्यावर तो म्हणाला, अरे तुझ्या महाराजाला जाऊन सांग की तुझ्यात हिम्मत असेल तर माझ्याशी लढायला ये." हे ऐकताच सिंह महाराज संतापले आणि लालेलाल झाले. ते म्हणाले, " चल तो कुठे आहे ते मला दाखव! "ससा सिंहाला घेऊन थोड्याच वेळात त्या विहिरीजवळ पोहोचला. ससा म्हणाला, "महाराज यांनी मघाशी लांब लांब गप्पा ठोकल्या होत्या. पण आता भिऊन विहिरीत जाऊन बसला आहे. आपण जवळ जाऊन पाहू या. " असे म्हणून सशाने सिंहाला विहिरीजवळ आणले. त्याला विहिरीत डोकावून पाहण्यास सांगितले. तेव्हा त्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याबरोबर त्याने मोठी गर्जना केली. गर्जनेचा प्रतिध्वनी आतून आला. तेव्हा तो सिंह आतून आपल्याला प्रत्युत्तर देत आहे असे या सिंह महाराजांना वाटले. आता त्यांना अधिकच राग आला. जोरजोरात यांनी ओरडायला सुरुवात केली. तसे जोरात प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले. रागारागाने त्याने विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून तात्काळ सिंह महाराजांचा मृत्यू झाला. ही सुवार्ता सशाने सर्व पशूना सांगताच सर्वांना खूप आनंद झाला. एका सशाने सिंहाला अद्दल घडविली. सर्व प्राण्यांचा जीव वाचवला. म्हणूनच म्हणतात की, 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते' हे सशाने सर्वांना दाखवून दिले.
मधुरा संतू माने
इ. १० वी
श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा जि.कोल्हापूर
मोबा.
Comments
Post a Comment