घाणी कादंबरीवर परीक्षण
घाणी
' घाणी ' ही कादंबरी पा. ख. कविता यांची आहे. ही आदिवासी जीवन जगणाऱ्या , खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या जीवन संघर्षाचे वर्णन करणारी कादंबरी म्हणजे 'घाणी.' या कादंबरीत सामाजिक पर्यावरणात मानवी जीवन जगणाऱ्या एका स्त्रीचा हा संघर्ष आहे. प्रादेशिक भाषा , बोलीचा साज या कादंबरीने परिधान केलेला आहे . वेठबिगारी ही सामाजिक समस्या मांडणारी ' घाणी ' ही कादंबरी आहे.
या कादंबरीमधील कथानक , पात्रे , घटना , प्रसंग आणि भाषाशैली यांची एक एक साखळी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाचकांची अभिरूची वाढण्यास मदत होते. आदिवासी जीवनातील पाडे , कुटुंबे आणि दगडाच्या खाणीत काम करणारे कामगार याचे ज्वलंत चित्रण या कादंबरीत आले आहे. कामगार आणि कंत्राटदार यांच्यातील संघर्ष आपणास या कादंबरीत पाहायला मिळतो. आदिवासींचे दुःख , दैन्य , दारिद्र्य , हतबलता आणि परिस्थितीला शरण जाणे यांचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडते. जीवन -मरणाचा संघर्ष वाचकांच्या समोर उलघडत जातो. मती कुंठीत होते. मेंदू बधिर होतो. जिज्ञासा कायम ठेवत बनी नावाच्या नायिकेची ही शोकांतिका आहे. परिस्थितीमुळे तिच्या झालेल्या जीवनाची कुतरओढ पाहून वाचकांच्या नेत्रांच्या कडा ओलावून जातात. वाचक विचारप्रवण होतात . यातच या कादंबरीचे यश आपणाला पाहायला मिळते.
बनी ही कुड्या आणि लाची यांची लेक. तिचं हसण्या बागडण्याचं वय , पण आदिवासी रीतीरिवाजाप्रमाणे तिचं लहान वयातच लग्न होतं. ती लग्नाच्या बेडीमध्ये अडकते. आदिवासी समाजात अशा बालविवाहामुळे मुलांचे विशेषत: मुलींचे भावविश्व करपून जाते . लहान वयात पडलेल्या जबाबदारीची जोखड त्यांच्या मानेवर येते . याला कारण गरिबी , अज्ञान , अंधश्रद्धा आहे. दिव्यांग असणारा तिचा बाप , डोईवर फाटकं लुगडं असणारी तिची माय.
अकाली प्रौढत्व स्वीकारलेली ही बनी. धुराबाईच्या शिरूबरोबर लग्न करते आणि मोराईच्या पाड्यावर राहायला येते. स्त्री जन्मामुळे ती अल्पावधीतच सासरी एकरूप होऊन जाते. पाणी भरणे , भाकर तुकडा करणे , नवऱ्याची व सासू-सासर्यांची सेवा करणे यामध्ये बनी धन्यता मानत असते. यालाच ती आपला सुखाचा संसार सुरू आहे अशी समजूत करून घेते. आई बापाच्या आठवणीने ती व्याकूळ होते. बापाच्या पायाची जखम पाहून ती दुःखी होते. लहानपणी तिच्या मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या वस्तू पाहून त्यामध्ये ती स्वतःला हरवून जाते.
मालक आणि मजूर यांच्यातील संघर्ष , मजुरांची होणारी पिळवणूक आणि छळवणूक हीच या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे . सुखदुःख या परिघात चालणारी बनी यालाच आपले जीवन समजत असते. 'बनी' हे पात्र या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे एक पात्र आहे. या सार्याच कुटुंबाचा , आदिवासी समाजाचा तोच एक परीघ असतो. मरेपर्यंत काम करणे , चार पैसे मिळवणे , भाकरतुकडा खाणे आणि रात्री निवांत झोपणे हेच त्यांचं जगणं असतं. जेव्हा बनीला मातृत्वाची स्वप्नं पडतात. आणि ती आई होते.
पण काळ कोणासाठी थांबत नाही. एके दिवशी दगडाची पाटी ट्रकमध्ये टाकत असताना ट्रक मागे सरकला. तो शेरूच्या पायावरून दरीत कोसळला. या अपघातात शेरूचा पाय मोडला. आणि बनीच्या जीवनात एक नवा संघर्ष उभा राहिला. चूक कांट्रक्टरची. त्याच्यामुळे अपघात झाला , पण त्याने अपघाताचे खापर शेरूच्या डोक्यावर फोडले. उलट भरपाई म्हणून शिरूला जीवे मारण्याचा आदेश दिला. पतीनिष्ठ असणारी बनी आपल्या पतीचा प्राण वाचवण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी आपल्या पोटातील बाळाला घाणवट ठेवण्याचा निर्णय घेते. याच दरम्यान तिच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे आई एकाकी पडली. सासूचं म्हातारपण. आणि नवऱ्याचं पंगुत्व अशा असंख्य समस्यांच्या विळख्यात सापडलेली बनी. मातृत्व आणि कर्तृत्वाच्या युद्धामध्ये नवऱ्याला वाचवण्याचे कर्तव्य पार पाडते. त्यासाठी तिने आपल्या मातृत्वाचा बळी दिला आहे. थोड्या दिवसात एका गोंडस बाळाला जन्म दिला. तेही स्त्री-बीज असल्यामुळे तिला 'घाणी' असं नाव देण्यात आलं. घाणी फार चपळ, बोलकी, गोंडस होती. तशीच ती खेळकर आणि खोडकरसुद्धा होती. ती आपल्या आई वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. तिच्या प्रश्नाला उत्तर देताना बनीला अवघडल्यासारखं व्हायचं.
एकदा घाणीच्या मैत्रिणींनी तुला घाणी हे नाव का ठेवलं? म्हणून विचारलं. तेव्हा तिने बनीला प्रश्न केला , "माझं नाव घाणी का ठेवलं?" त्यावेळी तिला काय उत्तर द्यावं या कोड्यात बनी होती. या विचित्र प्रसंगानं ती हतबल झालेली होती. हळूहळू घाणी सहा वर्षाची झाली. तिला कंत्राटदारांनं उचलून नेलं . त्यावेळचा प्रसंग मनाला पीळ पाडणारा आहे. जीवाचा तुकडा सहजा सहजी दुसऱ्याला देऊन टाकणं तेही त्या जीवाची काहीच चूक नसताना. यावेळची बनीच्या मनाची झालेली अवस्था लेखिकेने नेमकीपणानं रेखाटलेली आहे. हतबल आणि पराभूत झालेल्या परिस्थितीचं वर्णन अतिशय दर्दभऱ्या शब्दात लेखिकेने केले आहे. संपूर्ण पाडा निस्तब्ध झाला होता. शेरू, धुरा एकाकी पडले होते. वाचकांच्या हृदयाचा ठोका चुकवत , हृदयाची धडधड वाढवत कादंबरीचा शोकांत शेवट होतो. या कादंबरीत आदिवासी समाजातील दारिद्र्य कधी संपणार , त्या समाजासाठी शिक्षणाची कवाडे केव्हा उघडी होणार , त्यांना वीज , पाणी, रस्ते ,आरोग्य, शिक्षण अशा सुविधा केव्हा मिळणार असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनासमोर उभे राहतात. या समाजातील कुटुंब व्यवस्था , समाजव्यवस्था आणि त्यांच्या हालअपेष्टा , जीवनमरणाचा चाललेला संघर्ष रेखाटण्यामध्ये ही ेकादंबरी यशस्वी झाली आहे. या कादंबरीत सशक्त कथानक , कादंबरीची प्रवाही भाषा आणि आपलेसे वाटणारे संवाद , त्याचबरोबर मर्यादित पात्रे यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. या कादंबरीला 'घाणी' हे दिलेलं शीर्षक अतिशय समर्पक असे आहे. त्यातून घाणीचा नेमका अर्थ वाचकांच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. मराठी साहित्याच्या वाङमयीन मूल्यांनी नटलेली ही सुंदर अशी कलाकृती निर्माण झालेली आहे.
'घाणी' या कादंबरीचे प्रकाशन हृदय प्रकाशन कोल्हापूर हे आहे. याचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि बोलके बनवले आहे ते अभी पवार या नव्या दमाच्या चित्रकाराने . कादंबरीला साजेसे असे उत्कृष्ट मुखपृष्ठ आपणाला पाहायला मिळते. प्रकाशनाच्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या हृदय प्रकाशनचे हे ८७ वे पुस्तक आहे. या कादंबरीत आशयाला अनुसरून आतील पानावर बाळ पोतदार यांची उत्कृष्ट अशी चित्रे आहेत. ११६ पानांच्या या कादंबरीत शेवटी परिशिष्ट असून स्थानिक भाषेतील शब्दांचे अर्थही दिले आहेत. या कादंबरीसाठी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आणि राष्टपतीपदक विजेते आदर्श शिक्षक डॉक्टर श्रीकांत पाटीलसर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
परशराम आंबी
वरणगे पाडळी
Comments
Post a Comment