महागाईचा भस्मासुर
महागाईचा
भस्मासुर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर एक मोठा असा राक्षस उभा राहतो. लहान मुलांना आपण राक्षसाचं नाव सांगून त्यांना भीती दाखवतो. जेव नाहीतर राक्षसाला बोलवीन असं सांगितल्यावर लहान मूल लगेच ऐकायचं आणि जेऊ लागायचं. मात्र महागाई या राक्षसाचं नाव ऐकलं की सर्वसामान्य माणसाला जगण्याची भीती वाटते. त्याला दरदरून घाम फुटतो. या महागाईमुळे सर्वसामान्य गरीब जनता होरपळून गेली आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणं असह्य होऊन गेलं आहे. हल्ली सगळ्याच वस्तूच्या किमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. एखाद्या वस्तूची किंमत वाढली की उतरण्याचे नावच घेत नाही. बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कुचंबना होत आहे. अन्न , वस्त्र , निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या मूलभूत गरजा भागवणेसुद्धा सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. पूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती. त्यामुळे एका वस्तूच्या बदल्यात आपण हवी ती वस्तू घेऊ शकत होतो. पण आताचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सर्वसामान्य माणसाला दोन वेळच्या जेवणासाठी खूप कष्ट करावे लागत आहेत.
'अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
मग मिळते भाकर '
या पद्धतीप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे आयुष्य महागाईमुळे मेटाकुटीला आले आहे. महागाईचे चटके सहन करत गरीब माणूस पोटाची खळगी भरत आहे. पण पोटाच्या आग थांबत नाहीत. महागाईचा भडका कमी होत नाही.
पूर्वी स्वस्ताईचे राज्य होतं माणसाच्या गरजा कमी होत्या. त्यामुळे माणूस सुखी समाधानी होता. त्याचे जीवन तृप्त होतं. जुन्या काळी एक रुपयात महिनाभराचं घर चालत होतं. आता एक रुपयाची लेमनची गोळीसुद्धा येत नाही. पूर्वी माणूस मूठभर पैसे घेऊन पोतंभरून धान्य आणायचा. आता पिशवी भरून पैसे नेले तरी मूठभर धान्य मिळत नाही. पूर्वी धान्य, भाजीपाला स्वतःच्या शेतात पिकत होता. त्यामुळे पौष्टिक आणि सत्त्वयुक्त आहार मिळत होता. पूर्वी माणसाचं आयुष्य सरासरी शंभर वर्षे मानले जात होतं. चांगला आहार, शुद्ध हवामान यामुळे त्यांचे जीवनमान चांगले होते. आजच्या परिस्थितीत जमिनीचा कस कमी झाला आहे. रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वाढती लोकसंख्या हे एक महागाई वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे वस्तूंचा तुटवडा पडत आहे. त्यामुळे महागाई वाढतच आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच उंच राहणीमानाच्या हव्यासापोटी महागाई वाढतच चालली आहे. तसेच व्यापाऱ्यांची साठेबाजी हेसुद्धा महागाई वाढण्याचे कारण आहे. आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर पेट्रोल शंभरी पार करत आहे. गोडेतेल तर सव्वाशेच्या पुढे गेले आहे. सगळ्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. जीवन जगणं अतिशय हलाखीचं बनलेलं आहे. यातूनच दारिद्र्य आले. भ्रष्टाचार वाढला. अनीतीच्या गोष्टी वाढू लागल्या आणि लोक चुकीच्या मार्गाला लागले आहेत. हे सगळं रोखायचे असेल तर लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. आणि महागाईचा डोंगर कमी झाला पाहिजे. महागाई कमी झाली तरच सर्वसामान्य मनुष्य सुखी आणि समाधानी जीवन जगू शकेल.
Comments
Post a Comment