प्रकरण - ५
प्रकरण-5
' लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा ' असे अनेक मोठ्या व्यक्तींनी म्हटलेले आहे. ते खरे असेल पण मग माझ्या बाबतीत फार खरे नव्हते. बालपणातील सुख म्हणजे काय हेच मुळी मला माहीत नव्हते. बालपणातील आनंदाची गोष्ट म्हणजे शालेय शिक्षण जीवन. त्याविषयी आज माझे विचार मांडणार आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि घरात सगळी पुरुष मंडळी होती. ती पोटाच्या मागे लागलेली होती. त्यामुळे माझ्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार? घरातून शाळेला म्हणून मी बाहेर जायचो. भैरोबाच्या देवळात बसून परत घरी यायचो. काहीवेळा माझे हात पाय धरून , उचलून बांगडी करून मला शाळेत नेल्याचे आठवते. पण पुन्हा शाळा बंद झाली. ती अडीच- तीन वर्षे. घरात काहीतरी काम करायचं. जनावरं सोडायची. त्यांना फिरवायला न्यायचं. हाच माझा रोजचा उपक्रम होता. मी शेजारच्या केशव , अशोक, विलास , बत्तास , मारुती अशा बाल मंडळीबरोबर गोट्यांनी खेळत बसायचो. असेच एके दिवशी पाच वाजता मी , केशव , अशोक , विलास गोट्यांनी खेळत बसलो होतो. त्यावेळी शाळा सुटून मुले घरी परतत होती. आम्ही खेळत होतो तिथून ती मुले जात होती. केशव मला म्हणाला , " परश्या , उद्यापासून आपण शाळेला जाऊया. " माझा पूर्वाश्रमीचा अनुभव म्हणून मी म्हणालो , " नको रे बाबा ! शाळेत गुरुजी मारत्यात." केशवनं सांगितलं, " आरं , मारत नाहीत गुरूजी. अभ्यास केला नाही तर मारतात." मी म्हणालो, "बरं. जाऊया." असं म्हणून आम्ही आपल्या घरात निघून गेलो. केशवच्या मामाचं किराणामालाचं दुकान होतं. त्यानं दुकानातून पाटी आणली. तो सकाळी मला बोलवायला आला . माझ्याकडं पाटी नव्हती , तरीही मी त्याच्याबरोबर शाळेत निघालो. पहिलीच्या वर्गात गेलो. त्याकाळी वरणगे आणि पाडळी या दोन्ही गावासाठी एकत्रित शाळा होती. आमचा पहिलीचा वर्ग मांग वाड्यातील समाज मंदिरात भरत होता. त्या वर्गात फळ्याच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. त्या फोटोच्या पाठीमागे कुणाचीतरी पाटी विसरलेली होती. ती काढून केशवने मला दिली. त्या पाटीवर माझा ' श्री गणेशा ' सुरु झाला. ज्या वर्गात मी बसलो होतो , त्या वर्गाचे शिक्षक काकासाहेब जाधव गुरूजी होते. त्या वर्गाच्या दुसऱ्या बाजूला पहिलीचा वर्ग भरत होता. त्याचे शिक्षक वसंत गायकवाड गुरूजी होते. तर वरणगे ग्रामपंचायतच्या खाली तालमीशेजारी तिसरा पहिलीचा वर्ग भरत होता. त्याचे शिक्षक एस.टी. सुतार गुरूजी होते. म्हणजे १९७५ साली वरणगे व पाडळी या गावातील पहिलीच्या वर्गाच्या तीन तुकड्या होत्या. त्यावेळी बोराटे गुरुजी मुख्याध्यापक म्हणून होते. ते खूप कडक शिस्तीचे होते. विद्यार्थ्यांची थोडी जरी चूक झाली तर ते जबर शिक्षा द्यायचे किंवा मारायचे. पण आम्हांला लाभलेले जाधव गुरुजी मातृहृदयी होते. ते ज्योतिबा डोंगरचे राहणारे होते. पावसाळ्यात छोटे पूल लवकर बुडायचे. नावेने प्रवास सुरू व्हायचा. साधारण महिना - दोन महिने नावेची वाहतूक सुरू असायची. जाधव गुरुजी जोतिबावरून सकाळी ८ वाजता घरातून चालत निघायचे. सकाळी ९ वाजता केर्लीवर यायचे. केर्लीपासून नावेतून वरणगेला यायचे. पाचला शाळा सुटल्यावर नावेतून सहा वाजता केर्लीवर जायचे. तेथून चालत जोतिबावर घरी ७ ते ७.३० वाजेपर्यंत जायचे. नाव आमची असल्यामुळे वडील दररोज नावेवर असायचे. नावेत जाधव गुरुजींच्या वडिलांशी रोज गप्पा चालायच्या. माझ्याविषयीची चर्चा व्हायची. माझ्याबाबत सर्व परिस्थिती त्यांना समजलेली होती. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक लक्ष माझ्याकडे होते. शिकवण्यात त्यांचा हातखंडा होताच. पण अभ्यासाबरोबरच ते खूप गोष्टी सांगायचेत. दुपारी चार नंतर खेळायचा तास असायचा. त्या तासाला ते वेगवेगळे खेळ घ्यायचे. इतिहास खेळातून घ्यायचे. त्यावेळी रामायण , महाभारत यातील छोट्या छोट्या गोष्टी पुस्तकात होत्या. ते वर्गात गोष्ट सांगायची आणि खेळाच्या तासाला त्याचे प्रात्यक्षिक करून घ्यायचे. उदाहरण ' राम व भरत भेट ' हा पाठ. एका विद्यार्थ्याला राम तर दुसऱ्याला विद्यार्थ्याला भरत करायचे. काहींना इतर पात्रे द्यायची. पाठ करून यायला सांगायचे. संवादरूपाने पाठ घ्यायचे. त्यामुळे सारा इतिहास तोंडपाठ व्हायचा.
पहिली , दुसरी आणि तिसरी झाली. मला आजही तिसरीची वार्षिक परीक्षा दिलेला दिवस आठवतो. आमची तिसरीची वार्षिक परीक्षा पाटीवर झालेली होती . त्यावेळी परीक्षेसाठी पाटीवर काही गणितं घातलेली होती. ती सर्व गणितं मी सोडवलेली होती. मला १०० पैकी १०० गुण मिळालेले होते. ते पाहून मी वर्गातून घरापर्यंत ओरडतच आलेलो होतो.
जून महिना सुरू झाला. मी चौथीच्या वर्गात गेलो होतो. चौथीचा वर्ग सुरू झाला. स्कॉलरशिप परीक्षेचं वारं वाहू लागलं. जाधव गुरछजींनी वर्गातील ४-५ हुशार मुलं-मुली निवडलेली होती. आमची अ तुकडी आणि ब तुकडीतून गायकवाड गुरूजींनी ४-५ मुलं निवडलेली होती. दोन्ही तुकडीतून मी, मिलिंद कांबळे , संजय कांबळे , महादेव बंगडे , शिवाजी जाधव, नयना नलगे, सुनीता शिंदे अशी स्कॉलरशिप परीक्षेसाठी निवडलेली होती.
सकाळी दहा ते अकरा जादा तास आणि संध्याकाळी पाच ते सहा जादा तास असायचा. शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे जाधव गुरुजी शुक्रवारी शाळेतच राहायला असायचे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी एखाद्या मुलाला जेवण आणायला सांगायचे. स्कॉलरशिपची मुले अभ्यासासाठी सातनंतरही यायची. तेव्हा शाळेत लाईट नव्हती. राॅकेलचा दिवा किंवा कंदिल असायचा. राॅकेल तेलाची सोय केशवनं केलेली असायची. आम्ही मुले शुक्रवारी झोपायला शाळेतच थांबायचो.
जाधव गुरुजींनी मला स्कॉलरशिप परीक्षेला बसवले होते. त्यांनीच स्कॉलरशिपचे गाईड , वह्या मला घेऊन दिलेले होते. ते खूप अभ्यास करून घ्यायचे. एके दिवशी मी अभ्यास केला नव्हता. त्यादिवशी त्यांनी मला सर्व वर्गभर गुडघ्यावर चालायला लावलेले होते. तेव्हा मी ठरविले की कधीही अभ्यास चुकवायचा नाही. तेव्हापासून माझा दोनदा अभ्यास व्हायचा. कारण मी माझा अभ्यास पूर्ण करायचा आणि माझा जिवलग मित्र केशवचाही अभ्यास मीच लिहित होतो. कारण केशवच्या मामाचे किराणा मालाचे दुकान होते. तसेच रॉकेल वाटप दुकान होते. त्यामुळे केशव सकाळी उठला की दुकानात जायचा. त्याची दहा ते पाच शाळा. पुन्हा पाचनंतर दुकान बंद होईपर्यंत दुकानात थांबायचा. त्याला मार बसू नये म्हणून मीच त्याचा अभ्यास पूर्ण करत होतो.
सुट्टीत अभ्यासासाठी स्कॉलरशिपचे गाईड घेऊन संजय कांबळे यांच्या घरी जात होतो. तेव्हा वरच्या वर्गातील मुलं तिथं भेटायची. त्यातील चित्र पाहून आम्हांला प्रश्न विचारायचे. त्यावेळी आम्हांला उत्तरं द्यायला घ्यायची नाहीत. तेव्हा ती मुलं हसायची आणि नावं ठेवायची. पण आम्हांला त्याचं काहीच वाटत नव्हतं. कारण तेव्हा आम्हांला काहीही स्काॅलरशिपचं शिकविलेलं नव्हतं.
दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर शाळा सुरु झाली . आमच्या शाळेची सहल पुणे , देहू, आळंदी जायची ठरलेली होती. मुलांच्या कडून पैसे जमा केले जात होते. दोन एस.टी.ची भर झालेली होती . पण त्यात एक जागा जाधव गुरूजींनी शिल्लक ठेवलेली होती ती माझ्यासाठी. त्यावेळी सहलीसाठी तीस रुपये फी होती. तेवढे पैसे भरण्याची माझी कुवत नव्हती. जाधव गुरुजींनीच ते पैसे भरलेले होते. सहलीच्या आदल्या दिवशी सर्व मुलांना जमा करून सहलीच्या सूचना द्यायला सुरुवात झाली होती. सहलीसाठी कोण कोणत्या वस्तू घ्यायच्या . किती पैसे घ्यायचे हे सांगितलं जात होतं. सूचना देऊन झाल्यावर जाधव गुरूजींनी केशवला बोलवलं आणि सांगितलं , "केशव , उद्या येताना तुझ्या डब्यात दोन चपात्या ज्यादा घेऊन ये. " केशवनं आनंदानं मान हलवली.
दुस-या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सगळे जमा झाले. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. विविध स्थळं पाहत देहूला मुक्कामाला पोहोचलो. सकाळी उठून आळंदी करून पुण्यात आलो. सर्वांबरोबर जेवणाची सोय झाली होती. पण पुण्यात मुले खायला घेत होती. मी गप्प होतो. तेव्हा जाधव गुरूजींनी मला चिक्की , मिठाई घेऊन दिली.
माझ्या जीवनातील पहिली सहल संपन्न झाली.
जानेवारी महिना आला की स्काॅलरशिप परीक्षेच्या सरावाला सुरुवात होते. त्यावेळी आमच्या भागातील सर्व शाळांची स्कॉलरशिपची सराव परीक्षा वडणगे शाळेमध्ये व्हायची. मार्गदर्शन व्हायचे. कारण वडणगे ही केंद्र शाळा होती. त्यावेळी चौथी व सातवी केंद्र परीक्षा व्हायच्या. सराव परीक्षेतील उत्तर पत्रिका पाहिल्यानंतर वडणगे केंद्रातील मेळवंकी मॅडम यांनी माझे कौतुक केले होते. जाधव गुरुजींना सांगितले की याच्याकडे चांगले लक्ष द्या. फेब्रुवारी १९७९ च्या दुस-या रविवारी चौथी स्कॉलरशिप परीक्षा झाल्या.
एप्रिलमध्ये चौथी केंद्र परीक्षा वडणगे केंद्रावर झाली. जाधव गुरूजींनी मला मे महिन्यामध्ये कोल्हापूरला एका परीक्षेसाठी नेले होते. ती परीक्षा म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा ' राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन ' शिंगणापूर या शाळेची प्रवेश परीक्षा .
माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त पहिला आनंददायक क्षण म्हणजे जून १९७९ मधील. कारण राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये गुणवत्तेनुसार माझी निवड झाली होती. आणि त्याच वेळी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागलेला होता . माझा कोल्हापूर जिल्ह्यात एकविसावा आणि करवीर तालुक्यात दुसरा क्रमांक आलेला होता . हा दुग्धशर्करा योग होता. स्कॉलरशिप परीक्षेत नंबर आलेला होता याची बातमी पेपरमध्ये द्यायची होती. त्यासाठी फोटो काढायचा होता . माझ्या अंगात चांगला शर्ट नव्हता . आमच्याच गल्लीतील दिनकर याचा शर्ट मी आणून घातला. जाधव गुरुजींच्या बरोबर सायकलवरून कोल्हापूरला निंगुरे फोटो स्टुडिओत फोटो काढून आलो. ३० जून १९७९ रोजी माझी बातमी दैनिक पुढारी या दैनिकात प्रसिद्ध झाली होती. त्याकाळात वरणगे पाडळी गावात स्कॉलरशिप परीक्षेत नंबर आलेला मी एकमेव विद्यार्थी होतो. म्हणून जाधव गुरुजीनी सत्कार कार्यक्रम शाळेत आयोजित केलेला होता. त्यांनी गावातील लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यावेळी रोख रक्कम पाचशे रुपये मदत जमा झाली होती. तेव्हा १५ पैसे चहा व ३५ पैसे भजी , वडा होता. जमा झालेल्या पैशातूनच मला विद्यानिकेतनला जाण्यासाठी पत्र्याची एक ट्रंक, रग , चादर , बेडशीट , शाळेचा युनिफॉर्म व इतर सर्व साहित्य घेतले होते. माझी कपडे शिवायला महाराणा प्रताप चौकातील प्रसिद्ध खटावकर टेलर यांच्याकडे टाकलेली होती.
प्रकरण 6
विद्यानिकेतनला जाण्याचा दिवस उगवला. त्यादिवशी जाधव गुरुजी स्वतः माझ्याबरोबर मला सोडायला शाळेत आलेले होते. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पालक भेटीसाठी ते स्वतः येत होते. माझे वडील अपवादानेच एखाद्या रविवारी आलेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाचवीच्या वर्गात सर्व मुलांना ओळख परेडसाठी बोलावले होते. प्राचार्य जो.म. साळुंखे हे प्रत्येकाला उठवायचे आणि नाव विचारायचे. नाव सांगताच त्याची माहिती ते स्वतः सांगायचे. मला नाव विचारताच मी माझे नाव सांगितले. त्यावेळी त्यांनी माझा स्कॉलरशिप परीक्षेला नंबर आला असे सांगितले होते. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता किती कुशाग्र होती हे यावरून दिसून येते. परीक्षेला बसलेल्या मुलांतून निवड झालेली मुले , त्या प्रत्येकाची माहिती अगोदर करून घेतलेली होती. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांने नाव सांगताच त्याची सारी कुंडली ते सांगत होते. नवीन शाळा , शाळेचा परिसर , नवीन शिक्षक पाहून माझे मन भरून आले होते. पाचवीला आलेली नवीन मुले . नवीन वातावरणामुळे , आई , वडील व घराच्या आठवणीने काहीजण रडायचे. मला मात्र रडू येत नव्हते. कारण आठवणी येण्यासारखे फारसे काही नव्हते.
पाचवीच्या सुरुवातीलाच व्ही.डी. चव्हाण सरांचा तास असायचा. " तू मला खाशील , तर मी तुला खाईन " ही गोष्ट ते सांगायचे. ते विषयाचे शिक्षक नव्हते परंतु आरोग्यविषयक माहिती द्यायचे. आजारी मुलांना औषधे द्यायचे.
पाचवी , सहावी कशी निघून गेली हे कळले नाही. प्रत्येक परीक्षेत पाच ते दहा नंबरात असायचो. सातवीत आल्यावर स्कॉलरशिप परीक्षेला बसलो. त्याचा वेगळा असा अभ्यास करून घेतला जात नव्हता. प्रवेश परीक्षेतून विद्यार्थी निवड केलेली होती. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त स्कॉलरशिप अभ्यासासाठी बसवले जात होते. शाळा सुटल्यानंतर शिक्षक अभ्यासाला बसवून बाहेर जायचे. फिरून आल्यानंतर अभ्यास तपासायचे. चाचणी सोडवली का असे विचारायचे. सगळे ' हो ' म्हणायचे. सोडवलेले पाहायचे. सगळ्यांचे गुण गणितामध्ये ८०,८५,९० च्यावर. मला मात्र २७ मार्क मिळालेले होते . कमी मार्क म्हणून मला मार बसायचा. पण तो प्रामाणिकपणासाठी होता. कारण इतर मुलं शिक्षक नसल्यामुळे गाईडात पाठीमागे बघून उत्तरे लिहायची. मी तसे करत नव्हतो.
मला सातवी स्कॉलरशिप परीक्षेचा दिवस आठवतो. शाळेतील स्कॉलरशिपच्या सर्व मुलांना घेऊन शाळेची गाडी कोल्हापूरच्या केंद्रावर पोहोचली. आम्ही सर्वजण आपापला नंबर शोधून जाग्यावर जाऊन पेपरला बसलो होतो. पहिला मराठीचा पेपर झाला. सर्वांना सोपा गेला. दुसरा गणितचा पेपर झाला. सर्वांना चांगला गेला होता , पण मला थोडा अवघड गेलेला होता . तिसरा पेपर बुद्धिमापन चाचणीचा होता. तो लिहिताना मला शेवटची पंधरा-वीस मिनिटे फार त्रास झाला. माझे डोके दुखत होते . पेपर देऊन सगळे बाहेर आलो. गाडीत बसलो . मुलांची चर्चा सुरू होती . कोणी म्हणत होतं ' चक्कीत जाळ ' तर कोणी म्हणत होतं ' शेंडीत धूर काढीन ' याचा अर्थ त्यांना पेपर सोपे गेले होते. मी मात्र शांत शांत होतो . कारण माझे डोके दुखत होते. पण जेव्हा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागला. तेव्हा कोणाचाही नंबर आला नाही. जिल्हा स्तरावर माझा परीक्षेत नंबर आला होता. त्यावेळी पंचायत समिती करवीर चे सभापती पी. डी. पाटील साहेब होते. त्यावेळी प्राचार्यांनी त्यांना एकदा फोन केलेला मला आठवतो. साहेब , यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत आलेल्या मुलांचा सत्कार केव्हा करता? आपल्याच गावातील मुलाचा नंबर आलेला आहे.
राजकारणविरहित एखादी गोष्ट असते , तेव्हा तिचा विकास घडत असतो. पण त्या गोष्टीत राजकारणाने शिरकाव केला की त्याची बरबादी व्हायला फार वेळ लागत नाही. असं काहीसं जिल्हा परिषदेची शाळा राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेसंदर्भात झालं असावं असं मला वाटतं. या राजकारणाला सुरुवात झाली असावी ती मी आठवी पास झाल्यानंतर नववीत गेलो तेव्हा झाली असावी. कारण अचानक प्राचार्य साळुंखे सरांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी आमचा वर्ग साळुंखे सरांच्या बाजूनं होता . आमच्या आधीचा वर्ग हा त्यांच्या विरोधात होता. साळुंके सरांची बदली झाल्यामुळे आमच्या वर्गातील मुलं बदलीच्या विरोधात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याला जात होती. त्या वर्गातील फक्त मी तेवढा बाजूला होतो. त्या मोर्चात मी सामील नव्हतो. कारण आमच्या वर्गातील काही मुलं अतिशय खोडकर होती. तसेच त्यांचे विचार मला पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यापासून मी दूर होतो. म्हणजे वरच्या वर्गातील मुलात मी मिसळत होतो. कारण त्या वर्गात माझा गाववाला अंबाजी पाटील आणि आंबेवाडीतील बाबासाहेब कोईगडे हे माझे खास मित्र होते. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त मी त्यांच्यात मिसळत होतो. आमच्या वर्गातील मुलांनी केलेल्या खोड्यातील एक खोडी अशी-- एकदा शिवाजी नावाचा वाचमेन झोपला होता. तेव्हा त्याच्या अंगावर चुन्याचे पाणी ओतले होते. आणि भिंतीवर लिहिले होते ' झोपतोस , घे प्रसाद '.त्या प्रकरणाची चौकशी होऊन आमच्या वर्गातील शशिकांत मगदूम व शशिकांत मोडके या दोन मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. साळुंकेसरांनंतर चौगुलेसर प्राचार्य म्हणून आले . पण त्यांचे शाळेकडे लक्षच नव्हते. नेहमी बाहेर असायचे.
हे कमी होते म्हणून आमची नववीची परीक्षा झाल्यानंतर आम्ही दहावीत जाताच आम्हांला गणित शिकवत असणारे शिक्षक कदमसर यांची अचानक बदली मेन राजाराम हायस्कूलला केली होती. त्यामुळे दहावीला असताना आम्हाला गणिताला शिक्षकच नव्हते. मुलींच्या शाळेतील गणित शिक्षक काही दिवस शिकवायला आले होते. मला इयत्ता नववीला गणित विषयाला ७२ व ७३ म्हणजे १५० पैकी १४५ गुण होते. दहावी बोर्ड परीक्षेला गणिताला १५०पैकी ७७ गुण पडले होते. म्हणजे मला दहावीला एका विषयातच दहा टक्के गुण कमी पडलेले होते.
मराठी विषय शिकवण्यासाठी पी. आर.पाटीलसर होते. माझे मराठी व्याकरण इतके उत्तम होते की पाटीलसरांनी माझे नाव भास्कराचार्य असे पाडले होते. वृत्ते ,अलंकार हे पाठांतरच असायचे. पाचवीपासून अवांतर वाचनाची आवड लागलेली होती. चांदोबा , चंपक अशी मासिके शाळेत येत होती. शाळेचे ग्रंथालय होते. मला लेखनाची आवड निर्माण झाली ती महाजनसरांच्या प्रोत्साहनामुळेच. ते संस्कृत शिकवत होते , पण भित्तीपत्रकसारखे उपक्रम राबवत होते. सातवीला असताना मी ' दोन केळी ' नावाची कथा लिहिली होती. तर नववीला असताना मी ' विशाल भारत ' नावाची स्त्री पात्र विरहित एकांकिका लिहिली होती. महिन्यातून एकदा रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केलेले असायचे. आमच्या रूमच्या मार्फत ती एकांकिका बसवलेली होती. मी , भूपाल दिवेकर आणि सात-आठ जणांनी त्यात सहभाग घेतलेला होता. ती एकांकिका पाहून आमचे विज्ञानचे शिक्षक पेडणेकर सर यांनी ५१ रुपये बक्षीस म्हणून दिले होते. पाचवीला इंग्रजी प्राचार्य जो.म. साळुंखे सर शिकवत होते. माझा आणि इंग्रजीचा 36 चा आकडा होता. मला इंग्रजी काही कळायचेच नाही. तेव्हा प्राचार्य मला हिणवायचे 'अहरे स्कॉलर .' पण मला त्यांचा राग कधी आला नाही किंवा माझ्या इंग्रजीत फारसा फरक पडला नाही. ते अगदी तन्मयतेने इंग्रजी शिकवायचे. ' लेझी मेरी ' ही कविता साभिनय शिकवायचे. पण वडणगेकर सरांनी माझी थोडी इंग्रजीत प्रगती करून घेतली.
मी शाळेत असताना इयत्ता आठवी आणि नववीत भोजन मंत्री होतो. सर्व विद्यार्थ्यांना जेवायला वाढायला मदत करायची. शेवटी आपण जेवायचे. त्यामुळे अभ्यासापेक्षा समाज सेवा करण्याकडे अधिक लक्ष होते.
आमचा वर्ग प्राचार्यांच्या बाजूने असल्यामुळे इतर शिक्षकांचे आमच्या वर्गाकडे दुर्लक्ष होते. आमचाही वर्ग तितकाच खट्याळ होता. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत सर्व मुले वर्गात बसायची. दुपारी बारानंतर जेवायला सुट्टी व्हायची. जेवणानंतर मुले वर्गात जायचे नाहीत. शिक्षक यायचे. वर्गात डोकावयाचे पोरं नाहीत म्हणून स्टाफरूम मध्ये परत जायचे. जेवण झाल्यावर मुले कॉटवर झोपून आराम करायची. मातृह्रदयी महाजन सर संस्कृत शिकवायचे. ते मात्र खाली मुलं झोपलेल्या रूममध्ये यायचे. प्लेन काॅट उभा करून त्यावर ते शिकवायचे. पण मुलांना त्याचे काही वाटत नव्हते. असे काही दिवस सुरू होते. मग त्यांनी मुलांना सांगितले , "मुलांनो, हे तुमचं दहावीचं वर्ष आहे. ते महत्वाचे आहे. तुमच्या आयुष्याचं नुकसान होईल. असं करू नका. वर्गात बसा." तेव्हा सर्व मुले वर्गात जाऊन बसू लागली. या साऱ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल कमी झालेला दिसून येतो. ९२ /९३ टक्केचा पहिला येणारा विद्यार्थी आमच्या बॅचचा पहिला आलेला विद्यार्थी ८०/८५ च्या आसपास आलेला होता. मुलांचा खट्याळपणा आणि गणिताला विषय शिक्षक नसल्यामुळे टक्केवारी कमी झालेली होती. माझ्याही पेक्षा हुशार असलेला अरुण हेगडे हा गणित विषयात नापास झालेला होता.
Comments
Post a Comment