प्रकरण - २

प्रकरण-2
         माझी सर्व भावंडे रजपूतवाडी येथे लहानाची मोठी झाली होती.  रजपूतवाडी हे माझे आजोळ होते.  पण माझे खरे आजोळ वाळवा तालुक्यातील शिरगाव होय.  शिरगाव हे कृष्णा नदीच्या काठावरील गाव.  पूर्वी कृष्णा नदीला पाणी नसायचे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी पिके घेतली जायची.  बाकी आमच्या गावातून बैलगाडीतून शिरगावला  धनधान्य नेले जायचे.  पूर्वी १९६० च्या दरम्यान दुष्काळ पडला होता.  शिरगावातील माझे आजोबा आणि त्यांची भावंडे आमच्या गावी आली होती. त्यावेळी रजपूतवाडी येथील किशाबापूचा बंगला बांधण्याचे काम सुरू होते.  त्या बांधकामावर माझे आजोबा आणि त्यांची भावंडे काम करायला होती. अलीकडे म्हणजे वीस वर्षापूर्वी  रजपूतवाडी येथे आज इंदिरानगर आहे , तेथे चुन्याची घाणी होती.  त्या चुन्याच्या घाणीमध्ये चुना तयार करून बंगल्याचे बांधकाम केले होते.  माझ्या आजोबाचा एक भाऊ आप्पाजी  बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात  जावून राहिलेला आहे. तर एक भाऊ गुंडाप्पा  केर्लीमध्ये जावून राहिलेला आहे.  माझे आजोबा गणपती  रजपूतवाडी येथे घर खरेदी घेऊन राहिलेले आहेत.  तर बापूजी  , शिवाप्पा आणि मुलाप्पा असे तिघे भाऊ परत शिरगावला जाऊन राहिले आणि शेती करू लागले . आता कृष्णा नदीला पाणी आले. शिरगाव गाव सुपीक झाले. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की रजपूतवाडी म्हणजे गोकुळातील नंदनवन होते. शाहू महाराजांची छावणी होती. सोनतळी ही रजपूतवाडीलगतच आहे.  आमच्या आजोळी रजपूतवाडीत  पाहुण्यांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. घरात म्हशी भरपूर होत्या. त्यामुळे दुधाला कमी नव्हते.  शेजारी कार्पोरेशनचे शेत असल्यामुळे तेही कसण्यासाठी मिळालेले होते.       
           यादरम्यान वरणगे प्रयाग चिखलीच्या मध्ये कासारी नदीवर छोटा पूल झालेला होता.  त्यामुळे त्या पुलावरून उन्हाळा व हिवाळा वाहतूक सुरू होती.  पूल लहान असल्यामुळे पावसाळ्यात अगदी सुरुवातीलाच त्या पुलावर पाणी यायचे.  तेव्हा वरणगे -केर्ली याठिकाणी पावसाळ्यात नाव सुरु असायची. वरणगे , पाडळी , निटवडे , यवलूज , पडळ , माजगाव अशा गावांतील लोकांची वाहतूक पावसाळ्यात या नावेतून व्हायची.  पावसाळ्यातील वाहतुकीसाठी या गावांतून दिवाळीच्या वेळेस सुगीला भात , मक्का व गूळ बैतं म्हणून धान्याच्या स्वरूपात मिळत होते.  माझे वडील,  चुलता आणि माझे भाऊ पावसाळ्यात नाव चालवण्याचे काम करत होते. नाव चालवत असताना दिवसभर पावसात उभे राहावे लागत असल्यामुळे काही व्यक्तींच्या सहवासामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले होते.  संध्याकाळी नावेवरून येतानाच दारू पिऊन यायचे.  पावसाळा संपल्यानंतर मात्र वडिलांचं काम असायचं ते म्हणजे रजपूतवाडीतील म्हशीचे दूध विकायला कोल्हापूरला जायचे.  कोल्हापुरातील गंगावेशमधील मिठारी यांचे हॉटेल.  तसेच चहा गाडीवाले व काही ग्राहक यांना दूध दिले जायचे.  दारूचे व्यसन असल्यामुळे वडील परत येताना काही वेळेला बिकट प्रसंग घडायचे. एकीकडे सायकल , दुसऱ्या बाजूला घागरी पडलेल्या असायच्या.  या प्रसंगावरून घरात अनेकदा भांडणे व्हायची. आजोबा शिव्या घालायचे. पण वडील खाली घातलेली मान कधी वर करायचे नाहीत.  आजोबा त्यांच्या सुनेला म्हणजे मामीला म्हणायचे , " इंदे , घाल त्या रावशाला काहीतरी खायाला. काही खाल्लं नसेल अजून." माझ्या वडिलांचं नाव रामा असलं तरी त्यांना ' रावसाहेब ' म्हणून सारी बोलवत होती.       
               काही वर्षांनंतर माझे मामा शिक्षणासाठी कोल्हापूरला जाऊ लागले.  तेच शाळेला जाताना दुधाच्या घागरी घेऊन जात आणि  हाॅटेल , चहागाडीवाले व   गि-हाईकांना दूध घालून शाळेत जात होते.  माझा थोरला भाऊ संभाजी हाही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होता.  दुसरा धोंडीराम व तिसरा तुकाराम हेही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होते.  
             मी लहान होतो.  मला फारसे कळत नव्हते . तरीही मला आठवणारा हा प्रसंग. मी चार - साडेचार वर्षाचा असेल.  तेव्हा रजपूतवाडीत होतो.  माझी आई माझ्या पाचव्या भावासाठी बाळंत झाली होती.  रजपूतवाडीतून ज्वारीच्या थाटांनी भरलेल्या बैलगाडीत बसून मी वरणगे गावी माझ्या घरी आलो होतो.  तेव्हा आईसाठी तूपभात केला होता.  त्यातील भाताचे मुटके करून मला भरवलेले आजही मला आठवतात.  असेच काही दिवस निघून गेले . माझी आई आजारी पडली . अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यावेळी नगारजी म्हणून डाॅक्टर गावात येत होते.  त्यांनीच आईला मिरजेला घेऊन जावा असे सांगितले. आईला मिरजेला नेऊन आणले.  पण  त्याचा काही उपयोग झाला नाही.  तिच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही कसे निधान झाले  होते. तिला घरी आणले ,  तेव्हा मी  रजपूतवाडी होऊन घरी आलो .  आजही ते दृश्य मला जसेच्या तसे दिसते आहे ..... 
.....आई मधल्या सोप्यात म्हणजे स्वयंपाक खोलीत झोपलेली आहे.  मी बैलगाडीतून उतरून पहिल्या सोप्यात गेलो. तेथून त्या खोलीत गेलो.  गंजातील पाणी प्यालो . पाणी पिऊन बाहेर  निघालो.  आई डोळे फिरवून माझ्याकडे बघते आहे. काही समजण्याचे ते वयही नव्हते.  आजही मला त्या दृश्याचा उलगडा होत नाही.  ती माझ्याकडे पाहून काय सांगत असावी? किंवा तिला काय म्हणायचे होते? हे मला आजही कळलेले नाही. मी तिथेच राहिलो. 
              चार दिवसानंतरचा तो प्रसंग..... आईला जास्त झाले होते.  माझे आजोबाही राहिलेले होते.  रात्री अकरा -साडे अकराची वेळ.  आईचे निधन झालेले होते.  घरात रडारड सुरू झाली होती.  पण आजोबांचा जीव थाऱ्यावर नव्हता .  कारण मामा  आणि मामी रजपूतवाडीत होते.  आजच्या सारखी  त्या काळात प्रसारमाध्यमे  नव्हती.  निरोप द्यायचा तर एखाद्या व्यक्तीला पाठवून द्यावे लागत होते.  तशी ती रात्रीची वेळ होती. वाहनाची सोय नव्हती. कुणाला पाठवून द्यायचे तर सायकल घेऊन जावे लागत होते.  सायकलवर पाठवून दिले तरी जायला अर्धा तास आणि चालत यायला तासभर तरी वेळ जाणार होता.  माझे आजोबा घरातून बाहेर यायचे आणि मोठ्याने ' पांडू ' म्हणून ओरडायचे . आमचे गावातील घर आणि रजपूतवाडीतील घर तसे एका रेषेत आहेत.  मधले अंतर काढले तर अडीच ते तीन किलोमीटर इतके भरेल. त्यावेळी रात्री खूप शांतता असायची . वाहनांची वर्दळ नाही की कशाचा गोंगाट नाही. खरंच त्यावेळी इथून हाक दिल्यानंतर तिथे पोहोचत होती.  काही वेळानंतर आजोबांनी हाक मारल्यानंतर सादाला प्रतिसाद आला. म्हणजे मामांनी  ' हो ' दिलेली ऐकू आली. आजोबांचा जीव भांड्यात पडला.  म्हणजे  मामा निम्म्या वाटेवर आलेले होते.  मामा घरी येईपर्यंत चार वाजत आले होते.  थोरला भाऊ संभाजी मोठ्याने रडत होता.  धोंडीराम आणि तुकाराम जवळच बसून मुसमुसत रडत होते. शिवाजी तर अवघा नऊ-दहा महिन्यांचा होता.  तो पाळण्यातच पडलेला होता. माझी अवस्था ती काय सांगावी?  मला काहीच कळत नव्हते.  मी रडतही नव्हतो. फक्त तेथे असलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे  टक लावून पहात होतो.  सकाळ होताच आईला  नदीकडेला असलेल्या मळी नावाच्या शेताकडे नेले.  खोल खड्डा काढलेला होता. त्यात दिवळी केलेली होती. त्यात तिला बसवली .  पाणी पाजले. आरती म्हटली. मीठ घातले. माती घातली.  नदीला आंघोळ करून घरी परतलो. आणि  आमच्या संध्याकाळला  सुरुवात झाली.........

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील