६. *कथा कोसळता पाऊस*
६. *कोसळता पाऊस*
यंदा पावसानं विसावा कसला तो घेतलाच नाही. रोहिणी नक्षत्रापासून जो कोसळायला लागला तो थांबायला तयार नाही. मृग नक्षत्रात तो रिमझिम पडत होताच. नद्यांना पूर आला होता. खरं तर पुनर्वसू नक्षत्र हे पावसाचे नक्षत्र. त्यालाच तरणा पाऊस म्हणतात. तोरणा धो धो कोसळला. नद्यांना महापूर आला होता. नदी काठची सारी पिकं पाण्याखाली गेली होती. संततधार सुरू होती. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होत नव्हती. त्यानंतर म्हातारा पाऊस सुरू झाला. पावसाने थोडी ओढ धरली. सर्वांना हायसे वाटले. पण दोनच दिवस. पुन्हा ते नक्षत्र लागू लागले. हे नक्षत्र मघा. असं म्हटलं जातं की, 'लागल्या तर मघा नाहीतर ढगाकडं बघा. 'असं पूर्वापार चालत आलेली एक म्हण आहे . पण ढगांनी एवढी कृपा केली की निसर्ग देवतेने आता पाऊस थांबवावा अशी देवाकडे लोकं प्रार्थना करत होती. तरीही पाऊस पडत होता. श्रावण महिना सुरू झाला की ऊन-पावसाचा खेळ सुरू व्हायचा. पण दोन अडीच महिने झाले तरी सूर्यनारायणाने कसले ते आपले तोंड दाखवले नव्हते. सारा पावसाचा खेळ सुरू होता. अशा पावसाळी वातावरणात आमच्या गावातील शंकरनाना व सारजाकाकू यांचं या पडणार्या पावसाबाबत गुलकंदी बोलणं चालू होतं............
"अगं सारजा, या पावसानं थैमान घातलं बघ. ह्यो बाबा रोहिण्यापासनं झोडपायला लागलाय त्यो थांबायचं नाव घेत नाही. " त्यावर सारजाकाकू म्हणाली, "तर व्हय कारभारी, तोबी माणसाचं सतत बघतोय. "
"अन पाऊसपण माणसासारखा चेकाळण्यावानी कराया लागल्या. रोहिण्यापासनं सपाटा लावलाय त्यो थांबना बघ. तरणाबी इपरित लागला. म्हातार्यानं दिसाचा गोंडा दाखवला नाही. आसळकाचाबी पाऊस सुपानंच ओताय लागल्या बघ. "
"व्हय की हो धनी. या पावसानं सारं रेकाॅर्डब्रेक केल्या. "
"तर गं मर्दिनी, लागल्या तर मघा नाहीतर ढगाकडं बघा असं म्हणायचं असतंया परं आवंदा आगावच झालंया म्हणा.या मघानी तर जीव आंबूनी गेलाया बघ. पावसानं आता थोडासा इसवाटा द्यावा बघ. "
.......खरं तर या दहा बारा वर्षांत इतका पाऊस कधी असा पडलाच नाही. एखादं नक्षत्र लागायचं चार आठ दिवस. चांगला पाऊस पडायचा. नद्यांनाल्यांना महापूर यायचा पण काही दिवसांत पूर ओसरायचा. कधी पाऊस पडायचा नाही. दुष्काळ पडायचा. पाऊस पडावा म्हणून देवाला गार्हाणी घालावी लागायची. पण यावर्षी सारं उलटं च झालेलं होतं. पाऊस सतत पडत होता. शंकरनाना व सारजाकाकू आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागलेत.............
"अगं सारजा, या धा-पंधरा वर्षात असा पाऊस कव्हा पडला नव्हता बघ. "
"तर हो मालक , यंदाचा पाऊस फारच पडायला लागलाया. " "तुला सांगतो सारजा , असाच पाऊस आपल्या लहानपणात पडायचा. रानात जाताना अंगावर इरलं घेतल्याबिगर जाता येत नव्हतं. त्या काळात पाऊस खूप पडायचा. पण चार - आठ दिवसच. पुन्हा उघडझाप व्हायची. "
"आताचा पाऊस त्यामानाने चांगला म्हणायचा. पहिल्यावानी त्यात फार जोर दिसत नाही, परं सारखा जरा जरा ओताय लागलाया. त्यामुळं नद्यांचे पाणी काही ओसरना झालंया."
"अगं बाई, आता कितीक बदल झालेत. नव्या नव्या सुधारणा झाल्या. रस्ते झाले. त्यांची उंची वाढली. भरावा पडला. पाणी अडून राहू लागलं.ते पुढं सरकना झालं. त्यात अन् ते कर्नाटकात झालेलं कोणतं बरं धरण? अलमट्टी धरण. त्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. फुगवटा तसाच राहतोया."
खिडकीतून बाहेर पाहत शंकरनाना कॉटवरुन सारजाकाकूला सांगत होता. खिडकीच्या शेजारी काॅट ठेवलेला होता. कॉटजवळ खुर्चीवर सारजाकाकू बसली होती. पाऊस अजूनही सुरूच होता. शंकरनाना सारजाकाकूला म्हणाला, "अगं, जरा चहा प्यायला घेऊन ये जा की, सांज व्हायला आलीया. घोटभर चहा घेतला की बरं वाटंल."
"व्हय की. किती वेळ बोलण्यात गेला हे कळलंसुदीक नाही. कुठं आत बाहेर करावं तर ह्यो बाबा थांबत नाही. " असं ती उठून आत गेली. शंकरनानाच्या डोळ्यांतून घळाघळा आसवं गळू लागली.डोळ्यासमोरून सारा भूतकाळ सर्रकन सरकला.......
माझ्या बालपणी माझा बाप मेला होता. आईनं काबाडकष्ट करून मला मोठं केलं होतं. पदरचे रान नसताना मोल मजुरी करून मला शिकवलं. स्वतः उपासपोटी राहिली पण मला काही कमी पडू दिलं नाही. सातवी पास झालो नि तीही मला सोडून गेली. तिची सुटका झाली आणि मला वनवासी करून गेली. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत मी जगलो. पडेल ते काम केलं.थोडं पैसे साठवले. पावण्यातील सारजाशी लग्न केले. तिच्या पायगुणानं माझी बरकत झाली. देवाच्या कृपेने मुलगा झाला. त्याचं नाव महादेव ठेवलं. त्याला काही कमी पडू दिले नाही. त्यानंही चांगली साथ दिली. तो खूप हुशार होता. चौथी व सातवी स्काँलरशिप परीक्षेत चांगले यश मिळविले. पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर शहरात पाठवला. तिथेही पहिला क्रमांक पटकावला. बँकेचे कर्ज घेतले पण त्याला शिकवले. मोठ मोठ्या परीक्षा देऊन परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेला. तिथेच नोकरी करत असताना त्यानं तिथल्या मुलीशी विवाह केला आणि तो तिथेच राहू लागला. राजाराणीचा संसार सुरू आहे. नाहीतरी एकदा जोडीने भेटून गेला आहे. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अधूनमधून फोन करतात तेवढाच आधार. पण आमच्या म्हातारपणात आमच्या घरी कोण आहेत? आमच्या कार्यक्रमाला तरी येतील की नाहीत? कुणाला ठाऊक? पोटाला पोरगा असूनही बेवारशासारखं जगायचं आणि मरायचं?...... अशा विचारात असतानाच "अहो, च्या घेताय ना? " सारजाकाकूच्या हाकेनं शंकरनाना भानावर आले. डोळे पुसत हात पुढे केला. हातात कप घेऊन काही वेळ तसेच थांबले. "अहो, कशाला काळजी करताय? मी आहे ना तुमच्या संगं. आणि हे बघा, मी जायची नाही तुमच्या अगोदर तुम्हाला असं सोडून. " असं सारजाकाकूचं बोलणं ऐकून हातातला कप कधी गळून पडला हे कळलंसुदीक नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि बाहेर पावसाला जोर चढला होता. त्या आवाजात शंकरनानाच्या डोळ्यांतील आसवांचा आवाज क्षीण होत गेला.... क्षीण होत गेला...... क्षीण होत गेला.
श्री. परशराम रामा आंबी
श्री नवनाथ हायस्कूल
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
पिन416229
मोबाईल नंबर :9421203732
Comments
Post a Comment