पुस्तक परीक्षण- 'ज्ञानसूर्य'
*ज्ञानसूर्य*
'दलित मित्र स्वर्गीय ज्ञानोबा कदम गुरुजी कार्य आणि कर्तृत्व' हे चरित्रपर पुस्तक डॉ. श्रीकांत पाटील यांनी लिहिले आहे.
"उन्नत झाले आमुचे भाल
गुरुजी तुमच्यामुळे
तुम्ही लावल्या कल्पतरुला
आज लागली गोड फळे"
स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्याच्या फोटोखाली या ओळी लिहून चरित्र ग्रंथाची सुरुवात केली आहे.
या पुस्तकाला सचिव, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे गौरव पत्र वसमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुभेच्छा पत्र आहे.
हा चरित्र ग्रंथ प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांना सस्नेह अर्पण केलेला आहे.
महाराष्ट्र ही संतांची, क्रांतिकारकांची, विचारवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, महात्मा फुले यासारख्या शिक्षण महर्षींनी महाराष्ट्राला शिक्षणाची वाट दाखवून दिली. याच वाटेवरून चालणारे, शिक्षणाचा यज्ञ सेवाव्रती भावनेने सुरु करणाऱ्या श्री. ज्ञानदेव संभाजी कदम यांच्या अखंड संघर्षमय जीवन प्रणालीची, काट्याकुट्यांची, खाचखळग्यांची, दगडधोंड्यांची पायवाट तुडवीत गरिबांच्या ज्ञानाचा नंदादीप प्रज्वलित करण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्ञानदेव कदम म्हणजेच कदम गुरुजींची यशोगाथा डॉ. श्रीकांत पाटील यांनी या चरित्र ग्रंथात लिहिलेली आहे. कदम गुरुजींची अडथळ्यांची शर्यत अनेक समस्यांनी गुंतलेली आहे. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आईसह मामाच्या गावी राहण्यासाठी जावे लागले. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, कुशाग्र बुद्धिमत्ता या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. आपले शिक्षण पूर्ण केले. परोपकारी वृत्ती, सेवाभाव, संवेदनशीलता या गुणांच्या जोरावर शिक्षण कार्य सुरू ठेवले. "जे जे आपणांसी ठावे, ते ते दुसऱ्यांशी द्यावे | शहाणे करून सोडावे, सकलजन||" या सुवचनाचा आपल्या आयुष्यात वापर करून घेतला. उद्यमशीलता, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम या सद्गुणांच्या बळावर कदम गुरुजींनी जीवनातील संकटे, अडथळे आणि अडचणी यावर मात केली. शैक्षणिक पायवाट हाच राजमार्ग बनवला. कदम गुरुजींनी 'शाळा हेच कुटुंब' मानले. कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात त्यांनी साथ दिली. कदम गुरुजींचे शैक्षणिक कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना 'दलित मित्र' या पुरस्काराने गौरवले. तर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना 'गुरुजी' या नावाने संबोधले आणि खऱ्या अर्थाने ते 'दलित मित्र कदम गुरुजी' या नावाने सुपरिचित झाले.
'ज्ञानसूर्य' या पुस्तकाला अभिप्राय देताना डॉ. शिवाजी नारायण शिंदे साहेब, कुल सचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ हे लिहितात- "स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं
चार जणांचे अश्रू पुसून समाजाचं ऋण फेडायला हवं," या उक्तीप्रमाणे कदम गुरुजींनी तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात 'शिक्षण प्रसारक मंडळ' ही संस्था स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवण्याचे काम केले. स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजींचे चरित्र हे समाजाला दिशा देण्याचे, प्रेरित करण्याचे कार्य करील असा विश्वास मला वाटतो.
या चरित्र ग्रंथातून डॉ. श्रीकांत पाटील यांनी कदम गुरुजींचा जीवन प्रवास सांगताना सामान्य माणसापासून शिक्षण संस्थेच्या संस्थापक पदापर्यंत कसा घडत गेला याची इत्यंभूत माहिती या चरित्र ग्रंथातून मांडलेली आहे. या चरित्र ग्रंथाला दिलेले 'ज्ञानसूर्य' हे शीर्षक किती सार्थ आहे हे या चरित्र ग्रंथातून स्पष्ट होते. चरित्र ग्रंथातील भाषा साधी, सोपी व ओघवती आहे. तसेच डॉ. श्रीकांत पाटील यांची ओजस्वी लेखनशैली आणि त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण बाज यामुळे या चरित्र ग्रंथाला वेगळी अशी उंची प्राप्त झाली आहे असे अभिप्राय देताना डॉ. शिवाजी शिंदे यांनी नमूद केले आहे. तसेच 'ज्ञानसूर्य' हा चरित्रग्रंथ शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाची भर घालणारा दस्ताऐवज ठरेल यात तिळमात्र शंका नाही असेही स्पष्ट म्हटले आहे.
'ज्ञानसूर्य' या चरित्र ग्रंथात कदम गुरुजी यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ज्ञानेश्वरला आईबरोबर आजोळी जाऊन राहावे लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण डिकसळ, नरखेड या शाळेत झाले. प्राथमिक शाळेतील त्यांच्या गुरुजींनी आशीर्वाद देताना म्हटले होते, "ज्यांचे वडील हे जग सोडून लवकर निघून गेले अशा मुला-मुलींनी इतिहास घडवला आहे." या प्रेरणेतूनच ज्ञानेश्वर यांच्यात उत्साह संचारला, ऊर्जा निर्माण झाली. त्यांना 'ज्ञानेश्वर' हे मिळालेले नाव सार्थक केले. खरं तर संत ज्ञानेश्वरांची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. कारण ती चारही भावंडे आई-वडिलाविना पोरकी होती. संत ज्ञानेश्वर पहिले समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. या प्रेरणेतूनच त्यांनी निश्चय केला की 'थांबला तो संपला. काळ मागे लागला. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे.' या जोरावरच त्यांनी शिकण्याची आस मनी ठेवली. ती पूर्ण करून दाखवली.
माध्यमिक शिक्षण घेत असताना ज्ञानेश्वर आपल्या बाळू वाघमारे या मित्राबरोबर प्रवास करत असताना त्यांच्यामागे लांडगा लागला आणि बाळूच्या पायामध्ये भला मोठा काटा घुसला. पायातून भळाभळा रक्त वाहत होते. तरी मित्राला मागे न टाकता आपल्या पाठीवरती घेऊन त्याने घर गाठले. यातूनच ज्ञानेश्वरचे मित्रप्रेम दिसून येते. याच परिस्थितीतून ज्ञानेश्वर १९४० साली दहावी उत्तीर्ण झाले.
दहावीनंतर ज्ञानेश्वरने शिक्षण थांबवावे अशी मामाची इच्छा होती. परंतु ज्ञानेश्वरने जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ज्ञानेश्वरच्या विद्यालयीन शिक्षणाच्या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरू होती. त्या चळवळीचा आणि सामाजिक कार्याचा मोठा प्रभाव ज्ञानेश्वरवर पडलेला दिसून येतो. आपण अनंत अडचणीतून शिकत होतो. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. याची जाणीव त्यांना झालेली होती. या संदर्भात लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांनी विंदा करंदीकरांच्या 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे.' या ओळींचा समर्पक असा वापर केलेला आहे.
बी.ए. झाल्यानंतर ज्ञानेश्वरने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाचा वापर त्यांनी दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी, दीनदलित, पीडित, वंचितांना मदत करण्यासाठी केला. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ज्ञानेश्वर १९४५ साली कोल्हापुरात आलेले होते. राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन 'मराठा बोर्डिंग'मध्ये राहत होते. त्यांच्यावर शाहू महाराजांच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो.
वकिली शिक्षणाचा समाज कार्यासाठी वापर करत असतानाच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. संस्थानांच्या ताब्यातील सर्व शिक्षण संस्था भारत शासनाकडे गेल्या. त्या पद्धतीने जत संस्थानातील 'श्री. रामराव विद्यामंदिर' हे भारत शासनाच्या अखत्यारीत आले. तेव्हा जतच्या राजेसाहेबांनी कदम गुरुजींची 'सुपरिटेंडेंट' म्हणून नियुक्ती केली. परंतु गोंधळाच्या आणि अराजकतेच्या परिस्थितीमुळे खूपच ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले. विरोधकांनी कदम गुरुजींना विरोध केला. तरीही अनेक अडचणीवर मात करून, संयम राखून गुरुजी हेच सुपरिटेंडेंट झाले.
शाळेच्या इमारतीचे बांधकाम करताना अनंत अडचणी आल्या. त्या अग्निदिव्यातून पार पडण्यासाठी त्यांनी स्वतःची शेतजमीन विकली. पण इमारत, मैदान उभे केले. या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आलेले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, "गुरुजी, दामाजीपंतासमोर तुम्ही बांधलेल्या ज्ञानाच्या पाणपोईचे व शहाणपणाच्या वाड्याचे आज उद्घाटन केले आहे असे मी जाहीर करतो. गुरुजी, हे समोर दामाजीचे मंदिर आणि तुमचेही हे ज्ञानमंदिर आहे. येथूनच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. ही ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यातील झोपड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यासह तुमच्यासारख्या उदात्त विचारांच्या माणसांवर आहे." त्यावेळी मुला-मुलींच्या वसतिगृहाकरिता पंचवीस हजार रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मे १९६० साली महाराष्ट्र शासनाने एकाच वेळी आठ अनुदानित शाळांना मान्यता दिली. त्यामध्ये मंगळवेढा, भोसे, बारोळे, माचणूर, बेगमपूर, नरखेड, अनगर, वेळापूर या ठिकाणी त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा सुरू केल्या. तसेच सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी शिक्षकांसाठी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत सेवकांची पतसंस्था सुरू केली.
कौटुंबिक जीवन यामध्ये लेखकांनी ज्ञानेश्वर उर्फ कदम गुरुजी यांची कन्या अजिताचा विवाह, डॉक्टर सुभाष यांचा विवाह, सुनेला घडविणारे गुरुजी, गुरुजींच्या नाकाच्या हाडाचे ऑपरेशन, दलित मित्र पुरस्कार, मूळव्याधीची शस्त्रक्रिया, मणक्याचे ऑपरेशन, ज्ञानूसूर्याचा अस्त यामधून त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा परामर्श घेतलेला आहे.
साध्या व सोप्या भाषेमधून चरित्र कथन केलेले आहे. कुठेही अतिशयोक्ती आढळून येत नाही किंवा पाल्हाळिक भाषा आढळत नाही. अगदी मोजक्या शब्दांत हुबेहूब चरित्र कथन करण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.
या चरित्रग्रंथाचे दोन भाग पाहायला मिळतात. पहिल्या भागात लेखकाने वरीलप्रमाणे कदम गुरुजींच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. तर दुसऱ्या भागामध्ये 'सहृदयांचे बोल' यामध्ये शैक्षणिक, सामाजिक , राजकीय, व्यक्तिगत, कौटुंबिक या मुद्द्यांच्या आधारे कदम गुरुजींचा परिचय त्यांच्या कुटुंबातील, नात्यातील, संस्थेतील, सहप्रवासी लोकांकडून आठवणी स्वरूपात संकलित केलेल्या आहेत.
१) 'शिक्षणमहर्षी- कदम गुरुजींचे शैक्षणिक कार्य' ---- माजी प्राचार्य एस. बी. गायकवाड
२) 'उत्तुंग शैक्षणिक कार्य'-----
राजाराम शिवशरण
३) 'कदम गुरुजींचे शैक्षणिक कार्यकर्तृत्व' ------
ॲड. नंदकुमार पवार
४) कदम गुरुजींचे शैक्षणिक कार्य'-----
ज्ञानदेव जावीर
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी
५) 'स्वावलंबी विद्यार्थी ते ज्ञान योगी एक प्रवास' ----
प्रा. डॉ.विधिन कांबळे
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सांगोला
६) 'ज्ञानयात्री कदम गुरुजी'----
माजी आमदार दत्तात्रय सावंत
पुणे विभाग शिक्षक आमदार
७) 'कदम गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा विस्तार'-----
आर. डी. पाचपुंडसर
८) 'कदम गुरुजींचे कार्य'-----
बी. व्ही. डोंगरे
माजी मुख्याध्यापक
९) 'शैक्षणिक वाटचाल आणि संघर्ष'---
प्रा. सौ. शोभा काळुंगे मंगळवेढा
१०) 'कदम गुरुजींचा शिक्षणसेवेचा ध्यास'---
रामचंद्र जगताप मंगळवेढा
११) 'समाजभूषण कदम गुरुजी'--
विजयकुमार दत्तात्रय शिंदे
१२) 'ज्ञानयोगी ते कर्मयोगी : कदम गुरुजी'--
भारत मल्हारी घुले
१३) 'कर्मयोगी'---
सौ मीना डाके
१४) 'गुरुजींच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा'----
निर्मलाताई ठोकळ
१५) 'कर्मयोगींच्या सान्निध्यात २९ वर्षे'----
नानासाहेब अर्जुन उन्हाळे
१६) 'गुरुजींचा बालपणीचा शिक्षणप्रवास' ----
वसंत साहेबराव धावणे माजी मुख्याध्यापक तथा चेअरमन, शाळा समिती, नरखेड
१७) 'अखंड प्रेरणेचा झरा'----
राम नेहरवे (पत्रकार) माजी प्राचार्य, बेगमपूर
१८) 'बालपण व जडणघडण'----
सी. व्ही. जाधव सेवानिवृत्त मुख्याध्यापक/ प्राचार्य
बेगमपूर
१९) 'कर्मयोगी दलितमित्र कदम गुरुजी जन्मशताब्दी निमित्ताने'---
मच्छिंद्र भोसले
२०) 'माझे मार्गदर्शक गुरुजी'----
हनुमंत साहेबराव मेलगे सेवानिवृत्त मुख्याध्यापक
वेळापूर
२१) 'नारळातील खोबरं' ----
व मा पवार
२२) 'मैत्र जीवाचे'----
प्रा. सौ संगीता ताड
२३) 'माझे श्रद्धास्थान'----
अजिता श्रीधर भोसले
२४) 'कदम गुरुजी आणि संघर्ष'---
विशाल ज्ञानेश्वर माने
२५ ) 'कदम गुरुजींचे कौटुंबिक जीवन'----
श्रीधर सोपानराव भोसले माजी प्राचार्य, मंगळवेढा
परिशिष्टामध्ये १) स्वर्गीय ज्ञानोबा कदम गुरुजी संक्षिप्त जीवनपट
२) शाखानिहाय विस्तार
३) स्मृती काव्य --'ज्ञानसूर्य' ---रमेश कुरलेकर
४) प्रार्थना गीत
५) लेखकाच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा व अन्य माहितीचा तपशील
या ग्रंथाचे पुठ्ठा बायंडिंग आहे. वाचकाच्या सोयीसाठी टॅग पिनची सोय केली आहे.
या चरित्र ग्रंथाची पहिली आवृत्ती ५ मे, २०२१ रोजी प्रकाशित झाली.
प्रकाशन --- हृदय प्रकाशन १९०२ सी, महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर
मुखपृष्ठ -- सचिन भोसले, कोल्हापूर
मुद्रितशोधन -- चंद्रकांत निकाडे
मुद्रक : भारती मुद्रणालय कोल्हापूर
मूल्य : ₹ २५०
ISBN : 978-8-952448-4-3
Comments
Post a Comment