प्रकरण -१
प्रकरण-1
पूर्वीचा काळ अतिशय धगधगीचा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा होता. गावात काही मोजकीच घरे श्रीमंतांची असायची. गावातील बरेचसे लोक त्यांच्या दारी सेवेला असायचे. आजच्या इतकी सुधारणा त्याकाळी नक्कीच नव्हती. मी जे काय सांगतोय ते ७०-८० वर्षापूर्वीचा काळ आहे. गावात नीट पक्के रस्ते नव्हते. पावसाळ्यात गावातून सारी दलदल असायची. घरातून बाहेर पाऊल टाकला की चार - चार बोटाइतका चिखल असायचा. त्यातून जाण्यासाठी लाकडी खडावा असायच्या. खडावा म्हणजे खाली चार बोटाचा लाकडाचा ठोकळा. त्या ठोकळ्याला मधोमध निम्मा कट केला जायचा आणि वरती पाय अडकण्यासाठी चामड्याच्या पट्ट्या असायच्या. किमान पाव किलो वजनाच्या खडावा उचलत चिखलातून जावं लागायचं.
त्याकाळी सारी घरं पालापाचोळा , छप्पराची असायची. त्यातील चांगली घरे म्हणजे अगदी साध्या खापरांनी शेखरलेली असायची. गावात एखाद्या श्रीमंत माणसांचे घर पक्क्या दगड विटांनी बांधलेलं असायचे. ते घर म्हणजे त्या गावातील राजवाडाच जणू तो.
कोल्हापूर शहरापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर आमचे गाव. वरणगे पाडळी. गावं दोन पण नाव एकच जोडनाव . जुळ्या भावासारखी़ दोन्ही गावाच्या मधून एकच रस्ता जातो. या गावात सारे बाराबलुतेदार सुखी व आनंदी जीवन जगत होते. गावाच्या उत्तर -पूर्व - दक्षिण बाजूने नदी वाहते. फक्त पश्चिमेस डोंगर आहे. म्हणजे सभोवती नदीचा वेडाआहे. त्यामुळे गावाच्या पलीकडे जाण्यासाठी सोय नव्हती म्हणून लोकांना ये-जा करण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती. गावात गुराळ घरं होती. कोल्हापूरला गूळ नेण्यासाठी गुराळ घरापासून नदीपर्यंत एक बैलगाडी आणि नदीच्या पलीकडे कोल्हापूरपर्यंत गूळ नेण्यासाठी दुसरी बैलगाडी ठेवलेली असायची. पहिल्या बैलगाडीतून गुळ उतरून नावेत भरायचा आणि नावेतून उतरून दुसऱ्या बैलगाडीत भरायचा असे हलाखीचे जीवन त्याकाळी जगावे लागत होते. तसेच रजपुतवाडी केर्ली , चिखली , आंबेवाडी या भागात कार्पोरेशन (कंपनी) खात्याची जमीन असल्यामुळे ती कसण्यासाठी आमच्या गावातून कामगार जात होते. त्यांचीही ने - आण करण्यासाठी नावेचा उपयोग होत होता. विशेषत: पावसाळ्यामध्ये या नावेचा उपयोग लोकांना फार व्हायचा. ही नाव चालवण्याचे काम आंबी करत होते. नाव चालवणे हा त्यांचा आयुष्यभराचा दिनक्रम होता. सकाळी लवकर उठायचं आणि नावेवर जायचं. दिवसभर नावेवर काम करायचं. अंधार पडल्यावर घरी यायचं . या कामाच्या बदल्यात सारे गावकरी पसाभर धान्य द्यायचे. त्या काळी आठ दहा पोती भात . दोन पोती मक्का. एक गाडीभर गूळ . म्हणजे तीस किलोचे २४ रवे मिळायचे. म्हणजे घरात धनधान्याची मुबलकता होती. थोडेसे शेत आणि जनावरे होती म्हणजे घरात दुभतेही होते. गावात कुणाकडे काही नाही मिळाले तर गरीब लोक आंब्याच्या घरी साहित्य नेण्यासाठी येत होते. आंब्यांची ताई म्हणजे अशा गरीब लोकांसाठी देवमाणूस होती. तिचं खरं नाव ताराबाई होते. पण सारे गाव तिला ' ताई ' म्हणूनच ओळखत होते. ताईचा पती म्हणजे परसू. त्यांना लोक ' काका ' म्हणत होते. काका आणि ताई यांना तीन मुलगे आणि एक मुलगी होती . मुलगीचे नाव आकुबाई. तिला पाहुण्यातच शिरगाव - वाळवा येथे लग्न करून दिले होते. त्यांच्या तीन मुलांची नावे अशी होती--थोरला मारुती , मधला शंकर आणि तिसरा रामा. यातील मारुती यांनं काही काळ नाव चालवली. घर कारभार केला. पण बावडा याठिकाणी त्यांना पाहुण्यांच्या घरी दत्तक देण्यात आले. शंकरचं लग्न गणेशवाडी - शिरोळ येथील कलाबाई हिच्याशी झाले. रामा याचे लग्न शिरगावला दिलेल्या आकुबाईच्या मुलीशी झाले. लग्न होऊन काही वर्षे झाली , पण त्यांना मूल होईना. झालेच तर लगेच मरायचे. असे दोनदा झाले . त्यांना कुणीतरी सांगितले की देवाला नवस बोला आणि नदीला पाळणा सोडा. त्याप्रमाणं नवस केला आणि मूल जन्मले. त्याचा पाळणा कृष्णा नदीवर भिलवडी - अंकलखोप येथे सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि काय आश्चर्य एकापाठोपाठ सहा मुलं झाली. तेही मुलगेच. पण त्यातील चौथं अपत्य 'ज्ञानदेव' पाच सहा वर्षाचा असताना आजारी पडून वारले. म्हणजे पाच मुलगे राहिलेत. एक नंबरचा संभाजीराव, दुसरा धोंडीराम, तिसरा तुकाराम, चौथा परशराम आणि पाचवा शिवाजी. शिवाजी दहा महिण्याचा असतानाच आईचं निधन झालं. त्याचा सांभाळ शेजारच्या कमळा आजीनं केला.
Comments
Post a Comment