५. 'भाकरचोर' कथा

                       ५.  *भाकरचोर*     
    दुपारचे दोन वाजले होते. शाळेचा गजर झाला. सहावा तास संपला होता. मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. काही मुले आपापला डबा घेऊन वर्गाबाहेर पडली होती. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडाखाली मुले जेवायला बसली होती. मतदानासाठी लोक जसे बुथ टाकून बसतात; तशी सर्व मुले जेवायला बसली होती. इयत्ता सहावीच्या वर्गातून गोंधळ ऐकू येऊ लागला. म्हणून सहावीचे वर्गशिक्षक श्री. सानेसर स्टाफरूममधून उठून बाहेर येऊन वर्गाच्या दिशेने चालू लागले. वर्गात येताच त्यांनी आवाज दिला, "काय झालं गोंधळ घालायला?" हे ऐकताच सारी मुले गप्प झाली. भीतभीतच सेक्रेटरी तानाजी म्हणाला, "सर वर्गात चोरी झाली आहे." हे ऐकताच सानेसरांचा पारा चढला. आजपर्यंत शाळेत जी गोष्ट घडली नव्हती. ती गोष्ट घडली होती. तेही आपल्या वर्गात. याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी मुलांना विचारले, "कोणी चोरी केली? त्याने उठून उभे राहा." पण कोणीही उठून उभे राहिले नाही. त्यांना आपला अपमान वाटला. त्यांनी पुन्हा विचारले, "पण चोरी कोणाची झाली आहे?" संजय उभा राहून म्हणाला, "माझी सर." "अरे! पण कशाची?" सानेसरांनी विचारले.  "सर, माझी भाकरी घेतली कुणीतरी." संजयनं आपलं म्हणणं मांडलं. "सांगा ना कोणी केली चोरी? त्यांनं उठून उभे राहा." पण कोणीही उठायला तयार नव्हतं. एका कोपऱ्यात एक मुलगा खाली मान घालून बसलेला होता. त्याच्याकडे कटाक्ष टाकून सानेसरांनी दटावून विचारले, "अरे! कोण रे तू? नवीन आला आहेस ना तू? सांग तू चोरी केली आहेस काय? उठून उभा राहा आधी." रडत रडत उभा राहिला आणि म्हणाला, "नाही सर. मी चोरी केली नाही." 'खोटं बोलतोस' असं म्हणतच त्याला चार पाच छड्या दिल्या. "चोर तो चोर आणि वर शिरजोर काय?" त्याला जवळ ओढतच त्याच्या पाठीत धपाटे घातले. सरांचा लालबुंद चेहरा पाहून वर्गात शांतता पसरली. "पुन्हा चोरी करशील का? आयुष्यभर तुला आजच्या दिवसाची आणि आत्ताच्या माराची आठवण राहील. चोरीसाठी हात पुढे आला की माझी मूर्ती तुझ्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे  हे लक्षात ठेव. " असे म्हणून ते स्टाफरूममध्ये निघून गेले.            
          कर्णोपकर्णी ही बातमी मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली. त्यांनी शिपायाला हाक मारली. त्याला सांगितले , "बाळू, त्या सहावीच्या वर्गातील मुलाला बोलावून घेऊन ये." "बरं सर ," म्हणून बाळू निघून गेला. त्यानं त्या मुलाला ऑफिसमध्ये  आणलं. मुख्याध्यापकांच्या समोर येताच तो म्हणू लागला,"मला मारू नका सर. माझी चूक झाली. मला मान्य आहे की मी चोरी केली." मुख्याध्यापकांनी त्याला  विश्वासने विचारले, "बाळ, तुझं नाव रामच ना! शाळेत नवीन आलेला आहेस? मी तुला मारणार नाही; पण खरं सांगायचं, काय केलेस तू?" आधीच अर्धमेला झालेला होता. आणखीन मारावं तर भलतंच व्हायचं. सत्य काय आहे ते जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबला पाहिजे. गोड बोलून, समजावून घेतलं पाहिजे. असा विचार मुख्याध्यापकांनी केला असावा. "होय सर, मीच तो राम. आज चार दिवस झाले. मी उपाशी आहे. पोटात अन्नाचा कणही नाही. दोन दिवस झाले फक्त पाणी पिऊन शाळेत येतोय. खूप भूक लागली होती; म्हणून थोडीशी भाकरी घेतली दुसऱ्याच्या पिशवीतून. जर मी आता काही खाल्ले नसते तर जिवंत राहू शकलो नसतो. जगण्यासाठी चोरी करावी लागली. पोटाची आग शांत करण्यासाठी चोरी केली मी. खऱ्या वास्तवतेचे दर्शन घडवत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे सांगताना त्याचा हुंदकाही सुरु होता.             
           "अरे राम, चोरी करणे हे पाप आहे, हे माहीत असूनसुद्धा तू चोरी केलीस?" त्याला आधार देत मुख्याध्यापकांनी विचारले.      
             "सर, माझी आईसुद्धा मला असेच सांगते. ती म्हणते की, 'चोरी करणे महापाप आहे. ' ते मलाही पटते. पण सर, माझा नाईलाज झाला." अतिशय भाऊकपणे तो सांगत होता.          "या शाळेत येण्यापूर्वी तू मामाकडे होतास ना?" त्यांनी त्याच्या भूतकाळातील घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.           
         "होय सर. या शाळेत येण्यापूर्वी मी मामाकडे होतो. तिथे शाळेला जात होतो. पाचवीपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं. गत वर्षी मामाचं लग्न झालं. मामी घरात आली. तिनं काहीबाही सांगून मामाचं कान भरलं. मामानं मामीचं ऐकून मला माझ्या गावी आणून सोडलं. म्हणून मी या शाळेत आलो."        
       "वडील काय करतात तुझे?"          
       "माझे बाबा सकाळपासून झोपेपर्यंत दारू पिऊन धुंदीत असतात. घरातील बरंच साहित्य विकून टाकलं आहे त्यांनी दारुसाठी."               
         "मग कसं चालतं घरात तुमचं?"       
          "आई जाते दुसर्‍याच्या शेतावर शेतमजुरी करायला. चटणी मिठाचं कसंतरी भागतं; पण....." पण हा शब्द विरुद्धार्थी काहीतरी सुचवत होता.     
       "पण काय?" त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी मुख्याध्यापकांनी त्याला विचारले. तो प्रयत्न यशस्वी झाला. रामने सांगायला सुरुवात केली.....तो म्हणाला, "चार दिवस झाले. आई खूप आजारी आहे. तिला ताप आलाय आणि खोकलाही आहेअजून."          
        "अरे, मग तिच्याजवळ थांबायचं नाहीस का तू ? शाळेला कशाला येत आहेस? औषध पाणी बघायचं नाहीस का?"                "मला खूप वाटत होतं की, तिची सेवा करावी. तशी तिची सेवा करतो मी सकाळी आणि संध्याकाळी. पण ती मला घरी थांबूनच देत नाही. शाळा खूप शिकावी अशी तिची इच्छा आहे. तिच्या मनाविरुद्ध काही करावं असं वाटत नाही मला. शिवाय दिवसभर दारू पिऊन बाबा शिव्या घालतात तिला. कधीकधी मारतातही. त्यामुळे घरात जावंसुद्धा वाटत नाही." हे सर्व ऐकून घेतल्यावर मुख्याध्यापकाने बाळूला बोलावलं आणि सहावीचे वर्गशिक्षक सानेसरांना बोलावून  आणण्यास सांगितले. स्टाफरूममध्ये येऊन बाळूने निरोप दिला. चहा संपवून कप टेबलावर ठेवत सानेसर स्टाफरूममधून बाहेर पडले. तेज्ञऑफिसमध्ये आले. त्यांच्याकडे पहात मुख्याध्यापकांनी प्रश्न केला, "याला मारलंत तुम्ही?"
          "हो सर, याने चोरी केली; म्हणून मारलं. अपराध केला; म्हणून शिक्षा दिली. वर्गशिक्षकांनी आपले स्पष्टीकरण दिलं.           "ठीक आहे. पण याची संपूर्ण चौकशी केलीत का तुम्ही?"       
          "होय सर. याचा बाप दारुड्या आहे. याची आई मजुरी करते. अशा घरातल्या मुलाकडून यापेक्षा दुसरी कोणती अपेक्षा असणार?" सानेसरांनी आपला पट्टा सुरू केला. त्यांना मध्येच अडवत मुख्याध्यापक म्हणाले, "तुम्ही त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केलात का? चार दिवस झाले बिचारा उपाशी आहे. त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही. त्यात आणखी तुम्ही मारलं त्याला. अहो काही माणुसकी वगैरे......" त्यांचे म्हणणे मध्येच तोडत सानेसर म्हणाले, "स्वारी सर. माफ करा मला. सर माझी चूक झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही." सानेसरांनी कबुली देऊन टाकली.          
       "हे पहा सानेसर, सॉरी म्हटलं की सारं संपत नाही. मुळात माणूस वाईट नसतो. परिस्थिती त्याला तसं करायला भाग पाडते. मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम असतो. हे आपल्याला विसरून चालणार नाही."        
        "मी एकांगी विचार केला सर. आपल्याकडे नवीन आलेला मुलगा. त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकलो नाही."                "आणि सानेसर, तुम्ही एक गोष्ट पाहिलीत का?"                    "कोणती सर?" आतुरतेने सानेसरांनी विचारले.                       "त्याने बॅगेतील दुसऱ्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. डब्यातील फक्त भाकरी घेतली. तीही भुकेची आग शांत करण्यासाठी. सानेसर तुम्ही त्याला मारलं. पहा त्याचे हात कसे लालेलाल झाले आहेत. हळद, तेल घेऊन लागलेल्या भागावर लावा. आणि लक्षात ठेवा, शासनाने आदेश काढला आहे की मुलांना इजा होईल असं मारायचं नाही. तुमच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते."       
        "हो सर. समजलं. शाळेतील पहिलाच प्रसंग होता. चोरीसारखा गुन्हा झाला. त्यामुळे मनावर ताबा राहिला नाही. इथून पुढे असे वागणार नाही, अशी हमी देतो." असे म्हणून सानेसर ऑफिसबाहेर पडले.       
            एका कोपऱ्यात खाली मान घालून बसलेला राम मुसमुसत होता. त्याला जवळ बोलावून मुख्याध्यापक म्हणाले, "हे बघ राम, यापूर्वी तू मला याबाबत कधी बोलला नाहीस." मघापासून चाललेल्या संवादावरून रामला थोडा धीर आला होता. मुख्याध्यापकांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याला आधार मिळाला होता. त्याने थोडे धाडस करून सांगितले, "मलाही आपणाबद्दल आदर आहे. पण सर, मला खूप भीती वाटत होती तुमची. काय म्हणशीला याची हुरहुर वाटत होती." त्याला समजावत ते म्हणाले, "राम, तू उद्यापासून ऑफिसात येऊन दुपारचा डबा घेऊन जा. मी आणतो तुझे जेवण."   
         "पण सर मी घेऊ शकणार नाही डब्बा." नाराजीच्या स्वरात म्हणाला.      
        "अरे पण का?"       
         "माझ्या आईला आवडणार नाही हे. फुकटचे काही घ्यायचे नाही अशी तिची ताकीद आहे." रामने आपले म्हणणे मांडले.        
         "हे बघ राम, मी तुला फुकट देणार नाही. तू शाळेत लवकर यायचे. शाळेतील सर्व परिसर स्वच्छ ठेवायचा. झाडांना पाणी घालायचं. याचा मोबदला म्हणून मी तुला जेवण देणार आहे. 'कमवा आणि शिका'  या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या योजनेचा हा भाग आहे. आणि आजचा प्रसंग तुझ्या आईला कळला, तर तिला काय वाटेल याचा विचार तू केला आहेस का?"           
       "सर आईला सांगू नका. तिला खूप वाईट वाटेल. ती शाळेलासुद्धा पाठवणार नाही मला." अगदी रडवेला होऊन तो विनवत होता.         
       "राम, शाळेतलं काहीही आईला समजणार नाही. तू काही काळजी करू नकोस." मुख्याध्यापकांनी त्याला फार मोठा आधार दिला. मधली सुट्टी संपत आली होती. राम वर्गात जाण्याच्या तयारीत होता. तो म्हणाला, "येतो सर.आजच्या या भाकरीमुळे मला भाकरीची सोय झाली. आजचा हा दिवस माझ्या जीवनात अविस्मरणीय राहील."        
       "अरे इतकेच नव्हे, तर तुला एक छोटीशी नोकरी देणार आहे मी. त्याला मध्येच अडवत सर म्हणाले.           
       "मला नोकरी!" त्याने आनंदाने विचारले.  
        "हो.तीही उद्यापासूनच. शाळा सुरू होण्यापूर्वी तू शालेय भांडारमध्ये तासभर काम करायचे. त्यातून तुला थोडे पैसे मिळतील. वह्या, पुस्तके आणि किरकोळ खर्च भागेल तुझा."           "सर तुम्ही माझ्या आयुष्याची भाकरी दिलीत. ही बातमी आईला कधी एकदा जाऊन सांगेन असं झालंय मला. तिला खूप आनंद होईल हे सारे ऐकल्यावर."     
        इतक्यात गजर झाला. सर्व मुले वर्गात गेली. मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन राम आपल्या वर्गात गेला. सात टोल पडले आणि सातवा तास सुरू झाला.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील