प्रकरण - ४

प्रकरण चार
         अजूनही बालपणातील तो प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो.  आईचं निधन झालं , त्यावेळी मी चार-पाच वर्षाचा होतो. लहान भाऊ शिवाजी दहा महिन्याचा होता.  त्याचा सांभाळ कमळाजीनं केला होता. शिवाजी तिला आई म्हणून बोलवायचा. 
          घरात वडील आणि आम्ही पाच जण भाऊ.  चंद्रकांत म्हणून माझा मावस भाऊ हा लहानपणापासूनच आमच्या घरी होता.  म्हणजे घरात आम्ही एकूण सात जण पुरुषच होतो.  जेवण करण्यासाठी कोणीही बाई -माणूस घरात नव्हते. म्हणून रजपूतवाडीतील थोरली मामीअनुबाई ही जेवण करण्यासाठी आणून ठेवलेली होती.  सर्वात मोठा भाऊ संभाजी होता.  त्याचं लग्न करायचं ठरविलं होतं. नवरी मुलगी पाहण्यासाठी सुरुवात केलेली होती. आंबेवाडी येथील शिवाजी आंबी यांची मोटारगाडी घेऊन कोल्हापूर जिल्हा , सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील पाहुण्याच्या घरी भेटी सुरू झाल्या.  सगळीकडे फिरवून झाल्यावर आंबेवाडी येथील हरिभाऊ आंबी यांची मुलगी छाया ऊर्फ जनाबाई.  तिच्याशी मोठ्या भावाचं लग्न झालं.  लग्न झाल्यानंतर काही दिवसात मी आजारी पडलो होतो.  तो आजार पण इतका भयानक होता. मला संडासला लागले होते. संडासवाटे रक्त आणि सेम पडत होता. त्याबरोबरच अंगही बाहेर येत होते.   महिनाभर माझा हा आजार होता.  माझी भावजय  जनाबाई हिनं कोणताही विचार न करता माझं बाहेर आलेले अंग फडक्याने ती आत बसवत होती. माझे आयुष्य असेपर्यंत मी हे विसरू शकणार नाही.  महिनाभर मी अंगात चड्डी घातली नव्हती. कमरेभोवती फक्त रुमाल बांधलेला होता.   १९७४-७५ चा तो काळ होता.आजच्या सारखी त्यावेळी गावात औषध दुकानं, दवाखानं काहीही नव्हते. नगारजीचा दवाखाना होता, पण दवाखान्यात जायला लोकं घाबरायचीत.   एखादा डॉक्टर  कोल्हापुरातून यायचा. भैरोबाच्या  मंदिरात थांबायचा. मला वाटतं की धर्माधिकारी असे त्या डाॅक्टरांचे नाव असावे. ते  तपासून परत जायचे. पण माझा हा आजार कमी व्हायचं नाव नव्हते. महिनाभर  मी हे दुखणं सहन करत होतो.  त्यावेळी शेजारच्या चंद्राबाई पाटील , अनुबाई यादव अशा बायका मला नवनवीन पदार्थ करून आणत होत्या. बिन आईचं  
पोर म्हणून भरवत होत्या.  गावातील झाडपाला किंवा इतर औषधं चालू होती.  माझा आजार थांबला. पण खूपच अशक्त आलेला होता. दिवाळीचा सण होता. मला वहिणीनं आपल्या माहेरी आंबेवाडीला नेलं होतं. मला नवी कपडे घेतली होती. मला खूप आनंद झाला होता. 
          या आजारपणात एके दिवशी एक मोठा मुंगळा माझ्या अवघड जागेला लावला होता.  त्यावेळी मला खूप वेदना झाल्या होत्या. अक्षरशः मी दोन्ही हातांनी बोंबलत होतो. शेवटी त्या मुंगळ्याला मारला. तेव्हा माझी सुटका झाली.  
          घर म्हटले की भांड्याला भांडे लागायचंच.  या पद्धतीने आमच्या घरातही भांडणं व्हायची. भांडण होऊन व्हायचे तेच झाले.  वडिलांचं आणि थोरल्या भावाचं पटलं नाही.  तो आपल्या बायकोला घेऊन बाजूला राहिला. आंबेवाडीत जाऊन राहिला. 
             घरात येरे माझ्या मागल्या सुरु झालं. दुसर्‍या भावाचं लग्न करावं , तर तो वयाने लहान होता.  काही लोकांनी वडिलांना लग्न करायचा सल्ला दिला.  पण वडिलांनी मुलांना सावत्र पणाचा त्रास होईल म्हणून लग्न करण्यास नकार दिला.  जेवणाची आभाळ होऊ लागली.  भात आमटी हाताने करायची.  भाकरी कोणीतरी करून द्यायचं.  रोज रोज कोण करून देणार ? हा प्रश्न होताच.  तेव्हा आमच्या शेजारची सोनाक्का  गावातच  भैरव गल्लीत आंबेकरांच्या घरी दिली होती.  तिने सांगितले , " रोज सकाळी आणि संध्याकाळी पीठ घेऊन या. भाकरी करून देतो." पण पीठ घेऊन कोण जाणार? धोंडिराम व चंद्रकांत सकाळी शेतात जाऊन वैरण आणायचे. तुकाराम शिक्षणासाठी रजपूतवाडीत होता. शिवाजी तर तीन-चार वर्षाचा होता. राहिलो तो मीच. मी दररोज ताटलीत पीठ घेऊन सोना मावशीच्या घरी जात होतो. सोनाक्काला आम्ही सर्वजण सोना मावशी म्हणायचो. त्यांच्या भाकरी होईपर्यंत थांबायचं. त्यांच्या भाकरी झाल्यानंतर ती आमच्या भाकरी करून देत होती.  काही वेळेला तिला कामाचा ताप झालेला असायचा , तेव्हा तीसुद्धा वैतागायची . काहीतरी म्हणायची.  तेव्हा मी भाकरी करून आणायला नकार देत होतो.  मग अण्णा म्हणजे वडील दुसऱ्या एखाद्या घरी पाठवून देत होते. तेथे पीठ घेऊन जाऊन भाकरी करून आणायचं  माझं काम होतं. असे पाच-सहा महिन्याचा कालावधी निघून गेला. शेजारच्या यशवंत पाटील (वकील) यांची बहीण अनुबाई हिचं लग्न कसबा ठाणे पैकी महाडिक वाडी येथील श्री. महाडिक यांचेशी झालेलं होतं , परंतु  काही कारणावरून भांडण झालेलं होतं.  त्यामुळे ती मुलांसह माहेरी राहत होती. ती आपल्या भावाला सगळ्या कामात मदत करायची. तिच्याबरोबर मीही आमची जनावरे घेऊन पावसाळ्यात चारण्यासाठी पाडळीच्या डोंगराखाली घेऊन जात होतो. दिवसभर गुरे चारत बसायचो. जनावरं चरत राहायची. लांब गेली तर हाकलून आणायची. दुपार झाली की जेवायचं. बाकी खड्यांनी , जिबलीनं किंवा गोट्यांनी खेळायची. तेव्हा पोरगा - पोरगी असा फरक जाणवायचा नाही.  त्यावेळी आमच्या घरात मुलगी नव्हतीच. त्यामुळे शेजारची मुलगी ही आपली बहीण असायची. प्रत्येक रक्षाबंधनला राखी बांधून घ्यायची. भाऊबीजेला ओवाळून घ्यायचं , हे दरवर्षी  ठरलेलं असायचं. शेजारी हे शेजारी नव्हतेच. घरातीलच माणसे असायची. फक्त रात्री झोपायला ज्याच्या घरी. आजच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येकाची रूम वेगळी. त्यामुळे परकेपणा कधीच वाटला नाही. मुलगा-मुलगी , आपला- परका असा भेद वाटला नाही.  त्यामुळे एकत्र खेळत होतो. सायंकाळ झाली की जनावरे घेऊन घरी परत येत होतो. 
              घरी येऊन अनुमावशी भाकरी करून देत होती.  पंधरा- सोळा दिवस झाल्यानंतर तिनं चंद्रकांतला भाकरी कशा करायच्या हे शिकवलं होतं. मी त्याला चंदूदादा म्हणत होतो. चंदुदादाही मन लावून भाकरी करायला शिकला होता.  तव्यात पाणी गरम करायचं. ते गरम पाणी  उतवणी म्हणून भाकरीच्या पिठात ओतून घ्यायचं. ते पीठ एकजीव होण्यासाठी परातीत मळायचं. त्या मळलेल्या पिठातील एक गोळा करून हातानं थापायचा. थापलेली भाकरी उचलून तव्यात टाकायची. तव्यात भाजलेली भाकरी चुलीला लावायची. ती ठुमदिशी फुगायची. त्याचा पापड मोठा व्हायचा. भाकरी खाताना तिला एक वेगळीच चव असायची.  वर्ष-दोन वर्षे त्यानं भाकरी करून घातल्या.  त्यावेळी चंदुदादा आमटी करायचा ती अफलातून.  आजच्या सारखा आमटीला तेलाचा तवंग नसायचा . पण चव मात्र फार टेस्टी असायची. चुलीवर भांडं ठेवायचं. चुलीत लोखंडी उलतणं तापवायचं. भांड्यात चमचाभर(चहाचा) तेल घालायचं. लालभडक झालेलं उलतणं घ्यायचं . त्यावर लसणाच्या दोन कुड्या ठेवून ते भांड्यात सोडायचं , थोडी चटणी ,मीठ , डाळ घालायची. त्यात पाणी घालायचं.  वर झाकण म्हणून प्लेट ठेवायची. मिनिटभरात  त्याचा वास घरभर पसरायचा. त्याला अस्सल फोडणी म्हणायची . त्यावेळी एक किलो गोडे तेल महिनाभर जायचं. 
            धोंडिराम थोडा मोठा झाला. आम्ही त्याला भाऊ म्हणतो. भाऊच्या लग्नाचा विषय घरी सुरू झाला.  सांगरूळमधील बाबुराव आंबी यांची बहीण कोयना.  तिच्याशी भाऊचं लग्न झालं.  आणि विस्कटलेल्या संसाराची घडी पूर्ववत झाली. घरात बाईमाणूस आलं.  त्यावेळी मी इयत्ता सहावीला होतो. माझी शाळा शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेची.  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन असे नाव होते.   
       नुकतेच लग्न झालेली कोयना वहिनी कपडे धुण्यासाठी पाडळीतील घाटावर गेलेली होती.  तिच्याबरोबर मी आणि लहान भाऊ शिवाजी होता.  शिवाजी त्यावेळी सात - आठ वर्षाचा होता. वहिनी खाली मान घालून धुणे धूत होती.  मी पोहत नदीच्या पल्याड किनाऱ्यावरती गेलो होतो. शिवाजी काठावरती बसलेला होता.  खेळता खेळता न कळत  बाजूला असणा-या खोल पाण्यात गेला.  पलीकडे किना-यावर मी होतो. तो बुडताना मी पाहिलं आणि पोहतच अलीकडे येऊन त्याला बाहेर काढले. त्याचा जीव वाचला आणि वहिनीचं नांदणंही वाचलं .  
              चंदुदादा आणि आमचे वडील यांचे भांडण झाले. वडिलांना आम्ही सारे ' ' अण्णा ' म्हणत होतो.  चंदुदादा म्हणायचा , " अण्णा , तुला जशी पाच मुलं आहेत तसा मी सहावा. मला घरातली आणि शेतातली वाटणी हवी आहे.  लहानपणापासून मी येथेच आहे.  तुझ्या मुलांना मी भाकरी करून घातली आहे." त्यावर अण्णा म्हणाले , " तुला लहानाचा मोठा केला . तुला खायला घातले. ज्या घराचं खाल्लंस त्या घराचं असं पांग फेडतोस काय?  तुला काही मिळायचं नाही.  तू आता इथं राहू नकोस . तुझ्या तू गावाकडे जा. "  रागारागानं चंदुदादा आपल्या  गावी कुरुंदवाडला निघून गेला.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील