पुस्तक परीक्षण ३- मिशन बिगीन अगेन

२०२० साल उजाडले ते एका वेगळ्याच कोरोनाच्या महामारीने. सगळ्या जगात कोरोनाची भयानकता पसरलेली होती. नव्या वर्षाचे स्वागतच या महामारीने झाले. जानेवारी महिन्यात भारतात प्रवेश केलेल्या या कोरोनाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सगळ्या भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० रोजी संपूर्ण भारतात लॉकडाऊन  जाहीर केले.  सारा भारत देश घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाला. 
            या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सॅनिटाइजरचा वापर करण्यात आला. साबणाने हात स्वच्छ धुण्याची आणि सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करण्याची सवय लागली. अशा या महामारीविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 'मिशन बिगीन अगेन' हे ब्रीदवाक्य उच्चारले होते. याच ब्रीदवाक्याचा आधार घेऊन तानाजी पांडुरंग देशमुख यांनी 'मिशन बिगीन अगेन' हे दोन अंकी कोरोनावर आधारित नाटक लिहिले आहे. माझ्या मते कोरोनावर लिहिलेले ते पहिलेच नाटक आहे. 
             कोरोनाने सामान्य माणसांचे जगणे मुश्कील केले होते. जगण्या-वागण्याची तऱ्हा बदलून गेली होती. सामान्य डोळ्यांना न दिसणाऱ्या एका विषाणूने माणसाचे सारे जीवन बदलवून टाकले होते. 
         साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं. कोरोना काळात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्याकडे पाहताना हे अधिक खरं वाटतं. आपणास साहित्य हे काळानुसार अधिक समाजाभिमुख होत असल्याचं जाणवतं. मराठी साहित्यामध्ये पूर्व परंपरेने पाहिलं तर आपत्तीचे पडसाद साहित्यात उमटलेले दिसून येतात. अगदी ज्ञानेश्वर-तुकोबापासून ते अलीकडच्या महामारीच्या काळात लिहिल्या गेलेल्या साहित्यातही याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीप्रमाणेच वेळोवेळी पडलेल्या दुष्काळावर सुद्धा साहित्यनिर्मिती झालेली आपणाला पाहायला मिळते. तद्वत २०२० मध्ये आलेल्या महामारीवर अनेक साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये डॉ. श्रीकांत पाटील यांची कोरोना महामारीवर आधारित असलेली कादंबरी म्हणजे 'लॉकडाऊन.' नागनाथ कोत्तापल्ले आणि ज्ञानेश्वर जाधवर या बार्शीतील तरूणाने याच नावाने कादंबरी लेखन केलेले आहे. डॉक्टर मृदुला बेळे यांचे 'कोरोनाच्या कृष्णछायेत' हे लेखन प्रसिद्ध झाले आहे. अर्थतज्ञ डॉक्टर जे.एफ.पाटील यांचे 'कोरोणायन' नावाचे पुस्तक.  तसेच कोरोनाच्या काळात अनेक कवितांची निर्मिती झालेली आहे. या पुस्तकांच्या माळेत आणखी एका पुस्तकाची भर पडलेली आहे ती म्हणजे तानाजी पांडुरंग देशमुख यांच्या 'मिशन बिगीन अगेन' या नाट्यकृतीची. सुरुवातीच्या काळात कोरोना संकट साधेसुधे वाटले. परंतु हळूहळू त्याने भस्मासुराचे रूप धारण केले. 'न भूतो न भविष्यती' अशी परिस्थिती निर्माण केली. माणसे, मुले-बाळे चार भिंतीत कोंडली गेली. सारं जगच लॉकडाऊन झाले. जगावर आलेल्या या परिस्थितीने सामान्य माणूस घाबरून गेला. हातावर पोट असणाऱ्या लोकांची खूपच कुचंबणा झाली. काय करावे कोणालाच कळेना. अशा भयावह परिस्थितीचे चित्रण या नाट्यकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
            तानाजी देशमुख हे शालेय जीवनापासून अभिनय क्षेत्रामध्ये आहेत. शालेय जीवनात त्यांनी नाट्यछटा, एकांकिका, नकला, गाणी यातून अभिनय सादर केला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत झालेल्या एकांकिका स्पर्धेत अभिनयाची अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत. तसेच राज्य नाट्य स्पर्धेतसुद्धा त्यांनी काम केले आहे. अशा कलावंताच्या हातून ' मिशन बिगीन अगेन' ही सर्वांग सुंदर नाट्यकृती निर्माण झालेली आहे. 
           या नाट्यकृतीमध्ये माणूस हा स्वार्थानं आणि संपत्तीच्या वाटणीवरून एकमेकांपासून दूर जातो. त्यांच्यामध्ये गैरसमज झाल्यामुळे नाती दुरावतात. पण जेव्हा गैरसमज दूर होतात, त्यावेळी नात्यांची वीण घट्ट होते. हेच सूत्र या नाटकांमध्ये लेखकाने विणलेले आहे. 
        या नाटकातील नायक म्हणजे सुधाकर. तो पेशाने शिक्षक आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने फाऊंडेशन सुरू करून त्याद्वारे समाजसेवा करण्याचं कार्य सुरू केलेले होते. कारण 'सेवानिवृत्ती ही सेवावृत्ती' आहे असे ते समजतात. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी सुलभासुद्धा मोलाची साथ देतात.  जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षात त्या नवऱ्यासोबत असतात. याठिकाणी मला कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांची पत्नी यांची आठवण होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीने भाऊरावांच्या शिक्षण कार्यामध्ये स्वतःच्या अंगावरचे दागिनेही विकले होते. त्याप्रमाणे सुलभानेही सुधाकरला मदत केलेली आहे.   
            महात्मा फुले, गाडगे महाराज, बाबा आमटे, मदर तेरेसा, कर्मवीर भाऊराव पाटील या समाजसेवकांचे काम या नाटकातील नायक सुधाकर यांनी पुढे सुरू केलेले आहे. या नाटकांमध्ये सुधाकर, सुलभा, वसंता, पार्थ,कौमुदी, सौमित्र ही महत्वाची पात्रे आहेत. यातील व्यक्तिरेखा कथानकाला साजेशा आहेत. उत्कंठावर्धक, प्रभावी संवाद लेखन झाले आहे. साधी, सरळ सोपी वाक्य रचना केलेली आहे. या साऱ्या गोष्टींमुळे ही नाट्यकृती रसिकांना खिळवून ठेवते. यातच लेखकाचे यश आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. 'मिशन बिगीन अगेन' या नाट्यकृतीमध्ये जात, धर्म, पंथ हे सारं खोटं आहे. ते दूर करून 'मानवता' हाच खरा धर्म आहे हे समाजाला पटवून देण्यासाठी लेखकाने जॉन, वसंता, महम्मद ही पात्रे पहिल्या अंकातील दुसऱ्या प्रवेशामध्ये आणलेली आहेत.  सुधाकरांनी या तिघांनाही मदत केली होती. ते त्यांच्या संवादातून आपणास जाणवते. 
          सुधाकर हे सेवानिवृत्त शिक्षक असून समाजातील गरीब, होतकरू लोकांना मदत करत असतात. त्यासाठी त्याने फाऊंडेशन सुरू केलेले आहे. सेवानिवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्न सेवानिवृत्तांना पडलेला असतो. पण सुधाकरने फाऊंडेशन काढून हा प्रश्न निकाली काढला आहे.  विद्यार्थ्यांना या फौऊंडेशनमार्फत 'कमवा व शिका' योजनेचा उपयोग करून शिक्षण देत होते. (पान नंबर २३) 
             जेव्हा सुधाकर आपली सगळी संपत्ती वसंताच्या नावावर करायला तयार होतात, तेव्हा वसंता त्यास पूर्णपणे नकार देतो. त्यावेळी सुधाकर वसंताला म्हणतात, "आम्ही तुला आमचा मुलगाच मानतो. असाच नि:स्वार्थी बुद्धीचा कायम रहा. तुझं हृदय कधीही लॉकडाऊन करू नकोस. ते कायम अनलॉक ठेव. म्हणजे तुझ्याकडे माणसांचा लोंढा आपोआपच लागेल. (पान नंबर ३४) 
            कोरोनाच्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. लेखकाने त्याचं वर्णन अतिशय मार्मिक शब्दांत वास्तवपणे केलेले आहे. जेव्हा सुधाकरची पत्नी सुलभालाच कोरोना होतो. हे कळूनही त्यांचा मुलगा पार्थ सेवेला येतच नाही. उलट वसंता मुलासारखी सुधाकरची सेवा करतो. सुलभाचा यात अंत होतो. सुधाकर व वसंतालाही त्यांचे अंत्यदर्शनही घेता येत नाही. 
           कोरोनाच्या काळात लाॅकडाऊनमुळे निसर्गाचे सौंदर्य वाढले. प्रदूषणाची पातळी खूपच खाली आली. याबाबत निसर्गावर नितांत प्रेम करणारा सुधाकर म्हणतो, "माणसाने निसर्गावर हल्लाबोल केल्यावर निसर्ग गप्प बसेल काय? तो आपला समतोल ढासळू देत नाही. शासनाने हे लाॅकडाऊन केले. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण किती कमी झाले. पशुपक्ष्यांचे आवाज या मनुष्यवस्तीत कधी ऐकायला मिळाले नव्हते.  ते ऐकायला मिळालेत. निसर्गाचं हे एक प्रकारे शुद्धिकरणच झाले म्हणायचे. (पान नंबर ४७) 
           सुलभाच्या जाण्याने सुधाकर एकटे पडतात. त्यावेळी नाटककाराने त्यांच्या तोंडी घातलेल्या या ओळी अतिशय समर्पक वाटतात. 
" आज सोडूनी मध्येच मजला, चाललीस तू देवा घरला. 
सांग कसे जगू तुझ्याविना, 
ये परतुनी तू गं पुन्हा||धृ||जीवनाच्या या वाटेवरती, 
साथी तुझा मी शतजन्माचा
 काय सांग झाला गुन्हा, 
ये परतुनी तू गं पुन्हा||१||
 चार दिवसाचा खेळ खेळलीस, 
 मोडूनी खेळ तो निघून गेलीस
आता वंदन पींडदाना, 
ये परतुनी तू गं पुन्हा||२||"
(पान नंबर ४८) 
           या नाट्यकृतीमध्ये  अतिशय सुंदर अशी काही वाक्ये आलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे ---
       'माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतं, ते खरे शिक्षण' 
          'कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, ते प्रामाणिकपणे करा. दुसऱ्यावर विसंबून राहू नका.'
           'दुसऱ्यांना आपण ओझं व्हायचं नाही. ह्या सर्व सुखांचा त्याग करून सर्वसामान्य लोकांसारखे जगायचं. पण कोणाच्याही आश्रयाला जायचं नाही.' 
           'जगणं सुंदर केव्हा होतं, जेव्हा आपली माणसं आपल्यावर भरभरून प्रेम करतात.' 
           'पृथ्वीवर जन्म झाला त्यावेळी आपण रडत आलो आणि सर्वजण हसत होते. पण आपल्या जीवनाच्या शेवटी म्हणजे आपल्या मृत्यूसमयी आपण हसत राहायचं आणि जगाने आपल्यासाठी रडत बसले पाहिजे असं आपण वागले पाहिजे.'
 आणि मला सर्वात जास्त भावलेलं वाक्य म्हणजे -    
        'पायातला काटा निघाल्यानंतर चालायला मजा येते. तसा मनातून गैरसमज दूर झाला की जीवन जगायला मजा येते.'
             'मिशन बिगीन अगेन' या दोन अंकी नाटकाचे रंगमंचावर प्रयोग व्हावेत.  आम्हांसारख्या रसिकांना ती एक पर्वणीच असेल. वाचक आणि रसिक या नाट्यकृतीचे मनापासून स्वागत करतील अशी मला अपेक्षा आहे. 
          या पुस्तकाला लेखकांचेच गुरू श्री. बी. एस. कांबळेसर यांची प्रस्तावना लाभली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबईचे विश्वस्त मा.श्री. राजेंद्र मुठाणेसो यांचा अभिप्राय लाभला आहे.  डॉ. श्रीकांत पाटील सर यांचे मलपृष्ठावर बर्ब आहे. कोल्हापूर जि. प. चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तलसो, कोल्हापूर जि. प. शिक्षणाधिकारी(प्राथमिक) श्रीमती आशा उबाळे , उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदमसो, पन्हाळा गटशिक्षणाधिकारी मा. श्री. आनंदराव आकुर्डेकरसो या सर्वांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झालेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील