शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा
शैक्षणिक क्षेत्रामध्ये साहित्याच्या रूपात मैलाचा दगड ठरलेली पुस्तके आहेत. ती म्हणजे माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांचे 'नजराणा' आणि नामदेव माळी यांचे ...........ही पुस्तके आहेत. यामध्ये गटशिक्षणाधिकारी असलेले डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा' या पुस्तकाची भर पडलेली आहे.
खरे म्हणजे ही तिन्ही पुस्तके म्हणजे शाळा तपासणीच्या वेळी आलेले अनुभव कथन केलेले आहेत. प्रत्येक लेखकाचा एक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनातून ही पुस्तके निर्माण झाली आहेत. यामधील गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा' या २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाबाबत मी विचार मांडणार आहे. कोणतेही काम करताना ते सकारात्मक दृष्टिकोनातून केले पाहिजे. म्हणजे त्यात यश नक्की मिळते आणि ते टिकणारे ही असते. त्यांनी आपल्या अर्पणपत्रिकेत 'सेवाभाव, निष्ठा, तळमळीने गुणवत्तापूर्ण ज्ञानदान करून आदर्श पिढी घडवण्यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना सविनय अर्पण केलेले आहे. यातूनच त्यांचा शिक्षक बंधू-भगिनींवर विश्वास आहे. ते स्वतः प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते. आणि स्पर्धा परीक्षेतून ते अधिकारी झाले आहेत. तरी त्यांचा शिक्षकी बाणा अजुनी दिसून येतो. गटशिक्षणाधिकारी झाल्यानंतर शाहूवाडी. गडहिंग्लज आणि कागल या तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना, शाळा तपासणी करत असताना, आलेले अनुभव शब्दबद्ध केले. त्यांच्या या कार्यासाठी शिक्षण तपस्वी सुनीलकुमार लवटेसर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी कमळकरांनी केलेल्या अविरत कार्य आणि उपक्रमशीलता याबाबत संवेदनशील कार्याची 'बखर' असा उल्लेख केला आहे. 'आधी केले मग सांगितले' असा या दस्तावेजांचा बाज आहे असे त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकात कमळकरांचा अधिकार, पद, प्रतिष्ठान, सत्ता यांचा बडेजावपणा दिसून येत नाही, तर प्राथमिक शिक्षण हे गुणवत्ताप्रधान , उपक्रमशील विद्यार्थी विकासाचे साधन व्हावे असा त्यांचा ध्यास व ध्येय दिसून येते. कमळकरांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानसमृद्धी वाढवण्यासाठी केलेले उपक्रम, 'नकोशी' असलेल्या मुलींचे नामांतर केले. त्यामुळे त्या हव्याहव्याशा वाटू लागल्या. मुलं वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत, या गोष्टीला छेद देण्याचे काम कमळकरांनी केले आहे. आजच्या काळातही शिक्षक वाचतात, मुलांना वाचायला भाग पडतात, नव्हे तर लिहायलाही शिकवतात. फक्त त्यांना दिशा, ऊर्जा व प्रेरणा दिल्या पाहिजेत हे ओळखूनच कमळकरांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलेले आहे. विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले आहेत.
सुनीलकुमार लवटेसर म्हणतात, की रणजितसिंह डिसलेसर 'ग्लोबल टीचर' जिल्हा परिषदेच्या शाळेतून जन्मतो यामागे खंबीर पाठबळ असते ते डॉ. कमळकरांसारख्या कर्तव्यदक्ष लोकल शिक्षण अधिकाऱ्याचं. 'एकला चलो रे' म्हणत चालणारे असतात. यांच्यातच कारवाॅं बनण्याची क्षमता असते. ती या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा'च्या पानापानांत प्रतिबिंबित झालेले आहे.
'अजुनी चालतोची वाट' या मनोगतात डॉ. गणपती कमळकर यांनी प्राथमिक शिक्षणापासून नोकरीची सुरुवात करून भुदरगड, पन्हाळा, कागल या तालुक्यांमध्ये शिक्षक म्हणून जवळपास दोन दशके सेवा बजावली, पण संपतराव गायकवाड, आर. आर. पाटील, महावीर माने, दिनकराव पाटील, नानासाहेब माने यांचा आदर्श घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते २००८ मध्ये पूर्णही केले.
२०११ पासून शाहुवाडी, गडहिंग्लज, कागल येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले, तर आजरा , भुदरगड शिरोळ या तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेची उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
या पुस्तकामध्ये
१) ज्ञान समृद्ध होण्यासाठी
२) नकोशी झाली हवीहवीशी
३) गडहिंग्लज नवोपक्रम यशोगाथा
४) कन्नडच्या कचाट्यातून मराठीला सोडवताना
५) रचनावादाची आदर्श मॉडेल
६) छोट्या दोस्तांचा कवितासंग्रह
७) अकरावी केंद्रीय प्रवेशाचे अग्निदिव्य
८) बाल मनातून शब्द उमटतात तेव्हा...
९) स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी धडपड
१०) कागलचे बालवैज्ञानिक
११) कोरोना संकटात ऑनलाइन शिक्षण
१२) शिष्यवृत्ती गंगाजळी
अशी बारा प्रकरणे आहेत.
१. ज्ञानसमृद्ध होण्यासाठी या प्रकरणात 'ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही, तरी शहाणा मात्र जरूर होतो. व्यायामाने जशी शरीराची मशागत होते, तशी वाचनाने मनाची मशागत होते. वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणे होय. वाचनाने आपल्याला जग कळते. जगाचा इतिहास, भूगोल कळतो. संस्कृती कळते. जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. म्हणून वाचन चळवळ शिक्षकांमध्ये रुजली बहरली तर समाजामध्ये त्याचा वेगाने प्रसार होईल. याच अपेक्षेने गटशिक्षणाधिकारी झाल्यानंतर डाॅ. कमळकरांकडून शिक्षक ग्रंथालयासारखा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. त्याचे अनुभव कथन यामध्ये आले आहे. डाॅ. कमळकरसाहेब शाळेत गेल्यानंतर अधिकारी म्हणून कधीच गेले नाहीत. तर त्यांनी वर्गातील मुलांशी संवाद साधला. शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षक चुकले म्हणून त्यांना काही न बोलता कसे शिकवावे, हे त्यानी स्वतः तास घेऊन शिक्षकांना आपल्या कृतीतून शिकवले आहे. धडा शिकवणे म्हणजे फक्त माहिती वाचन करणे नव्हे, तर त्या पाठाशी पूरक माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. त्यासाठी अवांतर वाचनाची गरज शिक्षकांना पटवून देत होते. म्हणून ग्रंथालय वाढवावे आणि त्याचा मुलांना वाचण्यासाठी लाभ करून द्यावा. 'ग्रंथ हेच गुरु'. 'वाचाल तर वाचाल' हे सुविचार केवळ इतरांना वाचण्यासाठी, दिसण्यासाठी नसून ते कृतीत आणण्यासाठी आहेत हे त्यांनी शिक्षकांना पटवून दिले. दिग्विजय कुंभारसारख्या शिक्षकांच्या मदतीने त्यांनी 'झोळी ग्रंथालये' सुरू केली. शिक्षकांच्या वाचनासाठी त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी वाचनालये सुरू केली आणि नवनवीन पुस्तके उपलब्ध करून दिली. या उपक्रमाबाबत अनेक शिक्षकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
एकविसाव्या शतकातही मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे हे त्यांनी आपल्या 'नकोशी झाली हवीशी' या उपक्रमातून पटवून दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तरीही आज मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात नाही, हे नकोशी वरून कळते. म्हणून कमळकर यांनी 'नकोशी' या नावाचे नामांतर करून त्या मुलींना स्वतः आपली नावे निवडण्यास सांगितले. आमदार चंद्रकांतदादा पाटील, डॉ. दीपक म्हैसेकर आणि मुलींचे आई-वडील, तालुक्यातील शिक्षिका, विविध समित्यातील महिला यांच्या साक्षीने शाहुवाडीतील ३८ मुलींची 'नकोशी' हे नाव बदलून त्यांचे आयुष्य उजळण्यास मदत केली. यासाठी त्यांना स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शाहूवाडीतील अशा यशस्वी उपक्रमानंतर त्यांची बदली गडहिंग्लजला गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. गडहिंग्लजमध्ये प्रशासकीय काम करत असतानाच शाळा भेटी हा उपक्रमही राबवला. त्या तालुक्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम पाहिले. यामध्ये ज्ञानरचनावाद वापरून आनंददायी शिक्षण देणाऱ्या शिक्षिका शशिकला पाटील व प्रेमलता कदम. तर वाघराळकर मॅडम यांनी मुलांनी स्वतः राख्या तयार करून, विकून मिळालेल्या रकमेतून दुर्घटना ग्रस्त माळीण गावाला रक्कम पाठवून दिली होती. यातून समाजभान जतन केलेले पाहायला मिळते. शासनाने डिजिटल शाळा करण्यापूर्वीच राजगोळी यांनी तेरणी गावात डिजिटल वर्ग सुरू केले होते. 'फटाकेमुक्त दिवाळी' ही कल्पना बेकनाळ शाळेतील बाळासो वालेकर यांनी दीपावलीपूर्वी पंधरा दिवस अगोदर प्रतिज्ञा घेऊन उपक्रम राबवला होता. मनीषा सुतार यांनी इंचनाळ शाळेत टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले होते. केंद्र शाळा कडगावमध्ये विद्यार्थी संख्या घटत असताना तेथील शिक्षकांनी मुलांना बेल्ट, बूट असा गणवेश बदल केला. कमी पटसंख्या स्थिर केलेली होती. लोकसहभागातून वडरगे गावात झांज पथक तयार केले होते. असे अनेक नवे उपक्रम राबविले. गडहिंग्लज तालुक्यातील अशा सर्व उपक्रमाची यशोगाथा या नावाने उपक्रम व शिक्षकांची लेखन कार्यशाळा घेतली. 'यशोगाथा' असे त्याचे प्रकाशन झाले. याला शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आणि शिक्षण संचालक महावीर माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये "अरे! हा अधिकारी आपले फक्त दोष काढत नाही, तर आपल्या चांगल्या कामाचे कौतुक करून दादपण देतोय" अशी भावना निर्माण झाली. या उपक्रमातून त्यांना आत्मिक समाधान मिळाले. त्याबद्दल ते म्हणतात -
सन्मार्गाची धरली वाट त्याचा आगळाच थाट
सत्कार्याची पेरणी मनोमनी यशोगाथा उतरली पानोपानी...
(पान नं. ६३)
'कन्नडच्या कचाट्यातून मराठीला सोडवताना' या प्रकरणांमध्ये सीमा भागात असणाऱ्या शाळेतील मुलांची मराठी भाषेची गती कशी होते. यासाठी काय करता येईल? याचा मागोवा घेतला आणि मराठी भाषा अधिक विकसित व्हावी, यासाठी तालुका स्तरावर बैठका घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही केली. कारण बहुसंख्य मुलांची मातृभाषा ही कन्नड असायची. त्यामुळे शाळेत मराठी भाषा ही विद्यार्थ्यांना नीट यायची नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा शिकण्याकरता आत्मविश्वास निर्माण करायला हवा म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान केला. शिक्षकांसाठी प्रश्नावली आणि शब्दकोश निर्मिती केली. पालक मेळावे घेऊन मराठी वातावरण निर्माण केले. त्यामुळे शाळांमध्ये कन्नड भाषेचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली.
'रचनावादाचे आदर्श मॉडेल' या प्रकरणात गडहिंग्लज शिक्षण क्षेत्रात २०१५ मध्ये ज्ञानरचनावादाचा शिरकाव झाला आणि प्राथमिक शिक्षणातील आमुलाग्र बदल लोकांसमोर आला आणि याचा प्रसार जिल्ह्यामध्ये व्हावा म्हणून प्रयत्न केले. रचनावाद कार्यशाळा आयोजित केल्या. रचनावादी शिक्षणामुळे गडहिंग्लज हे शिक्षणाचे पर्यटन क्षेत्र बनले. याची दखल महाराष्ट्राचे प्रधान सचिव नंदकुमार आणि भारताचे केंद्रीय सचिव यांनीसुद्धा घेतलेली आहे.
मुलांच्या मध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता असते. त्याला वयाचे, परिस्थितीचे बंधन नसते. याचा अनुभव डॉ. कमळकरांना आलेला आहे. अनेक शाळेतून विद्यार्थी कविता लिहीत होते. त्यांना प्रेरणा देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली. कविता लिहिण्याची आवड असणाऱ्या एकशे दहा विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले. त्यातील ५८ विद्यार्थ्यांच्याकडून कविता लिहून घेतल्या आणि त्यांचे पुस्तक तयार केले. यासाठी बाळ पोतदारसर, गोविंद पाटीलसर, सुनील पाटीलसर यांचे मोलाचे मार्गदर्शन मुलांना झाले. या कविता ४७ मुली आणि ११ मुले यांनी लिहिलेल्या आहेत. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आणि कवितेला साजेशी चित्रे एम. के. सुतारसर यांनी काढलेली आहेत. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती दोन महिन्यातच हातोहात संपली. लगेच दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
'अकरावी केंद्रीय परीक्षा प्रवेशाचे अग्निदिव्य' यामध्ये निरपेक्षवृत्तीने आणि प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असतील आणि त्यांना साथ देणारे लोकप्रतिनिधी तसेच समाज माध्यमे असतील, तर एखादा ज्वलंत व अवघड वाटणारा प्रश्नसुद्धा कसा मार्गी लागतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून या अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज याकडे पाहता येते. गडहिंग्लजमध्ये अकरावी प्रवेशाची जटिल समस्या निर्माण झाली होती. त्यातच एम. आर. कॉलेजचे प्राचार्य पद रिक्त होते. त्या पदाचा कार्यभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कमळकर यांच्यावर सोपवला होता. अनेक खडतर समस्येतून त्यांनी अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धती यशस्वीपणे राबवली होती. विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे , प्रवेश प्रक्रियेचे संगणकीकरण, प्रवेश प्रक्रियेचा निकाल अशा अग्निदिव्यातून त्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यशस्वी केली.
कागल ही लेखक आनंद यादव आणि शास्त्रज्ञ शिवराम भोजे यांची जन्म आणि कर्म भूमी आहे. यामध्ये कमळकरांना आपले कार्य करून दाखवण्याची संधी मिळाली होती. त्यांनी अनेक शाळांतून भेटी देऊन विद्यार्थ्यांचे लिहिते हात पाहिले होते. अशा विद्यार्थ्यांच्या कवितेचे पुस्तक प्रकाशित करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. शिक्षण विभाग कागल आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांचे कवितेचे पुस्तक प्रकाशित केले. प्रकाशनासाठी निस्वार्थी आणि सत्कर्मी शिक्षकांकडूनच मदत घेतली.
'स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी धडपड' या प्रकरणांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू केली. शिक्षकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा शोध घेणे, शाळेमध्ये दाखल करून घेणे आणि त्यांच्या शिक्षणातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बालरक्षक शिक्षक आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलेल्या कार्याची दखल घेऊन संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी 'बालरक्षक' ॲपची निर्मिती केली. त्यामध्ये कागल तालुक्याचा समावेश करण्यात आला होता.
कागल तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी ४५ वे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करून दाखवले. इतकेच नव्हे तर बाल शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या वस्तूंचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाचा तालुक्यातील सर्व शाळातील विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांना माहिती होण्यासाठी निवडक उपक्रमांचा समावेश असणारे पुस्तक तयार केले.
'कोरोना संकटात ऑनलाइन शिक्षण' या प्रकरणात मार्च २०२० नंतर आलेल्या कोरोनामुळे जून २०२० नंतर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तरी शासनाने 'शाळा बंद शिक्षण चालू' हा उपक्रम राबवलेला होता. अनेक समस्यावरती मात करून शिक्षकांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण सुरू केले होते.
शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घ्यायलाच हवी. एवढेच नाही तर त्यांच्या कामाची योग्य दखल घेऊन त्यांचे कौतुक करून प्रेरणा देणे आवश्यक असते. परिणामी त्यांच्या कार्याचे रूपांतर शैक्षणिक उठावात कशाप्रकारे होते आणि शिक्षक याप्रसंगी स्वयम् प्रेरणेने एखाद्या उपक्रमासाठी आपल्या दातृत्वातून कायमस्वरुपी निधी कसा उभा करतात, त्या निधीचा योग्य कारणासाठी कसा उपयोग होतो. याचे दर्शन त्यांच्या 'शिष्यवृत्ती गंगाजळी' या प्रकरणातून होते. कागल तालुक्याला शिष्यवृत्तीची मोठी परंपरा आहे. शिक्षक 'समयदान' उपक्रमांतर्गत शालेय वेळेव्यतिरिक्त जास्तीचा वेळ देऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्यासाठी खूप परिश्रम घेतात. 'कमी तिथे आम्ही' ही भूमिका घेऊन शिक्षकांनी गंगाजळी निर्माण केली. ही गंगाजळी दहा लाख रुपयांपेक्षाही अधिक जमा होते. त्या गंगाजळीचे वितरणही चांगल्याच कामासाठी होऊ लागले. गुणवत्तेसाठी अहोरात्र धडपडणार्या शिक्षकांचा गुणगौरव झाला पाहिजे, म्हणून या निधीचा वापर केला जाऊ लागला.
या पुस्तकासाठी माजी सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांचा अभिप्राय लाभला आहे. डॉ. कमळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबत ते म्हणतात-
"शिक्षक तितुका मेळवावा |
गुणविशेषांचा शोध घ्यावा||
धडपडीत जोश वाढवावा |
ज्ञान-विज्ञानाच्या अंगणी ||"
........................................
पुस्तकाचे नाव: 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा'
लेखक: डॉ. गणपती कमळकर
प्रकाशन : अक्षर दालन
मुखपृष्ठ: गौरीश सोनार
मूल्य : ₹ २५० /-
Comments
Post a Comment