प्रकरण-३
प्रकरण ३
माझा जन्म झाला त्यावेळची गोष्ट. मी लहानपणी खूप रडायचो. कितीही शांत करायचा प्रयत्न केला तरी माझं रडणं काही थांबायचं नाही. सर्व प्रकार करुन पाहिले. पण मी रडायचा थांबलो नाही. एकदा एक शेजारची आजी घरी आली होती. ती म्हणाली , " याचं रडणं थांबवायचं असंल तर त्याचं नाव बदललं पायजं. तुमच्या घरातल्या मरण पावलेल्या एखाद्या माणसाचं नाव त्याला ठेवा , म्हणजे तो रडायचा थांबेल. " मग माझं नाव परसू असं ठेवण्यात आलं. कारण माझ्या आजाचं म्हणजे वडलांच्या वडिलांचं नाव परसू असं होतं. नाव बदललं त्याचा फारसा परिणाम झाला की नाही मला माहीत नाही , पण थोडं रडणं कमी झालं. असं मला नंतर कळायला लागल्यावर सांगण्यात आले. रडणं कमी झालं. पण हट्टीपणा काही कमी झाला नाही. मी लहानपणी खूप चहा पीत होतो. माझ्यासाठी चहा पिण्यासाठी चिनी मातीचा एक मोठा कप होता. साधारणत: अर्धा लिटर होईल इतका मोठा. तो कप (मग) भरून चहा दिल्या शिवाय माझं समाधान व्हायचं नाही. नाहीतर तो चहा सांडायचो. असे आता सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. पण मला कळत होतं . त्यावेळी मी स्वतः तो कप (मग) पाहिलेला आहे.
आई जेवण करायची. मी रडायचो. तेव्हा आईचा एक हात भाकरी थापण्यासाठी तर दुसरा हात माझ्या पाळण्याची दोरी ओढण्यासाठी असायचा. मोठी भावंडं रजपूतवाडीत असायचीत शिकण्यासाठी. ती रानात गेली की तिचा पदर धरून मीही तिच्यासोबत जायचो. वरणगेत असताना मी तिला कधी एकटे सोडलेच नाही. पावसाळा सुरू झाला की ती वाकळ शिवायला घालत होती. किमान दहा-बारा तरी वाकळा तिनं शिवलेल्या होत्या. वरणगेत दोन - चार वाकळा ती गेली तेव्हा होत्या. तितक्याच रजपूतवाडीत होत्या. तुम्हांला आश्चर्य वाटेल. कारण आज रेडिमेडचा जमाना आहे. आज चादरी , जमखाना , बेडशीट असं सारं हवं ते मिळते आहे. पण माझ्या मामाने माझ्या आईची आठवण आजही जपून ठेवलेली आहे ती म्हणजे तिने शिवलेली वाकळ. आज पंधरा - सोळा वर्षे झाली ती वाकळ फारशी वापरात नाही. कारण ती वजनाने फार मोठी आहे. ती उचलून घडी घालण्याइतपत ताकद राहिली नाही. पण वर्षातून दोन वेळा ती वाकळ बाहेर काढली जाते. एक गुढी पाडवा आणि दुसरा दसरा. कारण धुवून वाळवून ठेवण्यासाठी. मामा म्हणतो , " माझ्या आक्काची ती एकच आठवण मागे शिल्लक आहे. ती जावून पन्नास वर्षे होत आहेत. तिनं जे भोगलं , सोसलं . इतरांसाठी काय काय केलं , ते जाणू द्यात अगर नाही जाणू द्या. मला सगळं जाणवतं. नव-यानं आयुष्यभर छळलं आणि पोरानीसुद्धा छळलं. आधी मुलं होईनात. झाली तर जगनात. त्या काळी इंग्रज मिशनरीचे डाॅक्टर किशा बापूंच्या बंगल्यात यायचे. डाॅक्टरांकडून औषधोपचार करून घेतले. मग मुलं होऊ लागली. सगळ्यात थोरला संभाजी झाला. तो थोडा मोठा झाला. एकदा रुसला आणि जोतिबाच्या डोंगरावर गेला. माऊलीचं रडून डोळं सुजलं. नवसानं झालेला पोरगा. तो असा घरातनं निघून गेला. कितीतरी घटना तिनं पचवल्या आहेत. अशा माझ्या आक्काच्या आठवणी त्या वाकळंसोबत जपतो आहे. ती निव्वळ वाकळ नाही तर वाकळंबरोबर मला माझ्या आक्काचा भास होतो." मामाच्या शब्दा-शब्दातून माझ्या आईचं अस्तित्व पाझरत असतं.
माझा चुलत मामा बंडू हा लहानपणी आमच्या घरी होता. तो कधी वरणगेत तर कधी रजपूतवाडीत असायचा. आमच्या घरी काळा बैल होता. तो 'बाळा ' बैल म्हणून ओळखला जायचा . तर घरच्याच गाईला रजपुतवाडीत एक खोंड झालेला होता. त्याचं नाव असं ठेवलं नव्हतं , पण त्याला ' पाडा' असे म्हणत होते. काळा बैल व पाडा यांच्याकडून शेतातील काम केली जात होती. त्याचप्रमाणे गौरी गणपती सण झाल्यानंतर पाडळी येथील डोंगरांमध्ये गवत कापण्यासाठी वाटणी घेतलेली असायची. गवत कापण्यासाठी बंडू मामा आणि थोरला भाऊ संभाजी किंवा दुसरा भाऊ धोंडिराम बैलगाडी घेऊन जात होते. आमच्या गावात भैरोबा देवाला वळू बैल सोडलेला होता. त्याचे नाव ' भोला ' ठेवलेलं होतं. त्यावेळी तो वळू बंदिस्त होता. गावातील लोकं बैलगाडीतून देवळावरून जात असताना वळू बैलासाठी वैरणीच्या पेंड्या टाकतात. त्याची देखरेख करण्यासाठी एका माणसाची नेमणूक केलेली होती. गावातील काही लोकांनी त्या माणसाच्या जेवणाची सोय केली होती. दर रविवारी रात्री नऊ - दहा वाजता देवाची आरती आणि पालखी झाल्यानंतर त्या वळूला सोडले जायचे. तो रात्रभर यथेच्च फिरून , चरून पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत स्वतःहून आपल्या खोलीत येऊन बंदिस्त होत होता. त्या दरम्यान कोणतीही गाडी त्याच्या जवळून जाता कामा नये. नाहीतर तो त्या गाडीवर चालून जायचा. सर्व लोकं याची काळजी घ्यायचे. पण कोणी त्याची छेड काढली तर तो गावातील बैलांच्या मागे लागायचा. मला आठवते की आमच्याही बैलगाडीच्या मागे हा वळू एक-दोन वेळा लागलेला होता. कारण काय ते समजले नाही. डोंगरातून गवत घेऊन गाडी येत होती. वाटंकरी लोकांच्या वाटणीचे गवताचे भारे टाकत गाडी घराकडे येत होती. त्यावेळी कसा काय आवाज ऐकून वळू आमच्या बैलगाडीवर चालून आला. त्याला चुकवणं फार मुश्किल असायचं , पण बंडू मामा आणि भाऊ अगदी चलाकीनं त्याला चुकवून गाडी पुढं काढली. वळूनं पाठलाग चालू केला. गाडी पुढं आणि वळू मागं असा अर्धा कि.मी. पाठलाग सुरू होता. काय करावं गाडीवानाला सुचंना. त्यांनी गाडी पळवत आणली. आमच्या घरालगत छप्पर होतं. छप्पर आणि शेजारचे घर यामध्ये जागा रिकामी होती. त्यात गाडी घातली. त्यामुळे वळूला पुढे जाता आले नाही. तोपर्यंत लोकं जमा झाली. त्यांनी वळूला हुसकावून लावले. आणि आमचे बैल वळूच्या तावडीतून बचावले. बंडू मामाला हायसे वाटले.
असा हा बंडू मामा अतिशय थट्टेखोर होता. तो मला आणि माझ्या बाल मित्रांनो एकत्र घेऊन बसायचा आणि चेष्टा करायचा. माझा जिवलग मित्र केशव हा आमच्या समोरच त्याच्या मामाकडे राहत होता. त्याला बंडू मामा नेहमी म्हणायचा केशाचा आबा बंपुरीवर उभा. कारण केशव त्याच्या वडिलांना 'आबा ' म्हणत होता. केशवचा आबा मुंबईला कामाला होता.
आमच्या बंडू मामाला शिरगावमध्ये दत्तक घातलेला होता. म्हणजे बंडू शिवाप्पा आंबी दत्तक झाल्यानंतर त्याचे नाव झाले बंडू दत्तू आंबी. तो शिरगावला दत्तक झाला , तरी त्याचे लग्न रजपूतवाडी येथे मोठ्या धुमधडाक्यात लावून दिले होते. त्यावेळी सांगलीहून
व-हाड कोल्हापुरात आलेलं होतं. कोल्हापुरातून
रजपूतवाडीला व-हाड नेण्यासाठी त्यावेळी बैलगाड्या होत्या. आंबेवाडीतील दोन- तीन बैलगाड्या आणि आमची एक बैलगाडी होती. ती बैलगाडी चालवायला भाऊ धोंडिराम होता. त्याच्याबरोबर मीही होतो. कोल्हापुरातील तोरस्कर चौकातून बैलगाड्या निघाल्या. आंबेवाडी सोडली आणि बैलगाडी कोणाची पुढे जाते अशी जणू स्पर्धा होती. आमच्या गाडीला बाळा बैल आणि नुकताच वझलेला पाडा होता. आमची गाडी मागे होती. पुढच्या गाड्या पळू लागल्या. माझ्या भावाला चेव आला. भाऊंनं बैलाच्या शेपटीला हात लावताच बाळा बैल उधळला. त्यानं पाड्यासह गाडी ओढून सर्वांच्या पुढे नेली. बंडू मामाचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मामीसह तो शिरगावला गेला.
Comments
Post a Comment